मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते. मंचावरील निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात आणि मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !
एकामागून एक फुलबाज्या उडाव्यात तसे तडतडणारे काव्यात्मक रचना ते लीलया पेश करत जातात. ऐकणाऱ्याच्या कानाखाली जाळ निघावा अशा आशयाच्या कवितांना ते हास्यरसाच्या रुपेरी वर्खात बेमालूमपणे गुंडाळून समोरच्यांना सुपूर्द करतात. मधूनच मिशीवरून हात फिरवत समोरच्या श्रोत्यांकडे मिश्कील नजरेने बघत समोरच्या श्रोत्यांची तल्लीनता किती रंगली आहे याचा अंदाज घेतात. त्यानंतर ते नकळत सभागृह ताब्यात घेतात आणि शब्दांच्या शस्त्राने गुदगुल्या करत करत अंतर्मनावर घावही करून जातात. ते हे कसे आकारास आणतात ते भल्या भल्यानाही उमगत नाही.