शनिवार, ५ एप्रिल, २०२५
मेरे देश की धरती ..
शुक्रवार 4 एप्रिल रोजी ज्येष्ठ दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांचे निधन झाले आणि सोशल मीडियासह सर्व प्रसारमाध्यमे त्यांच्या विषयीच्या माहितीने भरून वाहू लागली. अनेकांनी शोक व्यक्त केला. जवळपास हरेक चाहत्याने त्यांच्या जुन्या फिल्मी आठवणींना उजाळा दिला. त्यांची गाणी, त्यांचे संवाद आणि त्यांची शैली याविषयी लोक भरभरून बोलले. मुळात मनोजकुमार यांची स्वतःची एक इमेज होती त्यामुळे त्यांचा स्वतःचा खास असा चाहता वर्ग होता त्याच्याखेरीज अन्य वर्गातले सिनेरसिकही त्यांच्याविषयी मनःपूर्वक व्यक्त झाले हे विशेष. कारण अलीकडील काळात एक वाईट गोष्ट हमखास दृष्टीस पडते ती म्हणजे कुणा प्रसिद्ध व्यक्तीचे वा सेलिब्रिटीचे निधन झाले की लोक त्याच्या विषयी वाईटसाईट बोलू लागतात. मृत्यूनंतरचे बदनामीचे कवित्व सुरु होते. अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत काही वाईट गोष्टी केल्या असतील, त्याने केलेल्या कुकर्माविषयी कबुली दिली नसेल वा त्याबद्दल त्याच्या मनात प्रायश्चित्त भावना नसेल तर लोक त्याच्या मृत्यूपश्चात वाईट बोलत असतील तर किती जणांना आपण रोखू शकणार? कुणालाच नाही! मात्र अलीकडील काळात माणूस गेला रे गेला की त्याच्या बाजूने बोलणारे नि त्याची निंदा नालस्ती करणारे असे दोन गट पडतात. याने मन व्याकुळ होतं, अंतःकारणात विषाद दाटून येतो. श्रद्धांजली देखील द्यावीशी वाटत नाही. मात्र मनोजकुमार याला अपवाद ठरले. त्यांच्या निधनानंतर समग्र माध्यमे, सोशल मीडिया त्यांच्याविषयीने आदराने बोलत होता, लोक त्यांच्या विविध गोष्टी सांगताना आढळले. हे भाग्य अलीकडील काळात क्वचित कुणाच्या वाट्याला आले आहे. मनोज कुमार यांना मृत्यूपश्चात हे साधले कारण त्यांची भारत कुमार अर्थात भारत का नायक, भारत का बेटा या प्रतिमेने लोकांच्या मनावर फार पूर्वीपासून गारुड केलेय. शिवाय ते इंडस्ट्रीमध्ये तामझाम पासून दूर होते, त्यांचे कुणाशी वैर असायचेही कारण नव्हते. त्यांची स्वतःची एक विचारधारा होती त्याच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)