वर्ष संपत आलं की विविध क्षेत्रातील लोक सरत्या वर्षात त्यांच्या प्रांतात झालेल्या घडामोडींचा आढावा मांडू लागतात आणि त्यातील तपशीलवार निष्कर्षावरून हे वर्ष त्या क्षेत्रास कसे गेले याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. यातली व्यक्तीसापेक्ष मतभिन्नता वगळल्यास अनुमान बहुतांश समान येते. सर्वच क्षेत्रातील वर्षभराच्या आलेखाचे एकत्रीकरण केल्यास जगभराच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि पारलौकिक कलाचे एकसंध चित्र समोर येते. लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे याचे हे प्रतिबिंब असते. यंदाच्या वर्षी साहित्य- चित्रकृतींच्या प्रतिभाविष्कारात जगभरातल्या विविध भाषांतून मर्मभेदी विषयांवर नेटके भाष्य केलं गेलंय. अडगळीत पडलेले वस्तूविषय केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय यामागच्या प्रतीभावंताना द्यावे लागेल. मानवी जीवनाच्या विस्तृत पटात रोज नजरेस पडणारे तरीदेखील दखल न घेतले गेलेले अनेक घटक, घटना आणि विषय अत्यंत भेदक पद्धतीने यात मांडले गेलेत.
कादंबऱ्या, कथा, विविधांगी पुस्तकांचा विषय असेल आणि बुकर पुरस्काराचे नाव निघाले नाही असे होऊ शकत नाही. यंदाच्या वर्षीच्या 'बुकर'साठी प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या पुस्तकांचे विषय तगडे होते. छपन्न वर्षीय उत्तर आयरिश लेखिका ऍना बर्न्स यांनी लिहिलेल्या 'मिल्कमॅन' या कादंबरीला यंदाचा बुकर पुरास्कार मिळाला. कादंबरीच्या पहिल्या पानापासून ते अखेरपर्यँत जगण्याचा संघर्ष आहे. राजरोस पडणारे मुडदे, दडपशाही, सरकारी दमण शोषण आणि त्या आडून चालणारा सत्ताभोग व त्याला होणारा विरोध हा कादंबरीतून इतक्या प्रभावीपणे डोकावतो की ती कथा आताच्या जगातील उजव्या डाव्या विचाराच्या एककल्ली राजवटीच्या अंमल असलेल्या कोणत्याही देशातील वाटू लागते, अगदी आपल्या सुद्धा ! या कादंबरीची नायिका एक सोळा वर्षीय तरुणी आहे जिचा विवाह जबरदस्तीने एका प्रौढ व्यक्तीशी लावून देण्यात आलेला असतो ज्याची ओळख मिल्कमॅन अशी असते. १९७० च्या कालखंडात अनामिक देशात कादंबरी घडते. लेखिका बेलफास्टच्या रहिवासी असल्याने साहजिकच त्याचे संदर्भ कथेत येतात. आयरिश रिव्हॉल्युशन आर्मीसहित अन्य संघटना व त्यांचे हेतू, त्यातला लोकसहभाग, सरकारविरुद्धचा एल्गार हे सगळं मांडत असताना दरम्यानच्या काळात केवळ गॉसिप आणि अफवांचा आधार घेत लैंगिक अत्याचार कसे पार पाडले जातात यावर लेखिका भाष्य करतात. प्रत्यक्ष अत्याचार होत असताना दोनच मानवी भूमिका राहतात, शोषक आणि पिडीत, हे त्या अधोरेखित करतात. 'सरकारविरुद्ध मांडलेली कोणतीही भूमिका गैरच' हा जो काही दृष्टीकोन सरकारचे समर्थक मांडतात त्याला लेखिका प्रखर शब्दात झोडपून काढतात. आपल्या आताच्या सरकारच्या राजवटीत अशी कादंबरी लिहिण्याचं धाडस कुणी दाखवेल अशी सुतराम शक्यता नाही हा भाग अलाहिदा !
चाळीस वर्षीय कॅनेडियन लेखिका एसी एडग्वेन यांच्या 'वॉशिंग्टन ब्लॅक' या कादंबरीत निवेदन शैलीचे ओघवते लेखन आहे. अकरा वर्षाचा वॉशिंग्टन ब्लॅक हा बार्बाडोसच्या मळ्यातला बालगुलाम हा या कादंबरीचा नायक. त्याची मालकी असणारं कुटुंब, त्या कुटुंबातील त्याच्या आईच्या वयाची मालकीण, तिचे आणि ब्लॅकचे मानवी भावभावनांचे पदर उलगडत जाणारे संबंध कादंबरीच्या पहिल्या भागात येतात तर दुसऱ्या भागात वर्णसंघर्षाचे टोकाला चाललेले तरीही छुपे स्वरूप असलेले चित्र गडद होत जाते. संपूर्ण कादंबरीत गुलामांचे जीवन एका स्थिर लयीच्या पार्श्वभूमीत कथेच्या मागेपुढे रेंगाळत राहते, जे प्रभावीपणे कथानायकाहूनही जास्त तगमग देते. लेखिकेने याला बीभत्स, कटू होऊ देण्यापासून टाळलेय. आपल्याकडे तुलनेने तसा रंगभेद नसला तरी एक छुपा रंगमत्सर ठासून भरला आहे जो शेवटी जातींच्या उतरंडीकडे घेऊन जातो त्यावर आताच्या काळात कुणी काही असं फारसं समरसून लिहिताना दिसत नाही. 'वॉशिंग्टन ब्लॅक'मध्ये विस्तीर्ण भौगोलिक आणि ऐतिहासिक पटाचा खुबीने वापर केला गेलाय. आपल्याकडे तर तो अधिक बहुआयामी घटकात उपलब्ध आहे. किंबहुना दलित साहित्याच्या त्याच त्या चौकटबंद साच्यातून आपल्याकडील साहित्य बाहेर पडायला तयार नाही. निव्वळ मागील दोन दशकाचा पट जरी या अनुषंगाने एखाद्या कथासूत्राच्या आधारे समर्थपणे कुणी रेखाटला तरी एक उत्कृष्ट कलाकृती जन्मास येईल याकडे यानिमित्ताने लक्ष वेधावे वाटते.
डेसी जॉन्सन लिखित 'एव्हरीथिंग अंडर' या कादंबरीत एकट्या पडलेल्या एका प्रौढवयीन शब्दकोशकार स्त्रीची कथा आहे जी आपल्या बालपणीच्या रहस्यमय भाषेच्या भावनिक गुंत्यात गुरफटली आहे. या प्रवासात सोळा वर्षानंतर ती तिच्या आईशी भेटते आणि त्या दोघी पुन्हा एकत्र येतात. ग्रीक पुराणकथांची जोड आधुनिक कथेस देत आई आणि मुलगी यांच्यातला भावनिक पट उलगडण्याचे अजब कसब या कादंबरीत आहे. लुप्त होत चाललेल्या भाषांवरचा खलही आहे. पुरातनवाद आणि संस्कृती यांचे जोखड ठेवायचे की त्याचे रुपांतर सहज लाठीत करायचे याचे उत्तर या कादंबरीत येते. असे कथाविषय आपल्याकडे खंडीभर मिळू शकतात पण तशी दृष्टी हवी. रिचर्ड पॉवर्स लिखित 'द ओव्हरस्टोरी' एक अनोखा कल्पनाविस्तार आहे ज्यात विविध मनोवृत्तीच्या नऊ अनोळखी व्यक्तींना वृक्षांकडून पुकारलं जातं. त्यांना एकत्र केलं जातं आणि मानवी अधिग्रहणाने ग्रासलेल्या भूमीखंडावरचे काही एकरातले निबिड जंगल वाचविण्याचा ते विडा उचलतात. आताच्या घडीला जगभरात पर्यावरण संवर्धनाचा धोशा सुरु आहे, मात्र 'पर्यावरणवाद्यांची कोल्हेकुई' अशा कुत्सित शब्दात त्याची हेटाळणी करणारे लोकही अस्तित्वात आहेत. या पृष्ठभूमीवर भिन्न मनोवृत्तीचे लोक जंगल वाचवण्यासाठी कसे राजी होतात याचे चित्रण करताना मानवी स्वभाव आणि निसर्ग यांच्यात अंतर कसे पडत गेले व त्यांच्यात मिलाफ कसा घडवून आणता येईल यावर लेखक कटाक्ष टाकतो. ही कादंबरी बुकरची दावेदार होती, आपल्याकडे मात्र या विषयावर कुणी कादंबरी लिहिली तर त्याला लोक किती डोक्यावर घेतील हा संशोधनाचा विषय होईल. 'द मार्स रूम' या रॅशेल कशनेर लिखित कादंबरीत अमेरिकेच्या कथित व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि ऐश्वर्यसमृद्ध जीवनशैलीचा बुरखा टराटरा फाटतो. अमेरिकेत एखाद्या मध्यमवयीन व्यक्तीने गरीब असणे आणि ती स्त्री असणे किती क्लेशदायक आहे याचे आर्त ओरखडे या कादंबरीत आहेत.
असे विविध विषय या सर्व कादंबऱ्यात हाताळले गेलेत. तुलनेत आपल्याकडे काय निर्मिले गेलेय याचे चित्र काहीसे निराशाजनक आहे. यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रा मुदगल यांच्या 'पोस्ट बॉक्स नं. २०३ - नाला सोपारा' या हिंदी कादंबरीत एका किन्नराची गाथा आहे. रोजच्या गाठीभेटीनंतर किन्नराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जाऊन किन्नरांच्या विदारक अन उपेक्षित आयुष्याचा पट त्यात उलगडतो. १९७९ च्या सुमारास लेखिकेस भेटलेल्या एका किन्नराने मनात घर केले आणि त्याचे प्रकटन या कादंबरीतून झाले. अनीस सलीम यांनी लिहिलेल्या 'द ब्लाईंड लेडी'ज डिसेंडंट' या कादंबरीस इंग्रजी साहित्याकरिताचा अकादमी पुरस्कार मिळालाय. यातला कथानायक वयाच्या सहविसाव्या वर्षी ३०० पानी पत्र लिहून आत्महत्या करायचे ठरवतो. ती सुसाईड नोट म्हणजे कादंबरी. एका मुस्लिम कुटुंबाची तीन दशकातील वाटचाल आणि जडणघडण यावर प्रकाश टाकताना नातीगोती, सामाजिक विभ्रम आणि मानवी मनोविज्ञान यांची सांगड कादंबरीत घातलीय. किंचित डार्क आणि काहीशी विनोदी झालर या लेखनास आहे.
यंदाच्या वर्षीचा उत्कृष्ट विदेशी भाषा श्रेणीतील 'ऑस्कर'चा दावेदार असणारा 'रोमा' हा चित्रपट देखील अफलातून आणि अप्रतिम आहे. एका मेक्सिकन कुटुंबातील दांपत्यात आलेली विभक्ती, त्यांच्या अपत्यांची घुसमट, मुलांच्या आजीची घालमेल आणि या सर्वास साक्षीदार असणारी घरातील तरुण मोलकरीण क्लिओ यांची कथा यात आहे. क्लिओ जेंव्हा पहिल्यांदा घरात येते तेंव्हा दुसरी केअरटेकर एडेला ही पार्किंगलॉट वरील फरशीवर पडलेली कुत्र्यांची विष्ठा साबणपाण्याने धूत असते आणि त्या च वेळी आकाशातून जाणाऱ्या विमानाचे प्रतिबिंब पाण्यात उमटते, त्याला छेद देत क्लिओ दाखल होते. असे अनेक हृदयात्म प्रसंग यात आहेत. नर मादी, स्त्री पुरुष, पती पत्नी, आई मुलं आणि कुटुंब मोलकरीण अशा विविध पदरात ही कथा आहे. 'ग्रॅव्हिटी' या ऑस्करविजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक अल्फान्सो क्योरोन यांची हे आत्मकथनच आहे. चित्रपट कृष्णधवल असून सुखद चित्रमय शैली हे त्याचे वैशिष्ट्य होय. एखाद्या तरल कवितेसारखी याची मांडणी आहे.
२०१८ सालच्या सर्वात लक्षवेधक पेंटींग्जपैकी मुख्य एक म्हणजे 'मेरियन इज द ट्रान्सफेमिनिस्ट' होय. अँड्रिया बॉवर्सने काढलेल्या या चित्रात जॉर्ज स्कॉट या फ्रेंच कलाविशारदाने काढलेल्या प्रसिद्ध चित्राचे विखंडन आहे. मूळ चित्रातील बंडखोर शस्त्रसज्ज अर्धअनावृत्त गोऱ्या महिलेची फ्रेम तशीच ठेवत तिच्या ऐवजी एका ट्रान्सजेंडेड सावळ्या स्त्रीला चित्रात दाखवताना मूळ चित्रातील सैनिक हटवून त्यांचे एकसारखे झेंडे रंगीत दाखवलेत. जगाने सांदाडीत टाकलेल्या या घटकास तिने अग्रस्थानी दाखवले आहे. पुरुषी व शोषणवादी समाजरचनेस आव्हान देणारी ही सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जातेय. संगीतात, शिल्पकृतीत देखील असेच विविध विषय हाताळले गेलेत. या सर्वातून जगभरातली बहुआयामी अस्वस्थता समोर येते. या सर्वांच्या तुलनेत मराठीत फार काही होताना दिसत नाही. समीक्षा हा साहित्यक्षेत्रातील व्यक्तींखेरीज इतरेजनांसाठी रटाळ विषय होय, त्या क्षेत्रातील कलाकृतीस यंदाचा मराठी कलाकृतीकरिताचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. मन उचंबळून यावे किंवा पिचलेल्या मनगटाच्या मुठी वळल्या जाव्यात अशा कलाकृती मराठीत अलीकडील काळात निर्मिल्या जात नाहीत हे ठळक जाणवते. तद्वतच असा रेटा रसिक जनतेकडूनही लावला जात नाही हे ही खरे आणि कुणी असा प्रयत्न केलाच तर त्याला फरशी लोकमान्यता मिळत नाही, त्यास राजमान्यता ही फारच लांबची गोष्ट झाली. एकंदर पाहता आपल्यासाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा