सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

ठगांच्या दडपलेल्या इतिहासाचे तथ्य...


नुकताच 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सपशेल कोसळला. त्याच्या यश अपयशावर आणि निर्मितीमुल्यांवर खूप काही लिहून झालेय आणि आणखीही लिहिले जाईल. मात्र ठग म्हणजे नेमके कोणते लोक आणि इतिहासात त्यांची दखल कशी घेतली गेलीय यावर पुरता प्रकाश अजूनही टाकला जात नाहीये. याआधी हॉलीवूडनेही 'कन्फेशन ऑफ ठग' या पुस्तकाचा आसरा घेत काही भूमिका चितारल्या होत्या. ब्रिटिश सैन्यातला अधिकारी विल्यम हेन्री स्लीमनने १८३५ मध्ये चतुर्भुज केलेल्या ठग राजा सईद आमीर अली उर्फ 'फिरंगिया' याच्या कबुलीजबाबावर हे पुस्तक आधारले होते. फिलिप मिडोज टेलरने लेखन केले होते. आजवर ठगांवर आलेले चित्रपट पाहिल्यास आपल्याला ते अतिरंजित आणि भडक, बीभत्स वाटू लागतात.
पण बारकाईने अभ्यासल्यावर सिनेमातून दाखवण्यात आलेलं चित्रीकरण खोटं वाटू लागते. कोणत्या ठगाने किती खून केले आणि किती निर्दयतेने केले यावर जी माहिती मिळते ती मेंदू सुन्न करणारी आहे. एकेका ठगाने शेकड्यात माणसं मारली होती हे आता खोटे वाटेल अशी परिस्थिती आहे पण तेच वास्तव आहे. बेहराम ठग याने नऊशेहून अधिक माणसे खलास केल्याची नोंद गिनीजमध्ये आहे. ठगांचा सूत्रबद्ध अभ्यास भारतीय इतिहास साधनातून न आढळता फ्रेंच आणि ब्रिटीश इतिहासकारांनी त्याची नेटकी नोंद घेतली आहे. हे जरी सत्य असले तरी याची एक काळी बाजू अशी सांगता येईल की ठग या शब्दाशी भारत जोडला गेला आणि भारतीय डाकू, चोर, लुटारू, दरोडेखोर या अर्थीची संज्ञा म्हणून तिचा वापर होऊ लागला. ठग आणि पेंढाऱ्यांचा इतिहास सांगतो की अठराव्या शतकाच्या प्रारंभापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सक्रीय होते. भारतीय इतिहासात ज्यांच्यावर तपशीलवार काहीच लिहिलं गेलं नाही ते ठग गिनीज बुकपर्यंत पोहोचण्यास ब्रिटीशांनी राबवलेली ठगांच्या बंदोबस्ताची मोहीम कारणीभूत ठरली. ब्रिटिशांनी प्रभावीपणे राबवलेल्या 'ठगी अॅन्ड डकैती सप्रेशन अॅक्ट' या कायद्याद्वारे अनेक ठगांचे आणि कुख्यात डाकूंचे उच्चाटन केले गेले. हजारो ठगांना फाशी दिले गेले. तडीपार करत अनेकांना थेट अफगाणीस्तानात पाठवले गेले. त्यांच्या बायका पोरांना पकडून त्यांना एकाच भागात राहण्याची सक्ती केली गेली, या वसाहतींना सेटलमेंट असे गोंडस नाव देण्यात आले होते.

ठगांचा इतिहास धुंडाळण्यासाठी चित्रपटातून रेखाटल्या गेलेल्या त्यांच्या भडक व्यक्तीरेखा सहायक ठरल्या. माइक डॅशलिखित "ठग : द ट्रू स्टोरी ऑफ इंडियाज मर्डरर्स कल्ट', स्लीमॅन - सर विल्यम्स लिखित 'रॅम्बल्स अँड रिकलेक्शन ऑफ इंडियन ऑफिशियल', किम वँगरलिखित "ठगी : बँडिट्री अॅन्ड द ब्रिटिश इन अर्ली नाइटिन्थ सेन्चुरी इन इंडिया, मॅक फार्लेन लिखित 'द लाईव्हज अँड एक्सप्लॉईटस ऑफ बँडीट अँड रॉबर्स', मार्टिन व्हॅन वर्कन्सलिखित "द स्ट्रॅँगल्ड ट्रॅव्हलर : कॉलोनियल इमॅजिनिंग अॅन्ड द ठग्स ऑफ इंडिया' या पुस्तकातून ठगांवर प्रकाश पडतो. ठगांचे नाव पुढे करत ब्रिटिशांनी जातीय - धार्मिक विभाजन केले. याखेरीज ब्रिटीश सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक भटक्या व आदिवासी लोकांना त्यांनी वरील कायद्याचा घेत नेस्तनाबूत केले. इंग्रजांनी तयार केलेल्या ठगांच्या प्रतिमेस या पुस्तकांमुळे तडे गेले. नंतरच्या दशकात भारतीय अभ्यासकांनी याचा सखोल अभ्यास करत इंग्रजांनी किती चातुर्याने चोर दरोडेखोर संपवताना त्यांच्याविरूद्धचे विद्रोही कसे नष्ट केले यावर फोकस केला. ब्रिटिशांनी जेंव्हा आपले साम्राज्यविस्ताराचे मनसुबे अमलात आणले तेंव्हा त्यांना राजा महाराजांशी फारसे लढावे लागले नाही पण त्यांच्या वाहतुकीपासून ते साधनसंपत्तीच्या लुटीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना कसून विरोध स्थानिक आदिवासींनी केला. त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना ठगीच्या कायद्यात अडकवत त्याला धार्मिक झिलई दिली.

भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या. यातीलच पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना हिंसाचारी व गुप्त होती. मुघल साम्राज्याच्या पडत्या काळात व विशेषत: उत्तर पेशवाईत लुटालूट करून उदरनिर्वाह करणाऱ्या टोळ्यांस ही संज्ञा अठराव्या शतकात रूढ झाली. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल तज्ञांत मतभेद आहेत. भारतातील ठग, पेंढाऱ्यांप्रमाणेच लूटमार करणाऱ्या ब्रिगांड, फ्रिबूटर, बँडिट, फ्रिलान्स, डकॉइट इत्यादी संघटित टोळ्या पश्चिमी देशांच्या इतिहासकाळातही उदयास आल्या. ठग, पेंढाऱ्यांच्या टोळ्या अस्तित्वात येण्यास काही मुलभूत कारणे होती. केंद्रीय राजसत्ता अस्थिर किंवा दुर्बल झाल्याने सुभेदार-जहागीरदार व मांडलिक राजे यांच्यात सत्ता संपादनार्थ यादवी युद्धे सुरू झाली व अशा संघटनांना वाव मिळाला. अनेक ठिकाणी सत्तातंर झाल्याने पराभूत सत्ताधाऱ्यांचे सैनिक बेरोजगार होऊन लूटमारीस उद्युक्त झाले. गरजू राजे व सरदार इत्यादींच्या आश्रयाने वा उत्तेजनाने दुसऱ्याच्या प्रदेशात लूटमार करण्यासाठी धंदेवाईक संघटना उभ्या राहिल्या. स्वतःचे अस्तित्व व दहशत निर्माण करत सत्तेला आव्हान देणे या सह संघटीत गुन्हेगारीद्वारा संपत्ती कमावणे हाही एक हेतू होता.

'ठग हे काली देवीचे उपासक असून देवीची कृपा संपादन करण्यासाठी आपल्या संघटित टोळ्यांतर्फे रक्त न सांडता नरबळी देण्याची त्यांची प्रथा होती' अशी भाकडकथा ब्रिटिशांनी ठगांच्या माथी मारली. ठगांच्या टोळ्यांत हिंदू व मुसलमान या दोहोंचाही समावेश होता. कपटी किंवा धूर्त या अर्थाच्या संस्कृत ‘स्थग’ या शब्दापासून ठग किंवा ठक हे शब्द बनले आहेत. अचानकपणे व मनुष्य बेसावध असताना त्यास गळफास लावून ठार करण्याच्या कृत्याला ठगी म्हणतात. ठग व ठगीची उत्पत्ती कशी झाली याची एक दंतकथाही आहे. रक्तबीजासुराशी कालीने युद्ध सुरू केले; पण त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून असुर निर्माण होत व त्यांच्याही रक्तापासून असुर उत्पन्न होत. तेव्हा देवीने स्वतःच्या घामातून दोन पुरुष निर्माण केले. त्यांना स्वतःच्या पिवळ्या वस्त्राचा एक पट्टा दिला. त्या पट्ट्याने त्या पुरुषांनी असुरांना गळफास लावून ठार मारले. देवी प्रसन्न झाली आणि तिने मनुष्यांना फास लावून ठार मारण्याची व त्यांची संपत्ती घेण्याची आज्ञा त्या दोन पुरुषांना दिली. ठग हे त्या दोन पुरुषांचे वारस होत. या दंतकथेचे मूळ सप्तशतीत सापडते. पण या कथेला कोणताही आधार नाही. ठगवणे, ठकसेन, ठगबाजी हे शब्द देखील ठगांची देण होत.

संघटित वाटमारीची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बरनी याने जलालुद्दीन खल्जीच्या कारकीर्दीत (१२९०-९६) एक हजार वाटमाऱ्यांच्या टोळीचा निर्देश केला आहे. बंगालमध्ये या वाटमाऱ्यांना हद्दपार करण्यापूर्वी त्यांतील प्रत्येकाच्या पाठीवर ओळख पटावी म्हणून डाग देण्यात आले. औरंगजेबाच्या काळात आलेला एक यूरोपीय प्रवासी जॉन फ्रायर याने वाटमारी करणाऱ्या टोळ्यांचा उल्लेख केला आहे. सतराव्या शतकातील झां बातीस्त ताव्हेर्न्ये या फ्रेंच प्रवाशाला ठगीची पुसट माहिती असावी, असे त्याच्या लेखनावरून वाटते. वाटमारी करणारे सर्व ठगच होते, असे म्हणणे कठीण आहे. ठगांचा खरा उपद्रव अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठ्या प्रमाणात वाढला. पेंढारी व इतर लुटारू जनतेची लूटमार करीत. तत्कालीन संस्थानिक व त्यांचे अधिकारी लुटारूंना वचकून असत. तसेच आर्थिक लाभासाठी अशा लुटारूंना ते पुष्कळदा आश्रयही देत. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी सत्ता स्थिर होऊ लागली होती. १७९९ च्या सुमारास इंग्रज-टिपू युद्धसमयी इंग्रजांना प्रथम ठगीचा सुगावा लागला. पेंढारी, ठग, डाकू यांचा उदय व इंग्रजी सत्तेचा विस्तार यांचा अन्योन्य संबंध दिसतो. वाढत्या इंग्रजी सत्तेमुळे देशातील विस्थापित राजांचे सैनिक बेरोजगार झाले. त्यांपैकी बरेच जण डाकूगिरीकडे वळले. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेपासून जी पिळवणूक झाली, त्यातून बंगाल-बिहारमध्ये १७७० मध्ये पडलेल्या दुष्काळात कोट्यावधी लोक मरण पावले वा परागंदा झाले. तेव्हा लूटमारीबरोबर धार्मिक प्रथेचा आधार घेऊन बरेचजण ठगीकडे वळले असण्याचा संभव आहे. ठगी व डाकूगिरीच्या नायनाटासाठी एकोणिसाव्या शतकात डकॉइटी व ठगी नावाचे एक खाते ब्रिटिशांनी उघडले. तत्पूर्वी महादजी शिंदे, हैदर अली, म्हैसूरचा दिवाण इत्यादींनी ठगींचा नायनाट करण्याचे अनेक प्रयत्न केले; परंतु ते अयशस्वी झाले.

गर्व्हनर जनलर लॉर्ड विल्यम बेंटिंगने १८२९ च्या सुमारास ठगीच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली. बंगाल सेनेचा एक अधिकारी कॅप्टन विल्यम श्लीमान याने प्रत्यक्ष कामगिरी बजावली. त्या त्याचा सहकारी विल्यम थॉर्नटन याच्या अहवालानुसार ठगांविषयी रंजक माहिती मिळते. यात म्हटलेय की, मध्य हिंदुस्थान, म्हैसूर व अर्काट या प्रदेशांत ठगीचा सुळसुळाट होता. ३०० ठगांची एक टोळी असे; परंतु बळी घेण्याच्या कामगिरीसाठी ते छोटे गट करीत व सावज हेरल्यावर ते गट एकत्र येत. यात्रेकरूच्या मिषाने ते नि:शस्त्र हिंडत. साधारणपणे पावसाळा सोडून ठगीचा उद्योग चालत असे. सावज हेरल्यावर त्याच्याशी मैत्री करत. पुढाऱ्याचा इशारा मिळताच बेसावध असलेल्या सावजावर हल्ला करून एका टोकाला गाठ असलेल्या पिवळ्या रूमालाने त्यांना फास देऊन, पायाला झटका देत व त्यांची मान मोडून रक्त न सांडता त्याचा बळी घेत. गळफासाला ‘नागपाश’ म्हणत. लघ्घ्यांनी (खड्डे खोदणारे ठग) आधीच उकरलेल्या खड्ड्यात त्यास पुरत. जंगल व त्यातील वाटा, कोरडे ओढे-नाले, वाळवंटी जमीन अशा जागी ठगी केली जाई. श्लीमानला आधी उकरून ठेवलेले असे २५४ खड्डे सापडले होते. प्रेते गाडण्याच्या जागेस ‘भिळ’ म्हणत. यात्रेकरूंच्या खबरी काढण्याचे काम करणाऱ्यास ‘सोदे’ म्हणत. जे वेषांतर करण्यात पटाईत असत. नाचगाणे करणारे लोकही ठगांच्या या टोळीसोबत असत. यांचा कार्यक्रम शिगेला गेला की भटोटे, शमसे नियोजित जागी जात आणि ठराविक ध्वनी करत. ठगांच्या भाषेत याला ‘झीरणी’ म्हणत. बऱ्याचवेळा रुमालाची पट्टी करून त्याच्या बरोबर मध्यात एक जड नाणं ठेवून गळा आवळताना ते नाणं बरोबर नरड्यावर आणून श्वासनलिकेवर अतिरिक्त दाब दिला जायचा त्यामुळे श्वास त्वरेने संपायचा. चंद्र –चांदण्याच्या आधारे काळवेळ निश्चित करत नेटकेपणाने ठगी पार पडे. कधी कधी हाती लागलेल्या मुलांना आपल्या पंथात घेऊन ठगीची दीक्षा देत. ठगीचा धंदा गुप्त ठेवला जाई व कित्येकदा घरातील बायकांनाही त्याची कल्पना नसे. गळफास देण्यात पटाईत व ज्याच्या घराण्यात परंपरागत ठगी आहे, अशा व्यक्तीस टोळीचा जमादार वा सुभेदार नेमत. त्यांची सांकेतिक भाषा होती. बळी घेण्यापूर्वी शकुन पहिला जाई याला कालपाश म्हणत. खड्डे उकरण्याच्या कुदळीला पूज्य मानले जाई. हातातून कुदळ पडणे हा मोठा अपशकुन मानला जाई. जमीनदार, अंमलदार यांच्यात तसेच देवीच्या पूजेसाठी ठगांच्या कुटुंबकल्याणासाठी आणि टोळीच्या सुभेदारास फास घालणारा व इतर ठग यांच्यात ठराविक प्रमाणात लूट वाटली जाई.

ठगांच्या बंदोबस्तासाठी श्लीमानने दोन उपाय योजले होते. ठगांच्या टोळ्यात सामील होणाऱ्यास जन्मठेप देण्याचा कायदा आणि ज्या ठगाचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध झाला होता, त्यास माफीचा साक्षीदार बनवून त्याच्याकडून इतर ठगांची माहिती मिळविणे. अशा उपायांनी १८३१ ते १८३७ या सात वर्षांत ३,००० ठगांना शिक्षा करण्यात आली व अनेकांना फाशी देण्यात आले. १८४० मध्ये श्लीमानचा 'रिपोर्टं ऑन द ठग गँग्ज' हा अहवाल प्रसिद्ध झाला. १८३७ मध्ये थॉर्नटनने 'इलस्ट्रेशन्स ऑफ द हिस्टरी अँड प्रॅक्टिसिस ऑफ द ठग' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १८४० सालापूर्वीच्या तीनशे वर्षांच्या काळात सु. ४० हजार माणसे ठगांच्या गळफासाला बळी पडली असावी, असा अंदाज केला जातो, कॅप्टन श्लीमानचा नातू जेम्स श्लीमानच्या म्हणण्याप्रमाणे रमजान नावाच्या ठगाने तब्बल १,७५० तर रामबक्ष याने ७०० व्यक्तींचे बळी घेतले. आमीर अली या ठगाच्या कबुलीजबाबावर आधारलेल्या "कन्फेशन ऑफ ठग' या पुस्तकाची जेव्हा अभ्यासकांनी चिरफाड केली तेंव्हा तो एक कल्पनाविलास असल्याचे स्पष्ट झाले. खरे तर ब्रिटिशांनी जेंव्हा आपले साम्राज्यविस्ताराचे मनसुबे अमलात आणले तेंव्हा त्यांना राजा महाराजांशी फारसे लढावे लागले नाही पण त्यांच्या वाहतुकीपासून ते साधनसंपत्तीच्या लुटीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना कसून विरोध स्थानिक आदिवासींनी केला. ईशान्यपूर्व भारतात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार, संथाल इत्यादी जमातींनी तर राजस्थानात भिल्ल जमातीने, इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला होता. त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना ठगीच्या कायद्यात अडकवत त्याला धार्मिक झिलई दिली.

अनेक जातींचे लोक ठगीचे काम करत असूनही ब्रिटिशांनी ठग नावाचा वर्ग निर्माण करत त्यात जातींना कोंबले आणि त्यांच्या माथ्यास कलंक लावला. ठगांच्या बंदोबस्तासाठीच्या कायद्यासारखाच आणखी एक कायदा ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ १२ ऑक्टोबर १८७१ रोजी ब्रिटिशांनी केला. या कायद्याद्वारे देशभरातील १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के मारून त्यांचे आयुष्य नासवले आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा कायमची मलीन केली. या सर्व १६१ जातीजमातींच्या लोकांचा अनन्वित छळ केला गेला. यात स्त्रिया, बालके आणि वृद्धदेखील अपवाद नव्हते. आधी काही राज्यापुरता असणारा हा कायदा १९२४ मध्ये संपूर्ण देशात 'क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट,१९२४' या नावाने लागू झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेंव्हा या कायद्यान्वये गुन्हेगार गणले गेलेल्या १२७ जमातीचे १३ दशलक्ष लोक अटकेत वा फरार होते. देशाच्या लोकसंख्येचे तत्कालीन प्रमाण काढले तर दर ३३ व्यक्तीमागे एक व्यक्ती या कायद्याने पिडीत होती, यावरून याची व्याप्ती लक्षात यावी. १९४९ मध्ये हा कायदा हटवण्यात आला. १९५२ मध्ये या कायद्यान्वये गुन्हेगार घोषित केलेल्या या सर्व जमातींना त्यातून मुक्त करण्यात आले. पण यातदेखील या जमातींची एक फसवणूक झाली आणि 'हेबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्ट,१९५२' हा नवा कायदा माथी मारण्यात आला. आधीच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या जाती- जमातीची यादी राज्य सरकारांना जाहीर करण्यासाठी १९६१ साल उजाडावे लागले. हे सर्व होईपर्यंत जाती-पोटजाती आणि जमाती यांच्या विनाशक उतरंडी जीव लावून सांभाळणारया विविध धर्मातील 'सहिष्णू' लोकांनी या गुन्हेगारीचा शिक्क्का बसलेल्या सर्व लोकांना स्वातंत्र्योत्तर छळवादाचे नवे चटके दिले, त्याचे घाव आजही या जातीजमातीच्या जुन्या पिढीच्या मनातून गेलेले नाहीत. आजही ३१३ भटक्या आणि १९८ विमुक्त जाती आपल्या देशात यान्वये नमूद आहेत. ठग समूळ नष्ट झाले पण या लोकांच्या माथी ब्रिटिशांनी मारलेले शिक्के आजही तितक्याच प्रबळतेने समाजात दिसून येतात यावर कुणीच आवाज उठवत नाही आणि आजही हे समाज शोषितांच्या रांगेत आहेत.

- समीर गायकवाड


(टीप - लेखातील माहिती जालावरून साभार) 

1 टिप्पणी:

  1. ठग भारताच्या इतिासातील एक काळे सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही.https://ranjkmarathi.blogspot.com/2022/06/brutalthugofIndiakille940peoplehandkerchief.html?m

    उत्तर द्याहटवा