शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

टुमारो नेव्हर कम्स अनटील इट्स टू लेट ! - 'सिक्स डे वॉर' बाय 'कर्नल बॅगशॉट'...




'सिक्स डेज वॉर' - एका ऐतिहासिक लढाईवरचे अर्थपूर्ण गाणे.... 

जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्त्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं आणि अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात रोज चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. ज्यूंना कधी काळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका आकृतीबंधातून आकारास आली होती. या भूमीचा इतिहास सांगतो की कधी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. विशेष म्हणजे दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम. आताच्या स्थितीत ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या अविरत संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. असो. तर इस्त्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिक (आताचे ईजिप्त, सिरिया आणि जॉर्डन) यांनी कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.


१९५६ मध्ये इस्त्राईलने ईजिप्तच्या सिनाई बेटावर घुसखोरी करून ताबा मिळवला. तीरानच्या सामुद्रधुनी (Straits of Tiran) इस्त्राईली बोटींना असलेली प्रवेशबंदी मोडून काढली. युनायटेड नेशन्सच्या वतीने काही कालावधीनंतर बेटाच्या सीमेवर सैनिक तैनात केले गेले. पण इस्त्राईली सैन्य काढून घेण्याचे कोणतेही करार करण्यात अरब कमी पडले. या नंतर इस्त्राईलने सातत्याने या भागात आपले सामर्थ्य वाढवत नेले आणि तणावाची स्थिती टोकाला नेली. जून १९६७ च्या दरम्यान ही स्थिती इतकी स्फोटक झाली की महायुद्धाच्या झळा त्यातून दिसू लागल्या. इस्त्राईलने आपल्या अजस्त्र नौका आणून या परिसरात उभ्या केल्या. ईजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी सिनाई बेटापासून अरब भूमीकडे जाणाऱ्या १३ किमी (७ नॉटीकल माईल्स) लांबीच्या तीरानी खाडीतून इस्त्राईली नौकांचा मार्ग बंद करण्याची घोषणा केली. ईजिप्तची सेना त्यांनी थेट इस्त्राईलच्या सीमेनजीक उभी केली.

याच घटनेची इस्त्राईल वाट बघत होते, किंबहुना इस्त्राईलने रचलेल्या सापळ्यात अरब अलगद सापडले होते. ५ जून रोजी इस्त्राईलने अकस्मात चढवलेल्या अस्मानी हल्ल्यापुढे ईजिप्शियन सैन्य अक्षरशः गळपटले. एकाच वेळी जमिनीवरून आणि आकाशातून प्रखर विनाशकारी विध्वंसक हल्ले इस्त्राईलने केले. काही तास ईजिप्शियन नेतृत्व गर्भगळीत झाले. चलाखी दाखवत इस्त्राईलने गाझा पट्टीवरही आक्रमण केले. अध्यक्ष गमाल नासेर इतके भेदरले की अधिक मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्यांनी सिनाई बेटावरील इजिप्शियन नागरिकांना तातडीने निष्कासित होण्याचे आदेश दिले. हतबल झालेल्या ईजिप्तने सिरीयन आणि जॉर्डनियन नेतृत्वास मदतीची हाक दिली. त्यांनी तयारी करून युद्धात उतरेपर्यंत इस्त्राईलने आपला हेतू तडीस नेला.

ईजिप्तच्या ताब्यात असलेली गाझा पट्टीची भूमी, सिनाई बेटे इस्त्राईलने दांडगाई करून बळकावली. जॉर्डनकडून पश्चिमी खोरे (वेस्ट बँक) ताब्यात घेतली तर सिरियावर अत्यंत घृणास्पद व अवमानजनक हल्ला चढवत गोलान टेकड्या ताब्यात घेतल्या. इस्त्राईलने इतकं सगळं गिळंकृत केल्यावर अरब राष्ट्रे हैराण झाली. अखेर ८ जून रोजी इस्त्राईल आणि जॉर्डन - ईजिप्तने युद्धबंदीस सहमती दर्शवून आपली मानहानी करून घेतली. चवताळलेल्या सिरीयाला इस्त्राईलच्या आधुनिक व बलाढ्य लष्करी शस्त्रसज्जतेपुढे जेमतेम आणखी एक दिवस तगता आले. अखेर ११ जून १९६७ साली या राष्ट्रांचा युद्धबंदीचा करार झाला.

हा करार म्हणजे अरब राष्ट्राच्या काळजाची भळभळती जखम. आजही या जखमेतून विद्रोहाचा लाव्हा वाहतो. इस्त्राईलने काबीज केलेली भूमीचा ताबा कधीच दिला नाही. युनायटेड नेशन्स तमाशबीन बनून गमजा बघत राहिले. २०००० अरब सैनिक यात मृत्यूमुखी पडले तर इस्त्राईलकडून केवळ १००० सैनिक मरण पावले. या युद्धास 'सिक्स डे वॉर' असे संबोधले गेले. या युद्धामुळे नासेर यांना सत्ता गमवावी लागली. त्यांची प्रचंड मानहानी झाली. इस्त्राईलचा आत्मविश्वास शतपटीने दुणावला. १९७३ मध्ये झालेल्या पुढच्या युद्धात पॅलेस्टीनी जनतेस वेस्ट बॅंकमधून हुसकावून लावण्यात इस्त्राईल यशस्वी झाले तर सोबतच गोलान टेकड्यावरील सिरीयन जनतेस आपली भूमी सोडून परागंदा व्हावे लागले. आजही हा सर्व भूभाग अशांत आणि युद्धग्रस्त असल्याचे पहावयास मिळते.                 

खरे तर सैनिकांना कोणताच मानवी धर्म नसतो, त्यांना फक्त युद्धधर्म असतो, ज्याचा लढाईतला शेवट बहुतांशी मृत्यूतच होतो. मरतात ती माणसे आणि त्यांच्या जोरावर होत राहते धर्मकारण, वर्चस्वाचे सत्ताकारण, वसाहतवादाचे पुनर्वसन. युद्धग्रस्त मानसिकता ही अभिमानाची बाब नसून एक मनोविकृती आहे. यावर संवेदनशील कवीस काव्य न स्फुरले तर नवल म्हणावे लागेल. 

'सिक्स डेज वॉर' नावाचे अप्रतिम गाणं यावर लिहिलं गेलं. अमेरिकन ट्रिप हॉप आर्टिस्ट डीजे शॅडोने हे गाणे आधी गायले. ब्रायन फॅरेली, डेनिस ऑलिव्हेर आणि जॉश डेव्हिस हे या गीताचे गीतलेखक.  'द प्रायव्हेट प्रेस' या अल्बममधून ते रिलीज केले गेले. पण याहीआधी 'कर्नल बॅगशॉट' या ब्रिटिश बँडने याचे खाजगी स्वरूपात सादरीकरण केले होते. १९७० मधल्या त्यांच्याच 'आय क्राय इन द मॉर्निंग' या गीतातील नोट्स वापरत या गाण्याची निर्मिती झाली. त्यामुळे या गाण्याचे क्रेडिट त्यांनाही जाते. हे गाणे तेंव्हा खूप लोकप्रिय झाले होते तर याला विविध लोकांनी विविध चष्म्यातून पाहून त्यावर वर्गवादाची टीकाही केली. 

वर्षामागून वर्षे गेली आणि हे गीत विस्मृतीत गेले. दरम्यान २००२ मध्ये याची रिमिक्स म्युझिक आवृत्ती आली. युकेच्या सिंगल चार्टमध्ये तब्बल २८ वेळा ते शीर्ष स्थानी राहिले. त्यानंतर गाणं पुन्हा विस्मृतीत गेलं. मात्र या वर्षी महमूद ओरहान या टर्की युवा संगीतकाराने कर्नल 'कर्नल बॅगशॉट'शी टायअप करत याची अत्यंत वेगळी आणि रसरशीत रिमिक्स आवृत्ती आणली. त्याने याच्या व्हीडीओत युद्धास थारा न देता बंदीवासात असलेल्या सिरीयन तरुणीची आणि तिची सुटका करायला आलेल्या टर्किश तरुणाची कथा मांडली. गीताचे सादरीकरण अफलातून झालेय. ड्रम्सच्या डीप बासच्या थम्पिंगसोबत सितारच्या स्ट्रिंग्ज जीवघेण्या वाजतात तर बिटस ठेका धरायला भाग पाडतात. महमूद ओरहानला युद्ध नकोय त्याला हवीय शांतता. प्रेम हाच सर्वोच्च धर्म असं तो म्हणतो. टर्किश गावातली धर्मस्थळे आणि खेटून उभ्या असलेल्या घरांच्या रांगा यातुन ड्रोन कॅमेरा लीलया फिरतो. एका अद्भूत सफरीची जाणीव करतानाच गाणं अंतःकरणाला भिडते. 

गाण्याची धृपद पंक्ती महत्वपूर्ण आहे - 'टुमारो नेव्हर कम्स अनटील इट्स टू लेट '
उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल..

असो. युद्धाच्या खुमखुमीने मानवाचे कधीच भले होणार नाही हे जगाला कळेल तो सुदिन होय ..
   - समीर गायकवाड

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




मूळ गीताचा मराठीतील स्वैर अनुवाद -  

युद्धखोरांना थोपवायलाच हवे, आणखी वेळकाढू धोरण अलवंबत राहिलो तर एकदिवस सारं संपलेलं असेल ! 

सप्ताहाच्या प्रारंभीस 
परिषद भरेल, ज्यातली केवळ चर्चा तुमच्या कानी येईल. 
हा केवळ सोमवार असेल (सुरुवातच जणू)

संवाद संपत येतील 
तुम्ही पहाल की नेत्यात असहमती होईल
मग तो दिवस तलवार आणि बंदुकीचा दिवस होईल. 

उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल.. 

तुम्ही जेवण घेत बसलेले असाल
आणि ठोशासारखी बातमी धडकेल
तो मंगळवार असेल

तुम्हाला कधीच वाटणार नाही की आपल्याला युद्धास सामोरं जावे लागेल
पण आपण अशा काही घटना पाहू की 
जणू आपल्याला कुणी एप्रिल फुल केले आहे 

उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल..   

आपण सगळे पळत राहू, भूमिगत होऊ
आपल्याला निव्वळ ध्वनी ऐकू येतील
हा केवळ बुधवार असेल

तुमच्या धुरकटलेल्या निवासात
एक मोठी लोकर घेऊन तुम्ही विणत बसा, 
कारण हा दिवस मोठा असणार आहे

उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल.. 

तुम्हाला आसपास शीळ वाजवल्याचा आवाज येईल
तुम्ही जिवंत आहात की मृत पावलात ?
हा गुरुवार असेल

तुम्हाला धरणीकंप झाल्यासारखे वाटेल
भोवताली लक्षावधी मेणबत्त्या प्रज्वलित केल्यासारखे वाटेल
हा तुमचा वाढदिवस तर नाही ना ?

उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल.. 

एव्हाना ते खुराडे तुमचे घर झालेले असले 
तरी जगण्यासाठी जोपासलेली एक जागा झालेली असते
हा शुक्रवार असेल 

तुम्ही उजेडात येणार आहात का 
तुमचे डोळे हा प्रकाश सहन करू शकतील का 
हा नक्कीच प्रलयदिन असेल

उद्याचा दिवस कधीच येणार नाही तोवर खूप उशीर झालेला असेल.. 

तरीही बॉम्ब निर्मितीच्या बढाया किती तरी जण मारतात
लुप्त होतात, हे गंमतीशीर आहे. नाही का ?
हा शनिवार असेल

मला वाटते उद्याचा दिवस आता उजाडणार आहे पण मला वाटते आता खूपच उशीर झालाय
मला वाटते उद्याचा दिवस आता उजाडणार आहे पण मला वाटते आता खूपच उशीर झालाय

उद्याचे दिवस येत जावो तरीही मला वाटते की आता खूपच उशीर झालाय !

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
मूळ इंग्रजी गीत - 
                                                   
At the starting of the week
At summit talks you'll hear them speak
It's only Monday

Negotiations breaking down
See those leaders start to frown
It's sword and gun day

Tomorrow never comes until it's too late

You could be sitting taking lunch
The news will hit you like a punch
It's only Tuesday

You never thought we'd go to war
After all the things we saw
It's April Fools' day

Tomorrow never comes until it's too late

We'll all go running underground
And we'll be listening for the sound
Its only Wednesday

In your shelter dimly lit
Take some wool and learn to knit
Cos its a long day

Tomorrow never comes until it's too late

You hear a whistling overhead
Are you alive or are you dead?
It's only Thursday

You feel the shaking of the ground
A billion candles burn around
Is it your birthday?

Tomorrow never comes until it's too late

Although that shelter is your home
A living space you have outgrown
It's only Friday

As you come out to the light
Can your eyes behold the sight
It must be doomsday

Tomorrow never comes until it's too late

Ain't it funny how men think
They made the bomb, they are extinct
Its only Saturday

I think tomorrow's come I think its too late
I think tomorrow's come I think its too late

Make tomorrows come I think it's too late

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महमूद ओरहानच्या गाण्याची यु ट्यूब लिंक -  https://youtu.be/1W5BA0lDVLM

मूळ गाण्याची लिंक - https://youtu.be/pHAQA8FJP3c 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा