तेरा डिसेंबर २०१८ च्या सांजेचा हा क्षण अभूतपूर्व म्हणावा असाच होता.
सोबतच्या छायाचित्रातले घर असे आहे की जिथे सभ्य पांढरपेशी लोक नाकाला रुमाल लावतात. इथल्या लोकांचा तिरस्कार करतात. सामान्य लोकं यांच्याबद्दल अत्यंत घृणा बाळगतात. इथे 'त्या' राहतात.
ही अख्खी वस्तीच 'त्यां'ची आहे. इथे सगळ्या गल्ल्यात 'त्यां'चीच घरे आहेत.
रात्र झाली की इथे पाय ठेवायला जागा नसते, 'यां'ची शरीरे उफाणली जातात आणि त्यावर स्वार होतात तेच लोक जे दिवसाढवळ्या सभ्यतेच्या मुखवट्याआड जगत असतात.
काल मात्र इथे एक आक्रीतच झालं.
जनसामान्यांच्या भाषेत ज्यांना साधू संत, सत्संगकर्ते उपदेशक म्हटलं जातं अशी एक सत्शील,शालीन, ज्ञानी, विवेकी, व्यासंगी आणि सिद्धहस्त असामी इथे या वस्तीत आली. त्यांचे नाव मुरारीबापू ! ते आले होते ते ठिकाण म्हणजे कामाठीपुऱ्यातली १३ वी लेन !
एका बदनाम वस्तीत एक सदाचरणी साधूपुरुष आले.
कशासाठी ? तर त्यांच्या सत्संगाचे आमंत्रण देण्यासाठी ! होय आमंत्रण देण्यासाठीच !!
त्यांनी या अभागी महिलांना 'नगरवधू' हे संबोधन लावले. हेच संबोधन भगवान गौतम बुद्धाच्या काळात आम्रपालीस देखील लावण्यात आले होते हे विशेष उल्लेखनीय होय.
नगरवधूंचा (देहविक्री करणाऱ्या महिला) फार मोठा इतिहास आहे. ५०० वर्षांपूर्वी गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये गणिकांचा उल्लेख केला आहे. ते वासंती नामक गणिकेच्या अंतिम समयी तिच्या निमंत्रणावरून एक पद गाण्यासाठी तिच्या घरी गेले होते. संत कबीरांपर्यंत अनेक महात्म्यांनी नगरवधूंना मोठे स्थान दिले.
मुरारीबापू काल म्हणाले की, "सध्या ही मातृशक्ती तिरस्कृत झाली आहे. त्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. या मातृशक्तीला पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठीच रामचरितमानसमधील मानसगणिका कथावाचन कार्यक्रमाचे आयोजन अयोध्येत केले आहे आणि त्यासाठी नगरवधूंना विशेष निमंत्रण देण्यासाठी मी मुंबईत कामाठीपुऱ्यात आलो आहे.. "
मुरारीबापूंनी या आधीही या उपेक्षित शोषित घटकास जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. चक्क त्यांच्या सूरत येथील त्यांच्या निवासस्थानीच काही वारांगनांना पाचारण केले होते. त्यांना स्नेह प्रेमाची उब देत आशीर्वादही दिले होते. तेंव्हाही संस्कारी जगाने डोळे विस्फारले होते.
मुरारीबापूंनी काल एक छोटीशी सभाच इथे घेतली. जवळपास साठ ते सत्तर घरात ते गेले.
जिथे सभ्य माणसे येऊन घृणेच्या पिचकाऱ्या टाकतात तिथे एक साधूपुरुष आल्याने काल कामाठीपुऱ्यास उधाण आले होते.
हा कोण साधू आहे जो आपल्याला बोलवतोय आणि थेट आपल्या बदनाम गल्लीत येतोय, आपल्या अंधारलेल्या दुर्गंधीने भरलेल्या घरांचे उंबरठे ओलांडून आत येतोय आणि आपली विचारपूस करतोय या भावनेने अनेकींना रडू कोसळले होते.
जवळपास सर्व स्त्रियांच्या डोळ्यात आनंदाश्रुंचे सागर लोटले होते.
एरव्ही ग्राहकाच्या शोधात असणारे डोळे मायेने. करुणेने भारावून गेले होते.
काल मुरारीबापूंनी एक ऐतिहासिक उपमा कामाठीपुऱ्यास दिली. ते ,म्हणाले, "कामाठीपुरा ही इतरांसाठी कामाठीपुरा गल्ली असेल, पण माझ्यासाठी ही तुलसी गल्ली आहे !"
बापूंनी या महिलांना महान संतांचे दाखले दिले. ते म्हणाले, 'गौतम बुद्धांनाही उपदेश देण्यासाठी वेश्यालयातून आमंत्रण आले होते. तुलसीदास असोत किंवा गौतम बुद्ध, हे सर्व संत-फकीर निमंत्रण स्वीकारून त्या-त्या ठिकाणी गेले होते. त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला भेटायला, तुमचे दुःख जाणून घेण्यासाठी आलोय...' बापूंच्या या वाणीने उपस्थित महिला गहिवरून गेल्या...
झुबेना बेगमच्या घरात बापू आल्यावर तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. चरणस्पर्श करण्यासाठी ती वाकली, बापूंनी तिच्या पाठीवर हात ठेवत जे उद्गार काढले ते सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवण्यासारखे आहेत, बापू तिला म्हणाले, "मैं कोई साधू या ज्ञानी आदमी बनकर यहां आया नहीं हुं, आज एक बाप अपने बेटी के घर आया हैं !"
किती उच्च कोटीचे हे विचार आणि किती मोठं हे धाडस ! केव्हढी ही नैतिकता आणि किती हा परात्मभाव..
बापूनी अयोध्येस सत्संगास येण्यास राजी असलेल्या स्त्रियांची नावे मागितली आणि सर्व जाती धर्माच्या स्त्रियांनी आपली नावे दिली.
अशीही वेश्यांना जात नसतेच. समाजाच्या लेखी त्यांची जात एकच ती म्हणजे मादी ! आणि त्यांचा धर्म एकच तो म्हणजे विक्रीस काढलेला देहधर्म.
काल या बुरसटलेल्या संकल्पनांना सुरुंग लावायला एक साधूपुरुष या गल्लीत आले आणि त्यांनी जगापुढे एक नवा विचार मांडला.
म्हणूनच पोस्टच्या प्रारंभी म्हटलंय की कालचा दिवस अभूतपूर्व होता ! अविस्मरणीय होता आणि चिरानंदी होता..
इतक्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण घटनेस वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्यांनी नेहमीप्रमाणे उपेक्षितच ठेवले, अगदी यथातथा प्रसिद्धी दिली.
बापू तुम्हाला मात्र सलाम ! तुम्ही जे केलंत ते अनेकांच्या पचनी पडणार नाही आणि अनेकांना या जन्मात ते जमणारही नाही. तुम्ही मात्र थेट मुलीचा दर्जा देत या दुर्मुखल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जी तृप्तता बहाल केलीय तिला कशाचीही तोड नाही.
एक लिहायचेच राहिले. मुरारी बापूंनी अनेकींना साडी चोळी दिली. त्यांच्या हातून ती वस्त्रे घेताना या बायका इतक्या हेलावून गेल्या होत्या की उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मला पक्की खात्री आहे की यातल्या अनेक जणी ती साडी कधीच घालणार नाहीत. त्यांच्या जवळच्या सगळया कपडयांच्या चिंध्या झाल्या तरी बापूंनी दिलेली साडी घालून त्या बाजारात कधीच उभ्या राहणार नाहीत मात्र त्यांच्या मरणानंतर त्यांचे सरण जेंव्हा रचले जाईल तेंव्हा चितेवर ठेवताना त्यांच्या कलेवरास नेसवलेली साडी नक्कीच बापूंनी दिलेली ही साडी असेल !
- समीर गायकवाड
एक लिहायचेच राहिले. मुरारी बापूंनी अनेकींना साडी चोळी दिली. त्यांच्या हातून ती वस्त्रे घेताना या बायका इतक्या हेलावून गेल्या होत्या की उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मला पक्की खात्री आहे की यातल्या अनेक जणी ती साडी कधीच घालणार नाहीत. त्यांच्या जवळच्या सगळया कपडयांच्या चिंध्या झाल्या तरी बापूंनी दिलेली साडी घालून त्या बाजारात कधीच उभ्या राहणार नाहीत मात्र त्यांच्या मरणानंतर त्यांचे सरण जेंव्हा रचले जाईल तेंव्हा चितेवर ठेवताना त्यांच्या कलेवरास नेसवलेली साडी नक्कीच बापूंनी दिलेली ही साडी असेल !
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा