रविवार, २३ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - वेश्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज



एकीकडे काही लोक आहेत जे झपाटल्यागत रेड लाईट एरियातील प्रत्येक मुलीस वाचवण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी देशविदेशातून भारतात येऊन इथल्या दलदलीत रुतलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी कंबर कसून आहेत आणि एकीकडे आपले काही कायद्याचे सुव्यवस्थेचे रक्षक आहेत ज्यांचे या क्षेत्रातले खबरी दिवसागणिक घटत चाललेत. कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही, धूसर भविष्याकडची ही हतबल वाटचाल आहे. वेश्यांकडे पाहण्याच्या मानवी दृष्टीकोनाच्या काही विशिष्ठ बंदिस्त भूमिका आहेत. त्या उध्वस्त होऊन मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितले पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. तीन भिन्नकालीन आणि भिन्न तऱ्हेच्या घटनांचा उल्लेख करतो जेणेकरून लेखाचा मतितार्थ उमगायला मदत होईल.

पहिली घटना -
ब्रिटीश फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉम्पसन २००२ मध्ये मुंबईच्या रेड लाईट एरियात आली होती तेंव्हा कित्येक रात्री ती झोपू शकली नाही. २०१३ मध्य तेथेच ती परत आली आणि तिला ११ वर्षात फक्त तिळभर फरक 

झाल्याचे जाणवले. योगायोगाने ती कामाठीपुऱ्याच्या ज्या चौदाव्या लेनमध्ये आली होती तिथल्या एका बिल्डिंगमध्ये ती गेली. तिथली आंटी (मालकीण) हॅझेलला पुन्हा आलेली बघून तडक आतल्या खोलीत  निघून गेली. ती संधी साधत आठ फूट उंचीच्या त्या खोलीतील पोटमाळयाच्या उघड्या दिसणाऱ्या फळीला बाजूलाच उभी केलेली लाकडी तुकडयांची शिडी हॅझेलने शिताफीने लावली. झपाझपा चढत ती वर गेली. आणि तिला पहिल्यांदा बॉक्स केज ( फडताळात बंदिस्त केलेली जागा) दिसली. त्याची झडप उघडली तर आत एक तेरा चौदा वर्षाची मुलगी होती. हॅझेलने तिथे येताना भारतीय वेष परिधान करून त्यातल्या ओढणीत कॅमेरा लपवला होता. त्या कॅमेऱ्यानेच तिने त्या मुलीची छबी टिपली. नंतर तिने जेंव्हा कधीही हा फोटो पाहिला तेंव्हा तिचा जीव कासावीस झाला, कारण फोटोतल्या कुमारीकेचे आर्त, करुण, भावविभोर डोळे ! असे वाटते की आता निमिषार्धात त्यातून अश्रू वाहू लागतील ...

१४ नोव्हेंबर २०१३ला 'वर्ल्ड अँटी स्लेव्हरी डे' साठी या मुलीचा म्हणजेच 'गुड्डी'चा फोटो प्रकाशित केला गेला तेंव्हा या अभियानाचे सर्वेसर्वा असणारे 'सिल्व्हर ज्युबिली कँपेन'चे डॅनी स्मिथ, फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉम्पसन आणि तिचे सहकारी मार्क कॅरी उपस्थित होते. आयर्लंडमधील अनेक लोकांनी कॅरी यांना अर्थसहाय्य केले असून त्यातून त्यांनी भारतातील रेड लाईट एरियातील अनेक मुली पैसे देऊन विकत घेऊन सोडवल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल वा अतिशययोक्तीही वाटेल पण मार्क कॅरींनी सोडवलेली सर्वात लहान मुलगी फक्त नऊ महिन्यांची होती....

पूर्वी केवळ दिल्लीच्या जीबी रोडवर, मुंबईच्या कामाठीपुऱ्यात आणि कोलकत्याच्या सोनागाछीत आढळणारे बॉक्स केजेस आता सर्वत्र कॉमन झालेत. काही दिवसापूर्वी आपल्या औरंगाबादमध्ये खबरी मित्रांच्या निरोपाच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये देखील या छळपेट्या आढळल्या होत्या. सोनागाछीत तर मुली दिवसा वर कोंडल्यानंतर भिंतीला लाकडी खिळे मारून प्लायवूड पक्के केले जाते, ते अंधार पडल्यावरच खोलले जाते. हा अंधारच त्यांना मोकळा श्वास घेऊन येतो. इतर सर्व वेश्या अंधाराला कंटाळून गेलेल्या असतात आणि या कोवळ्या मुली अंधाराची वाट बघत घुस्मटत जगत असतात. एनजीओंची ताकद नखाएव्हढी आणि समस्या डोंगराएव्हढी असा सगळा कारभार आहे. पोलीस आणि स्कीन करन्सीचे दलाल यांचे इतके मोठे रॅकेट देशभर आहे की त्याला धक्का लागणे देखील कठीण झालेय. मोबाईलने त्यात भर घातलीय. या मुलींची दुःखे आणि त्यांचं जगणं यावर लिहवत नाही.

हॅझेल जेंव्हा ब्रिटनमध्ये परतली तेंव्हा तिला डिप्रेशन आल्यासारखे झाले होते. जर फोटो काढणारा कासावीस होतो, पाहणाराही त्यांच्या दुःखासाठी व्याकुळ होतो मग त्या तलम पंख छाटलेल्या कोवळ्या फुलपाखरांची काय अवस्था होत असेल ?... फोटोतल्या मुलीशी हॅझेलला बोलता आले नाही ही बाब तिला अस्वस्थ करत होती. ती पुन्हा भारतात आली आणि कामाठीपूऱ्यात गेली. तिने गुड्डीच्या मालकिणीचे हात ओले केले आणि त्या मुलीशी दुभाषाच्या मदतीने संवाद साधला. नंतर तिची सुटकाही केली. पुढे जाऊन आपल्या अनुभवावर पुस्तक लिहीले. (तिच्या ई-बुकची लिंक लेखाखाली दिली आहे) अगतिकता, निराशा, वैफल्य, थकवा, भूक, उदासीनता, परात्मभाव, दुःख वेदनांचे अनेक उष्म कढ हे सगळं या फोटोतल्या मुलीच्या डोळ्यात तरळतंय. तिचं कुस्करलेलं बालपण आणि विदीर्ण झालेलं भविष्य यांची विमनस्कता तिच्या चेहऱ्यावर साफ दिसते. तिला प्रतीक्षा आहे अंधाराची. खोल खोल काळ्या कुट्ट अंधाराची. म्हणूनच सांजेला घरी असलो की कधी कधी अंधार लवकर व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो. उजेड असतानाच तुळशीपाशी दिवा लावायचा आग्रह बायकोजवळ धरतो. ती दिवा लावते तेंव्हा अशा मुलींचे डोळे त्या ज्योतीत तरळतात आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

जिथे अशा मुली बंदिस्त असतात त्यांची माहिती जरी अशा एनजीओंना पोहोचवली तरी कित्येक जीव सुटू शकतात. रेड लाईट एरियात सावधपणे फेरफटका मारून बारकाईने माहिती घेतली तरी या चेन्स ओपन होतात. अनेकांची काही तरी करून दाखवण्याची तळमळ असते पण 'मी एकटा काय करू शकतो' ही भावना माणसाला मागे खेचते कारण प्रश्न तीव्र इच्छाशक्तीचा आणि ठोस कृतीचा असतो..

जग हे नावं ठेवायलाच असतं. स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी जरी प्यायलो तरी लोक म्हणतील दारू पितोय. म्हणून मग पाणी प्यायचे सोडून देणार काय ? त्याच धर्तीवर जर रेड लाईट एरियात चकरा मारल्या तर लोक रंडीबाज ठरवतील, ठरवू द्यात त्यांना, (सरडयाची धाव कुंपणापर्यंतच !) पण तिथेही आपल्यासारखीच हाडामासाची माणसं राहतात, ती तर तुम्हाला देव ठरवतील ना ?

दोष नावे ठेवणाऱ्या लोकांचा नसून या समस्येकडे बघण्याच्या प्रवृत्तीचा आहे. मला काही लोक दलालीपासून ते भडवेगिरीपर्यंतच्या उपमा देतात, सोशल मीडियावर तर काहींनी पब्लिक पोस्टमधून देखील माझा उल्लेख रंडीबाज असा केलाय. त्यांचा राग आला नाही पण त्यांची कीव करावीशी वाटली, 'जो जसा असतो जग त्याला तसेच दिसते'. शेवटी आपल्याला कोणी नावे ठेवली म्हणून आपण वाईट होत नाही की कुणी देव म्हणल्याने आपण देव होत नाही. मी तर म्हणेन की, आपण माणूस म्हणूनच राहायचं आणि आपलं 'माणूसपण' सिद्ध करून दाखवायचे, बस्स हेच तर करायचेय !!

हॅझेल थॉम्पसनने काढलेला 'तो'च फोटो लेखासोबत दिला आहे. या विषयावर लेखन करताना मी आजवरचे फोटो ब्लर्ड करून वा स्त्रियांचे/ मुलींचे चेहरे न दिसतील अशा पद्धतीने दिलेले आहेत पण गुड्डीच्या क्लोजअपचा हा फोटो मलादेखील खूप अस्वस्थ करून गेला आणि विथ परमिशन इथे शेअर केला. कारण, नुसतं सांगून हे अनेकांना तंतोतंत पटलं नसतं.

मार्क कॅरींनी पैसे देऊन, अड्ड्यातून विकत घेऊन सोडविलेल्या मुलींच्या सविस्तर बातमीची लिंक - http://www.independent.ie/irish-news/irish-buy-indian-children-to-save-them-from-brothels-29674273.html

दुसरी घटना -
हरियानातील फरिदाबाद इथं २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पकडल्या गेलेल्या जगतार सिंहला पूर्ण उत्तर भारतात कोणत्या रेड लाईट एरियात कुठली मुलगी विख्यात / कुख्यात आहे याची माहिती होती. नवीन पान कट्टा (उत्तरेतील नव्या मुलींचा कोडवर्ड) कुठं आणि 

कितीच्या संख्येत आला आहे हे त्याला नेमकं माहिती होतं. काही वर्षे त्याने पोलिसांना याच्या खबरीही दिल्या होत्या. पण या विश्वात राहता राहता त्याच्यातल्या अपराध्याने उचल खाल्ली आणि १९९७ पासून तो गुन्हेजगतात सामील झाला. २००५ ते २०१८ च्या दरम्यान त्याने केवळ पैशाच्या लोभापायी सात खून केले. दिसायला एकदम मरतुकडा आणि किरकोळ चेहऱ्याचा हा इसम कुणासही अगदी फटीचर वाटे पण याच्याकडे रेड लाईट एरियातली खडा न खडा माहिती होती. त्याने पैशासाठी जेंव्हा मुडदे पाडायला सुरुवात केली तेंव्हा त्याच्यासोबत बिस्तर गरम करण्यासाठी बायकांची रस्सीखेच होऊ लागली.

रेड लाईट एरिया खणून काढताना हा एकच माणूस असा आढळला की जो मोबाईल फोन कसला म्हणून वापरतच नव्हता, मात्र या बदनाम दुनियेतल्या सगळ्या गोष्टी अगदी संबंधितांच्या मोबाईल नंबरसह त्याच्या डोक्यात एकदम फिट होत्या. अनेक दलाल त्याच्या ओळखीचे होते. किंबहुना त्याची भेट घेऊन कोणत्या भागात सेफ्टी आणि रेट जास्त येईल याच्या टिप्स ते घ्यायचे. जगतार सिंह देवीचा भक्त होता. शिकारीवर जाण्याआधी १०८ वेळा कालीमातेचा मंत्र म्हणायचाच ! त्याची ही खोड त्याच्या सहवासातील सर्व बायकांना माहिती झाली होती. रग्गड पैसा हाती आल्यावर त्याच्यातली विकृतीही वाढत गेली आणि या बायकापैकीच एकीने त्याची टीप पोलिसांना दिली आणि आज तो चतुर्भुज झाला. त्याच्या सोबत आणखी तीन साथीदार असल्याचे कळतेय पण त्यांच्याबद्दलची माहिती नाही.

रेड लाईट एरियातील बायकांनी दिलेल्या टीपवरून मुंबईतील एक घटनेचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो.
१९८० ते १९९० च्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्डची दहशत होती, यातलाच एक होता अब्दुल ***. याला बायकांचा प्रचंड नाद होता. कामाठीपुऱ्यातील तेराव्या लेनमधील जयश्री ही त्याची आवडती बाई. याला हुक्की आली की तो तिला आणायचे फर्मान सोडायचा. ती ज्या अवस्थेत असेल जिथे असेल तिथून तिला आणले जायचे. तो तिच्याशी गुरासारखा व्यवहार करायचा. तिचा अक्षरशः पाला पाचोळा करायचा तो. तिचे उजवे स्तनाग्र त्याने चावून तोडून टाकले होते, तिच्या पायाची दोन बोटे कापली होती ज्यात तिने एकदा जोडवी घातली होती. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके देणे आणि जबरी भोगानंतर गुप्तांगात मिरची पूड घालणे वा तापवलेले लायटर घालणे असे क्रूर उद्योग तो करायचा.

एव्हढे करून तिच्या हातावर साधा एक दमडाही त्याने कधी ठेवला नव्हता. मात्र ज्या अड्डेवालीकडे ती राहायची तिच्या हातावर तो नोटा ठेवायचा. तिने पळून जाऊ नये वा जीव देऊ नये म्हणून दोन माणसं तिथं ठेवली होती जी जोडीला भडवेगिरीही करत. जयश्रीने तिला जमतील सगळे मार्ग अवलंबून पाहिले पण तिची काही केल्या सुटका होत नव्हती. मुंबईतील एका प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशालीस्ट इन्स्पेक्टरबद्दल तिच्या एका खास गिऱ्हाईकाने सांगितलं. त्याला भेटण्यासाठीची वेळ आणि संधी तिच्याकडे नव्हती. मात्र त्याच गिऱ्हाईकाने तिला एक आयडिया दिली जी काम करून गेली. बाहेरची वर्दी आल्याचा बनाव करत ती आधी त्याच गिऱ्हाइकासोबत लॉजवर गेली, तिच्या मागावर याची दोन माणसे होतीच. लॉजवरून त्या माणसाचे घरी जायचे आहे असा बहाणा करत ती थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बिगर सरकारी निवासस्थानी गेली.

खरं तर तिथे ती या पाशातून वाचली असती. पण आता त्याला यमसदनास धाडणे हे एकच उद्दिष्ट तिच्या डोळ्यापुढे होते. त्यामुळे तिने आपल्या सुटकेऐवजी त्याला सजा मिळणे हे ध्येय समोर ठेवले. आपली कैफियत तिने तिथं ऐकवली. अक्षरशः निर्वस्त्र होत तिने आपली करुण कथा तिला ऐकवली. तिची ती दारूण अवस्था पाहून त्या स्त्रीचे मन द्रवले. तिने तिला कारवाईचा भरोसा दिला. या नंतर ती गिऱ्हाइकासोबत बाहेर आली आणि पुन्हा कुंटणखान्यात परतली. पण जेमतेम आठवडाभरातच हा क्रूरकर्मा एका एनकाउंटरमध्ये मारला गेला.

तो मेल्यावर काही महिन्याने जयश्रीने धंदा सोडला आणि ती केरळात तिच्या गावी परत गेली. पुढे काही वर्षांनी तिच्यावर गावात बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे कळले. तिचे आरोपी सापडले नाहीत. अशा हजारो जयश्री या दलदलीत खितपत पडल्या आहेत. त्यांना कुणीच वाली नाही. यांची दाद फिर्याद कोण घेणार ? त्या अधिकाऱ्याच्या पत्नीने तिला घरातच घेतले नसते तर वर्तमान काय असले असते याचे उत्तर मिळत नाही. तिच्याकडे नित्याने येणाऱ्या गिऱ्हाईकाने तिला हा सल्ला दिला नसता तर तो नराधम गन पॉइंटवर आला असता का याचेही उत्तर मिळत नाही. जगातला सर्वात बदनाम धंदा आहे हा पण मी इथेच सगळ्यात जास्त माणुसकी पाहिली आहे. तद्वतच अमानुष पाशवी अत्याचार करणारे व सोसणारे जीवही इथेच पाहिलेत. हे भोग कुणाच्याच वाट्याला येऊ नयेत. असो. पोलिसांचे खबरी का कमी झालेत यावर पोलीस खात्याने एकदा संशोधनपर आत्मचिंतनाची मोहीम राबवली तरी अनेक गुन्हे खूप वेगाने उकलतील.

हे सर्व भिन्न टोकाचे विश्व आपण अनुभवताना आणखी एका प्रवृत्तीचे सर्वसामान्य वर्गातले मोठ्या प्रमाणात आढळतात. या वर्गाचेही एक वैशिष्ट्य आहे. हा वर्ग मंटोंच्या साहित्याने झपाटून निघतो पण त्यापुढे जाऊन यांच्या हातून काहीच होत नाही. 'मंटो खूप आवडले', 'त्यांच्या लेखनाने झपाटून गेलो', 'त्यांच्यावरचा सिनेमा खूप प्रभावशाली वाटला', 'माइंड ब्लोईंग लाईफ होती त्यांची' अशा अर्थाचं विविध सृजनांनी केलेलं लेखन मध्यंतरी मंटोंच्या सिनेमाच्या लाटेदररम्यान वाचण्यात आलं. वाचून छान वाटलं. पण सखेद आश्चर्यही वाटलं.

मंटोनी ज्याच्यासाठी संघर्ष केला त्या विषयावर बोलण्याचं अत्यंत त्रोटक अपवाद वगळता अनेकांनी सफाईदारपणे टाळत मंटोंचं गुणगान केलेलं दिसून आलं. त्यांच्या लेखनावर वा त्यांच्या जीवनावर स्तुतीसुमने उधळणं खूप सोपं आहे पण मंटोंचे विचार सार्वजनिक जीवनात पचवणं अवघड आहे याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला.

रांडेच्या जीवनावरच्या कथांची पुस्तके वाचणे किंवा त्या पुस्तकाच्या साहित्यिक मुल्यांची मीमांसा करणे 

सोपं आहे. 'असलं' लेखन करणाऱ्या लेखकाची भलावण केली की आपण सुधारणावादी झाल्याचा आव आणणंही सोपं जातं. पण जर कधी याच रांडांच्या बदनाम गल्लीतून जायचा प्रसंग आला की हेच लोक साईड टर्न करतात किंवा नाकाला रुमाल लावतात. मग मंटों आवडणं हे एक ढोंग होऊन गेलेलं असतं.

मंटो माझ्यासाठी तरी देव आहेत. माझ्यासाठी मंटो हे केवळ लेखक नाहीत किंवा कुणी दिव्य प्रेषितही नाहीत, मंटो म्हणजे एक प्रदीप्त विचारधारा आहे जी हलाहलाहूनही जहरी आहे पण तरीही जीवनदायी आहे ; आपल्याच प्रकाशमान दुनियेच्या एका अंधारल्या कोनाड्यात तिष्टत पडलेल्या लूत भरल्या दुनियेचं ती प्रतिनिधित्व करते. या दुनियेतलं वास्तव अंगावर आरेखताना त्याचे ओरखडे वाचणाऱ्याच्या काळजावर कायमस्वरूपी उठावेत हे मंटोंच्या साहित्याचं प्रयोजन !

नुसते मंटो तर कुणालाही आवडतील पण त्यांच्या प्रयोजनाचं काय ? एखाद्या वेश्येजवळ जाऊन तिच्या लुगडयातला अंधार धुंडाळताना आपलं सत्व टिकवून ठेवून समाजाला आरसा दाखवण्याचं धारिष्ट्य जोवर येत नाही तोवर मंटो आवडून काहीच साध्य होणार नाही. फारतर आपण नवमुक्ततावादी विचारांचे पाईक आहोत याचा जगापुढे दिखावा करता येईल.

आजवरच्या 'रेड लाईट डायरीज' मधील लेखनात अत्यंत अपवादाने रांड हा शब्द मी वापरला आहे. कारण तो शब्दच मुळात वेदनादायी आहे. हिंदीतल्या रंडीचा तो अपभ्रंश आहे. या शब्दाने वेदना होतात आणि अवमानही होतो पण इथे नाईलाजाने तो शब्द वापरावा लागला आहे. भडक वा अश्लाघ्य शब्द वापरले की प्रक्षोभ निर्माण होतो पण परिणामकारकता कमी होते.


तिसरी घटना -

१३ डिसेंबर २०१८ रोजीचा हा क्षण अभूतपूर्व म्हणावा

असाच होता. सोबतच्या छायाचित्रातले घर असे आहे की जिथे सभ्य पांढरपेशी लोक नाकाला रुमाल लावतात. इथल्या लोकांचा तिरस्कार करतात. सामान्य लोक यांच्याबद्दल अत्यंत घृणा बाळगतात. इथे 'त्या' राहतात.
ही अख्खी वस्तीच 'त्यां'ची आहे. इथे सगळ्या गल्ल्यात 'त्यां'चीच घरे आहेत.
रात्र झाली की इथे पाय ठेवायला जागा नसते, 'यां'ची शरीरे उफाणली जातात आणि त्यावर स्वार होतात तेच लोक जे दिवसाढवळ्या सभ्यतेच्या मुखवट्याआड जगत असतात.

या दिवशी मात्र इथे एक आक्रीतच झालं.
जनसामान्यांच्या भाषेत ज्यांना साधू संत, सत्संगकर्ते उपदेशक म्हटलं जातं अशी एक सत्शील,शालीन, ज्ञानी, विवेकी, व्यासंगी आणि सिद्धहस्त असामी इथे या वस्तीत आली. त्यांचे नाव मुरारीबापू ! ते आले होते ते ठिकाण म्हणजे कामाठीपुऱ्यातली तेरावी लेन !

एका बदनाम वस्तीत एक सदाचरणी साधूपुरुष आले.
कशासाठी ? तर त्यांच्या सत्संगाचे आमंत्रण देण्यासाठी ! होय आमंत्रण देण्यासाठीच !!
त्यांनी या अभागी महिलांना 'नगरवधू' हे संबोधन लावले. हेच संबोधन भगवान गौतम बुद्धाच्या काळात आम्रपालीस देखील लावण्यात आले होते हे विशेष उल्लेखनीय होय.
नगरवधूंचा (देहविक्री करणाऱ्या महिला) फार मोठा इतिहास आहे. ५०० वर्षांपूर्वी गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये गणिकांचा उल्लेख केला आहे. ते वासंती नामक गणिकेच्या अंतिम समयी तिच्या निमंत्रणावरून एक पद गाण्यासाठी तिच्या घरी गेले होते. संत कबीरांपर्यंत अनेक महात्म्यांनी नगरवधूंना मोठे स्थान दिले.

यावेळी मुरारीबापू म्हणाले की, "सध्या ही मातृशक्ती तिरस्कृत झाली आहे. त्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. या मातृशक्तीला पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठीच रामचरितमानसमधील मानसगणिका कथावाचन कार्यक्रमाचे आयोजन अयोध्येत केले आहे आणि त्यासाठी नगरवधूंना विशेष निमंत्रण देण्यासाठी मी मुंबईत कामाठीपुऱ्यात आलो आहे.. " मुरारीबापूंनी या आधीही या उपेक्षित शोषित घटकास जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. चक्क त्यांच्या सूरत येथील त्यांच्या निवासस्थानीच काही वारांगनांना पाचारण केले होते. त्यांना स्नेह प्रेमाची उब देत आशीर्वादही दिले होते. तेंव्हाही संस्कारी जगाने डोळे विस्फारले होते.

मुरारीबापूंनी या प्रसंगी एक छोटीशी सभाच इथे घेतली. ते जवळपास साठ ते सत्तर घरांमध्ये गेले. 

जिथे सभ्य माणसे येऊन घृणेच्या पिचकाऱ्या टाकतात तिथे एक साधूपुरुष आल्याने कामाठीपुऱ्यास त्या दिवशी उधाण आले होते. हा कोण साधू आहे जो आपल्याला बोलवतोय आणि थेट आपल्या बदनाम गल्लीत येतोय, आपल्या अंधारलेल्या दुर्गंधीने भरलेल्या घरांचे उंबरठे ओलांडून आत येतोय आणि आपली विचारपूस करतोय या भावनेने अनेकींना रडू कोसळले होते. जवळपास सर्व स्त्रियांच्या डोळ्यात आनंदाश्रुंचे सागर लोटले होते.
एरव्ही ग्राहकाच्या शोधात असणारे डोळे मायेने. करुणेने भारावून गेले होते.

१३ डिसेंबरच्या दिवशी मुरारीबापूंनी एक ऐतिहासिक उपमा कामाठीपुऱ्यास दिली. ते म्हणाले, "कामाठीपुरा ही इतरांसाठी कामाठीपुरा गल्ली असेल, पण माझ्यासाठी ही तुलसी गल्ली आहे !"
बापूंनी या महिलांना महान संतांचे दाखले दिले. ते म्हणाले, 'गौतम बुद्धांनाही उपदेश देण्यासाठी वेश्यालयातून आमंत्रण आले होते. तुलसीदास असोत किंवा गौतम बुद्ध, हे सर्व संत-फकीर निमंत्रण स्वीकारून त्या-त्या ठिकाणी गेले होते. त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला भेटायला, तुमचे दुःख जाणून घेण्यासाठी आलोय...' बापूंच्या या वाणीने उपस्थित महिला गहिवरून गेल्या.

झुबेना बेगमच्या घरात बापू आल्यावर तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. चरणस्पर्श करण्यासाठी ती वाकली, बापूंनी तिच्या पाठीवर हात ठेवत जे उद्गार काढले ते सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवण्यासारखे आहेत, बापू तिला म्हणाले, "मैं कोई साधू या ज्ञानी आदमी बनकर यहां आया नहीं हुं, आज एक बाप अपने बेटी के घर आया हैं !"
किती उच्च कोटीचे हे विचार आणि किती मोठं हे धाडस ! केव्हढी ही नैतिकता आणि किती हा परात्मभाव.

बापूंनी अयोध्येस सत्संगास येण्यास राजी असलेल्या स्त्रियांची नावे मागितली. सर्व जाती धर्माच्या स्त्रियांनी आपली नावे दिली. अशीही वेश्यांना जात नसतेच. समाजाच्या लेखी त्यांची जात एकच ती म्हणजे मादी !  त्यांचा धर्म एकच तो म्हणजे विक्रीस काढलेला देहधर्म. या दिवशी ह्या बुरसटलेल्या संकल्पनांना सुरुंग लावायला एक साधूपुरुष या गल्लीत आले आणि त्यांनी जगापुढे एक नवा विचार मांडला.

म्हणूनच घटनेच्या प्रारंभी म्हटलंय की हा दिवस अभूतपूर्व होता ! अविस्मरणीय होता आणि चिरानंदी होता. कारण या घटनेने या अभागी स्त्रियांकडे आणि त्यांच्या चरितार्थाकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे याचा अत्यंत आदर्श आणि अलौकिक असा अंदाज दिला. तरीही इतक्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण घटनेस वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्यांनी नेहमीप्रमाणे उपेक्षितच ठेवले, अगदी यथातथा प्रसिद्धी दिली.

बापूंना मात्र सलाम ! त्यांनी जे केलंय ते अनेकांच्या पचनी पडणार नाही आणि अनेकांना या जन्मात ते जमणारही नाही. त्यांनी थेट मुलीचा दर्जा देत या दुर्मुखल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर जी तृप्तता बहाल केलीय तिला कशाचीही तोड नाही.
या प्रसंगी मुरारी बापूंनी अनेकींना साडी चोळी दिली. त्यांच्या हातून ती वस्त्रे घेताना या बायका इतक्या हेलावून गेल्या होत्या की उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मला पक्की खात्री आहे की यातल्या अनेक जणी ती साडी कधीच घालणार नाहीत. त्यांच्या जवळच्या सगळया कपडयांच्या चिंध्या झाल्या तरी बापूंनी दिलेली साडी घालून त्या बाजारात कधीच उभ्या राहणार नाहीत मात्र त्यांच्या मरणानंतर त्यांचे सरण जेंव्हा रचले जाईल तेंव्हा चितेवर ठेवताना त्यांच्या कलेवरास नेसवलेली साडी नक्कीच बापूंनी दिलेली ही साडी असेल !

२३ डिसेंबरच्या दिवशी अयोध्येत आपल्या 'मानस गणिक' या प्रवचनमालेचा प्रारंभ करताना पहिल्याच सत्रात सांगितले की, मी वेश्यांना सुधारण्यासाठी आलो नसून स्वीकारण्यासाठी आलो होतो. आजवर वेश्यांचा केवळ सौदा होत राहिला आता त्यांची सेवा करण्याची वेळ आलीय. त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या एनजीओंसाठी मदत केल्याशिवाय आता राहवत नाही. या व्याख्यानास उपस्थित राहावे म्हणून सगळ्या जगात मी आमंत्रण देत फिरतो. तर मग वेश्यांना का कथाश्रवण करण्यास बोलावू नये ? याच हेतूने मी त्यानाही आमंत्रित केलंय. एखादा रुग्ण उपचारासाठी वैद्याकडे जाऊ शकत नसेल तर वैद्याने रूग्णाकडे जायला पाहिजे. त्यांच्याजवळ बसून दोन गोड शब्द बोलले पाहिजेत. मी त्यांना सांगितले की, तुम्ही रामकथा ऐकण्यासाठी अयोध्येत या. प्रभू रामचंद्र तुमचा उद्धार करतील. गांधारी गंभीर आजारी होती तेंव्हा धृतराष्ट्राची सेवा एका वेश्येने केली होती. राम अयोध्येवरून परतले तेंव्हा भरतराजाने त्यांच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी ज्या ज्या लोकांना आमंत्रित केलं होतं त्यात वेश्यांचाही समावेश होता. माझा देव जर त्यांना स्वीकारत असेल तर त्यांना झिडकारून उपेक्षित ठेवणारा मी त्यांचा भक्त भाविक कसा काय होऊ शकतो.

मला वाटते मुरारीबापूंच्या या वक्तव्यात वेश्यांकडे समाजाने कोणत्या नजरेने पाहावे याचे सर्वाधिक मर्मभेदी आणि परखड विश्लेषण आहे.

या तीनही घटनांत समाजाने त्यांच्याबद्दल कशी आस्था ठेवावी, त्यांची सुरक्षा कशी करावी आणि त्यांना कसं आपलंसं करावं याचं मर्म दडलेलं आहे. आता तरी आपण निद्रिस्तावस्थेतून बाहेर येऊन समाजाच्या या वंचित घटकाकडे किमान गांभीर्याने आणि स्नेहादराने पाहायला हवे.

- समीर गायकवाड.
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा