बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

'परमाणू' - पोखरणच्या अणूचाचणीचा सोनेरी इतिहास..



बरोबर २० वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. याच घटनेवर आधारित 'परमाणू' या चित्रपटाचे 'झी सिनेमा'वर आज स्क्रीनिंग आहे. #indiblogger

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

रेड लाईट डायरीज - नवरा की दलाल ?


दिल्लीच्या जी.बी.रोडवरील रेड लाईट एरियातली आजची घटना. (अकरा ऑगस्ट २०१८)  
पानिपतमध्ये राहणाऱ्या सद्दाम हुसेन याने पहिली पत्नी हयात असताना धोकाधडी करत गुपचूप दुसरा निकाह केला होता. तिच्याशी पटेनासे झाल्यावर तिला फिरायला नेतो असं सांगत त्याने थेट जी.बी.रोडवर आणलं. तिथल्या चलाख दलालांनी त्याला बरोबर हेरलं. त्याच्याबरोबरचं 'पाखरू' काय किंमतीचं आहे हे त्यांना नेमकं ठाऊक होतं पण सद्दामला बाई किती रुपयात विकायची हे माहिती नव्हतं. त्यानं बायकोची किंमत दिड लाख रुपये सांगितली. दलाल मनातल्या मनात खूप हसले असतील. काहींनी त्याच्याशी बार्गेन करून पाहिलं. पण सद्दाम आपल्या 'बोली'वर ठाम होता. शेवटी त्याच्यामुळे नसते वांदे होतील म्हणून काही दलालांनी त्याला हुसकावून लावले.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

करुणानिधी - द सुपर थलैवा...


दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील व त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो देखील काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होत असतं. एकमेकाशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी एका पाठोपाठ एक गेले. दोघांनी एकमेकांना इतके पाण्यात पाहिले होते की सत्तेचा लंबक आपल्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित द्वेषमूलक प्रवृत्ती म्हणून दक्षिणेत रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.

पिशवीसूत्र



खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

नव्या युरेशियाची रचना कितपत शक्य ?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, लहरी, एककल्ली आणि मुजोर स्वभावाचे असून त्यांची विचारधारा उजवीकडे कललेली आहे असं वॉशिंग्टन पोस्टने त्यांची उमेदवारी पक्की होताच म्हटले होते. काहींनी हे टीकेचे सुरुवातीचे स्वर कायम ठेवले तर काही ट्रम्प यांच्यासमोर नमले. आपल्यावर टीका करणाऱ्या मिडीयाचा समाचार घेताना तोल ढासळलेल्या ट्रम्प यांनी हे सर्व लोक ‘देशद्रोही’ असल्याची टीका नुकतीच केलीय. ट्रम्प यांचा तीळपापड होण्याचे ताजे कारणही तसेच आहे. ‘द्वेषमूलकतेने ठासून भरलेल्या तथाकथित राष्ट्रवादी लोकांच्या पाशवी समर्थनाच्या आधारे सत्तेत आलेल्या अमेरिकेच्या उद्दाम नेतृत्वास तुम्ही नमवू शकत नसाल तर तुम्ही त्यांचे जागतिक राजकीय महत्व कमी करून त्यांना शह दिला पाहिजे’ अशा अर्थाचे लेख मीडियात साधार मांडणीतून प्रसिद्ध केले जाऊ लागलेत. यातीलच एका लेखात ट्रम्प यांची दादागिरी कमी करण्यासाठी चीन आणि युरोपने एकत्र येऊन नव्याने युरेशियाची सूत्रे जुळवण्यावर प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे 'द इकॉनॉमिस्ट'नेही यावर भाष्य केलंय. या विचारांची ट्रम्प प्रशासनाने सवयीप्रमाणे टवाळी केली. पण यामुळे एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला ज्याची सुरुवात रॉबर्ट कॅपलेनयांच्या एका पुस्तकाने केली होती.

शनिवार, २१ जुलै, २०१८

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर....


जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.

गुरुवार, १९ जुलै, २०१८

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये अठरा जुलै २०१८ रोजी पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.

शनिवार, १४ जुलै, २०१८

नासाची सूर्यावर स्वारी ...


आकाशांत सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असतो. तर ज्याला आपण दीर्घिका म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. हा असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेला आहे. तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप ढगासारखा पदार्थ. आपली सूर्यमाला मिल्की-वे(आकाशगंगा) नावाच्या दिर्घिकेत आहे. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. यानुसार एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. भोवतालच्या तारकासमूहातील ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे सूर्य तयार झाला.

''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्यच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. या अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.

सोमवार, ९ जुलै, २०१८

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...



काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?



व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.