रविवार, १८ मे, २०२५

गोष्ट किन्नरांच्या लग्नाची नि वैधव्याची!



तामिळनाडूमधील कुवग्गम या छोट्याशा खेड्यात 22 एप्रिल ते 6 मे दरम्यान यंदाच्या वर्षीचा, किन्नरांचा इरावन (कूथांडवर) सोहळा संपन्न झाला. आयुष्यात एकदाच किन्नरांचा विवाह होतो! हे लग्न एक दिवसाचे असते. या विवाहाची कथा महाभारताशी निगडीत आहे. पांडवांना वनवासात जावे लागले त्या काळातली ही गोष्ट. या कथेनुसार वनवासात भटकत असणारा अर्जुन नागलोकात जातो. गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्य, याची मुलगी उलूपी ह्या नागकन्येशी त्याचा विवाह होतो, अर्जुनापासून उलूपीच्या पोटी जन्मलेला पुत्र इरावन होय. इरावन हा किन्नरांचा देव! ही उलूपी अर्जुन सदेह स्वर्गाच्या मार्गावर जाईपर्यंत त्याच्या सोबत होती. महाभारतानुसार कुरुक्षेत्रात 18 दिवस चाललेल्या पांडव - कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावनने स्वतःला कालीमातेस अर्पण केले, आपले गुप्तांग दान केले. शिवाय आपले शिर धडापासून अलग केले. त्याच्या या वज्रनिश्चयामुळे श्रीकृष्णाने त्याला जीवदान दिले. मात्र इरावनने ते वरदान नाकारत मरण्याआधी कृष्णासोबत विवाहाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या इच्छेला कृष्णाने मान दिला पण त्यासाठी स्वतःच्या स्त्रीरुपाला पसंती दिली. याकरिता कृष्णाने स्त्रीरूप धारण केले ते म्हणजेच मोहिनी ! (कृष्णाने धारण केलेले हे स्त्रीरूप इतके देखणे होते की आजही मोहिनी या शब्दाचा अर्थ एखाद्यावर गारुड होणे असा घेतला जातो)

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

गुलमोहरावर बंगाली, आसामी भाषेत काही देखण्या कविता केल्या गेल्यात. त्याला राधा आणि कृष्णाचे संदर्भ आहेत.