मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...



ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.

पोळा- मुक्या जीवाचे ऋण...

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

गावाकडची रम्य सकाळ ....


वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. 


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

बिनकामाचे शहाणे...



पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणा' माणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेला, सखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली.
एक उचापतखोर, कुरापतखोर, कपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धी, कुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

सच्च्या प्रेमाची अदुभूत गाथा - अमृता - इमरोजची लव्ह स्टोरी !



एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असतं? जाणून घ्यायचंय? मैत्री, प्रेम यांच्याही पलीकडचं नातं त्यांच्यात होतं! वयाच्या सोळाव्या वर्षी एका हळव्या मनाच्या किशोरीचं लग्न एका असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाशी होतं. ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही. दोघांचे एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य हा सवाल तिला सतावतो. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं. या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच तरल मनाचा, प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो. ती त्याच्यात गुंतते. मात्र एके दिवशी तो आपल्या कवितेच्या शोधात तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो. पुढे ती त्याच्या प्रेमात झुरते. त्याच्यासाठी काव्यरचना प्रसवते - 'आखरी खत' त्या काव्यसंग्रहाचं नाव!

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

रंग 'हरवलेली' रंगपंचमी ...

'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसतेमात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतोहे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतातत्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होतेआपणही त्या क्षणांत हरखून जातोप्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंगकाही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतातत्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतातअशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

सवाल...



एका प्रश्नाचे उत्तर शोधित निघालो होतो तेंव्हाची ही कथा.....
उत्तराच्या शोधात हातोडयाने राजकारणी लोकांच्या डोक्यात खिळे ठोकले तेंव्हा सर्वांचेच रक्त लाल निघाले,
भगवे, हिरवे वा निळे अन्य कुठल्या रंगाचे रक्त कुठेच दिसले नाही.
देशाच्या नकाशात कुठे भाषा, प्रांत, जात, धर्माची कुंपणे दिसतात का बघावीत म्हणून दुर्बीण घेऊन बसलो,
पण कोण्या राज्यांच्या सीमांवर कसलीही कुंपणे दिसली नाहीत.
सर्व महापुरुषांची पुस्तके वाचून काढली, त्यांचे विचार अभ्यासले, त्यांना अनुभवले,
पण एकानेही एकमेकाविरुद्ध लिहिल्याचे कुठे वाचनात आले नाही.
वरपासून खालपर्यंत वाहणारया नदयांचे काही बोडके तर काही समृद्ध खोऱ्यांचे का धुंडाळले,
नदयांचा प्रवाह कुठे भेद करत नव्हता, मार्ग मिळेल तिकडे आरामात वळत होता.