गुरुवार, १३ जून, २०१९

रेड लाईट डायरीज - दाखले


धगधगत्या दुपारच्या असह्य उकाडयातच,
मी तान्हुल्याच्या वाटयाला येते.
कवटाळताच उराशी गच्च त्याला,
रंडक्या भिंतींतले आभाळ गदगदून येते.

कुणास ठाऊक, मातृवत्सल स्तनातील,
दुध किती त्याच्या ओठांत झिरपते!
चिल्बटलेल्या बिछान्यावर उन्मळून पडताच,
माझ्यातली माय अश्रू छातीतून ढाळते.

गर्दुल्ला वासनेचा येताच कुणी दुपारी,
सानुल्याच्या नशिबी सुख तितकेही नसते.
ठणकते रात्र माझ्या गलितगात्र देहातुनी,
तेव्हा अंधारडोहाची मैफिल सजते.

उगवताच सूर्य काळजातल्या वेदनेतुनी,
शरीरसंभोगाचे ग्रहण क्षणिक सुटते.
हुंगताच पुन्हा सांजसर्पाने,
विदीर्ण देहडोलाऱ्यास मी यंत्रवत सजवते.

चमेली मोग्र्यांचे खुनशी कैफ नाचवत,
रात्र पुन्हा पुन्हा देहात माझ्या पाझरते.
झोळीतल्या जीवाच्या मुठी वळूनी राहती सवयीने,
मिठीत माझ्या कैकांचे वासनाविश्व शमते.

सुटते ना कळी येथे चुरगळती किती फुले,
नियतीच्या षंढत्वाचे हे अनंत अनंत दाखले...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा