शनिवार, १ जून, २०१९

महात्मा गांधींनी हिटलरला लिहिलेलं पत्र..

जितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर 

सोशल मीडियावरती अनेक लोक गरळ ओकत असतात. अश्लील, अर्वाच्च शिवीगाळ करत असतात. राजकीय पोस्टवर याचा सुकाळ असतो. विशेषतः असे लोक ज्यांचे समर्थन करत असतात त्यांचे नेतेही अशीच भाषा वापरत असतात, एनकेन मार्गाने हनन सुरु असते ज्याच्या पातळीस आता कुठलाही स्तर उरलेला नाही.
आपण म्हणतो, जाऊ द्या ! कशाला शहाणपण शिकवायचे ? घाणीत दगड टाकला की काही शिंतोडे आपल्याच अंगावर उडतील !
ही माणसं बदलणार नाहीत तेंव्हा आपली डोकेफोड का करावी या विचाराने आपण मुकाट बसून राहतो.
आपल्या डोळ्यादेखत सभ्यतेचं वस्त्रहरण सुरु असते आणि आपण आपल्याशी घेणंदेणं नाही या वृत्तीने मूक राहतो.

तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे ?
असाच प्रश्न गांधीजींना पडला होता.

काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा.
जग युद्धाच्या झळात होरपळून निघत होतं. हिटलरची मनमानी सर्वत्र सुरु होती. एका उद्दाम, हट्टी, एककल्ली, हेकेखोर बोलभांड माणसापायी जगातली मानवता पणास लागली होती. माणुसकीचे शिरकाण सुरु होते.
हिटलरला समजावणीचे चार शब्द सांगणे म्हणजे मृत्यू ओढवून घेणे अशी स्थिती होती आणि त्याला समजावून सांगेल अशा व्यक्तीही कमी होत्या.

गांधींचे काही मित्र या करिता त्यांच्या मागे टूमणे लावत होते की त्यांनी हे काम तडीस न्यावं.
बापूंच्या मनात वेगळंच द्वंद्व सुरु होतं. अखेर हो नाही करत ते तयार झाले.
गांधीजींनी २३ जुलै १९३९ रोजी हिटलरला पत्र लिहिलं.

मूळ इंग्रजी पत्राचा हा स्वैर अनुवाद -
 
~~~~~~~~~~~~~~~~~~

वर्धा, सेंट्रल प्रॉव्हिन्स, भारत.
२३ जुलै १९३९.
 
प्रिय मित्र,
मानवतेच्या भल्यासाठी मी तुम्हाला पत्र लिहिलं पाहिजे अशी आर्जवं मित्र मला काही काळापासून करत होते. परंतू मी त्यांच्या विनंतीस विरोध केला होता, कारण अशा कोणत्याही पत्रामुळे माझ्याद्वारे उद्धटपणा होत असल्याची भावना मनात येत होती. मात्र अज्ञात जाणीवांनी मला सुचवले की मी इतकं हिशोबी होऊ नये आणि मी नक्कीच आवाहन केलं पाहिजे ज्याची किंमत काहीही असू शकते.
आजच्या जगात युद्ध थांबवून मानवतेस निष्ठुर होण्यापासून वाचवण्याची क्षमता असणारे तुम्ही सर्वाधिक पात्र व्यक्ती आहात हे अगदी स्पष्ट आहे. त्याकरिता तुमच्यासाठी मौल्यवान वाटणाऱ्या एखाद्या वस्तूची किंमत चुकवाल का ? ज्या युद्धपद्धतीत अर्थपूर्ण यश लाभत नाही तिचा जाणीवपूर्वक त्याग करणाऱ्या व्यक्तीचं आवाहन तुम्ही स्वीकाराल का ? असो. जर माझ्या लेखनात अनुल्लेख झाला असल्यास मी तुमच्या क्षमाशीलतेचे कौतुक करतो.
 
तुमचा सच्चा मित्र,

एम. के. गांधी.
हॅर्र हिटलर,
बर्लिन,
जर्मनी.
 
~~~~ ~~~~~~ ~~~

काय पडलं होतं गांधींना ? हिटलर आपलं ऐकणार नाही हे त्यांना उमगलं नसेल का ? जो आपलं ऐकणार नाही त्याला सांगावं तरी का ? गांधींची भाषा इतकी संयमाची आणि सबुरीची कशी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे बापूंच्या विचारसरणीत सापडतात. ती ज्याने त्याने शोधावीत आणि आपल्या वकुबाप्रमाणे त्याचा अन्वयार्थ लावावा.
भवताली एखादा माणूस चुकतो आहे हे पाहून डोळे मिटण्याऐवजी किमान एकदा तरी त्याला आपण सांगावं की बाबा रे तू चुकतो आहेस वा तुझा मार्ग चुकीचा आहे. ऐकणं न ऐकणं त्याची मर्जी. पण आपण कर्तव्यविन्मुख का व्हावं ?
 
ही पोस्ट अनेकांच्या पचनी पडणार नाही हे ज्ञात असूनही मी हा उद्योग करतोय कारण वृत्तीत सुधारणा करायचीय की अधःपतन होऊ द्यायचेय हा व्यक्तीसापेक्ष मुद्दा आहे हे मान्य, म्हणून मी आवाहन करणे सोडावे का ? नक्कीच नाही ! म्हणूनच ही पोस्ट !
 
- समीर गायकवाड.

~~~~~~~~~~~~~

अवांतर -
८ मे २०१९ रोजी सुरु झालेल्या व्हेनिस येथील 'ला बिनाले डी व्हेनिजिया' या ५८ व्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनात जितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर समाविष्ट आहे. या प्रदर्शनातील ते एक मुख्य आकर्षण ठरले आहे हे सांगायला नको ! याची प्रतिमा पोस्टसोबत दिली आहे. सौजन्य - द ऍटलांटीक.
 
(पोस्टसोबत दिलेली बापूंच्या पत्राची फोटोकॉपी जालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा