रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

'निसर्ग'सत्व...


हिरवी पिवळी पानं असलेल्या निंबाच्या साली वाळून खडंग झाल्यात. कोवळ्यापिवळ्या उन्हाच्या माऱ्याने सालं दिवसागणिक फाकत चाललीत, त्यात बारीक फिकट तांबड्या चिकट मुंग्यांची रांग शांततेत एका तालात जातेय. दोन रांगा आहेत एक फांद्यांकडे जाणारी आणि एक बुंध्याकडे जाणारी. काही वेळापूर्वी एका अजस्त्र तेलमुंगळयाचे कलेवर त्यांनी खाली नेलंय. वीसेक मुंग्यांनी आपली ताकद, आपलं कौशल्य पणाला लावत त्याला अलगद आपल्या अंगाखांदयावर उचलून खालच्या दिशेने नेलंय. बुंध्यापासून वावभर अंतरावर त्यांचे घर असणार. दूर असलेला पावसाचा मौसम सुरु व्हायच्या आधी आपल्या खाण्याच्या चीजांची त्यांना बेगमी करायची आहे. त्या सतत वरखाली करताहेत आणि जमेल तितका साठा करताहेत. एक सूत्रात त्यांचे काम सुरु आहे. शेजारच्या झाडावरून टिकटॉक आवाज करत त्यांच्याकडे बघत अचानक वेगाने येणारया खारूताईची त्यांना खूप भीती आहे पण तरीही ते कामात गर्क आहेत. फांदीच्या तोंडाशी असलेल्या फुगीर गाठी खुल्या होऊन त्यातून बाहेर येणारया लालसर काळया डिंकात एका मुंगीचे इवलेसे पाय अडकलेत, काही क्षणात ती थिजेल किंवा मरेल. तिने त्यांच्या भाषेत काही इशारे केलेत. त्या सरशी वीसेक मुंग्या रांग मोडून तिच्या भोवती गोळा झाल्यात. अत्यंत वेगाने त्यांच्या हालचाली सुरु झाल्यात. काहींची डोकी एकमेकाला धडकताहेत, बहुधा त्या संदेश देत असाव्यात. पसरत चाललेल्या डिंकाच्या स्त्रावात त्यांनी एक नवी रांग कडेने बनवलीय आणि बाजूने अडकलेल्या मुंगीच्या मागच्या बाजूने स्त्राव अडवलाय. आणखी काही क्षणात तिचे सुईसारखे पाय वाळले तर ती हलू शकते. नव्हे तिला हलावेच लागेल. कारण मागच्या मुंग्यांनी अडवलेला स्त्राव त्या सगळ्यांना अडकवू शकतो आणि परिणामी त्या सगळ्यांचा जीव जाऊ शकतो. पाय गुंतून बसलेल्या मुंगीने आता निकराने पाय हलवलेत, तिच्या हालचाली सरशी तिच्या मागे शिरलेल्या मुंग्या एका झटक्यात बाजूला झाल्यात. त्यांच्या डोक्यांची भेंडोळी हलवत सगळ्या मुंग्या मूळ रांगात परत गेल्यात. रुतून बसलेली मुंगी काही क्षण सालीच्या एका तंतूला धरून शांत बसली आणि निमिषार्धात ती ही रांगेत सामील झालीय. ही सगळी कसरत दुरून पाहणारं लाल करड्या रंगावर पांढरे ठिपके असणारं एक फुलपाखरू यानं आनंदून गेलं आणि आपल्या पंखांना फडफडवत हसतमुखाने उडून गेलंय. सालीच्या सांदीत अडकून बसलेलं एक पिवळं पान डोळे पुसत खाली घरंगळलंय आणि बुंध्याच्या मुळाशी झेपावलंय. वरून खाली येऊ लागलेल्या त्या पिवळ्या पानाला घेऊन वारा त्याला अखेरची सैर घडवून आणायला चिंचेच्या पट्टीत शिरलाय, निंबाच्या पिवळट जीर्ण पानास बघून मातीवर लोळत पडलेल्या चिंचेच्या गुंजपत्त्यासारख्या पानांनी एकच फेर धरून निरोपगाण्यावर नाच सुरु केलाय. चिंचेच्या फांद्यातील घरटयातून डोकावणारया होल्यांच्या पिलांनी डोळे मोठे करत पानांच्या लयीवर ठेका धरलाय. इकडे निंबाच्या शेंडयावर सकाळी उगवलेल्या पालवीची मिटलेली घडी उघडलीय आणि सूर्याच्या कडकडीत किरणांना डोक्यावर घेत एक अवखळ स्मितहास्य केलंय. उन्हांना नावे ठेवत सावलीत बसलं की सकल चराचराच्या अद्भुत नादात सामील होता येतं. किती ही कडक ऊन पडलं तरी झाडांच्या कोवळ्या पानांना कान लावले तर त्यांच्या कन्हण्याचा आवाज ऐकता येईल. काही दिवसांपूर्वी पानगळ सुरु झाली होती तेंव्हा झाडावरच्या जुन्या पानांनी नव्या कोवळ्या पानांना जगण्याचा मंत्र शिकवलाय तो ऐकता येईल. 'पावसाची आर्जवं करायची नाहीत की त्याला भ्यायचंही नाही, आणि त्याच्या कुरवाळण्यालाही नाही भुलायचं. आपलं काम चोख करत राहायचं, मातीच्या वचनाला जागायचं.' हाच तो मंत्र.


आणखी बरंच काही पानांकडून शिकता येईल. उन्हे कमी जास्त होत असतात, त्याची सवय करून घ्यायची नाही तर आयुष्य कसं रंगायचं ? उनाड वाऱ्याच्या तालावर नाचायचं, पण त्याला शरण नाही जायचं ! जगण्याचा कंटाळा येऊ द्यायचा नाही, मात्र जीवनातले सत्व संपले तर कडाडत्या वीजेलाही कवेत घ्यायला मागेपुढे नाही पाहायचं . कुऱ्हाड हाती घेऊन आलाच कुणी दोन पायाचा जीव तर त्याला उदार अंतःकरणाने क्षमा करायची. त्याची फळे त्याला मिळतीलच आपण त्याच्या ऱ्हासास कारणीभूत नाही व्हायचं !" जुनी झालेली करडी-पिवळी पानं डबडबल्या डोळ्यांनी सांगतील की, ‘एके दिवशी पाऊसच या कोवळ्या पानांचे डोळे पुसेल आणि मग ती पाने जीवनानंदात न्हाऊन निघतील.' खरंच सृष्टीचं हे चक्र खूपच लोभसवाणं असते. ते अनुभवण्यासाठी आपण फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे ! पण आपण याचा अनुभव घेणं सोडा या चराचराला ऊध्वस्त करण्यास जणू कटीबद्धच झालो आहोत.

सतत कमीजास्त होणाऱ्या टोकाच्या थंडीने आणि अवकाळी म्हणता म्हणता दोन दिवसाआड येणाऱ्या गर्द आभाळाने, त्याच्या जोडीला रोज दुपारच्या काहीशा कडक उन्हाने शिवारातल्या झाडांच्या तडकल्या सालीतले डिंकाचे ओघळ अर्ध्यात तुटलेत, मुंगळयांच्या रांगा तुटल्यात, तेलमुंगळे बुंध्यात रुतलेत, कळ्या नीट उमलत नाहीत, उन्हं माथ्यावर येण्याआधीच फुलं सुकू लागलीत, घरट्यांची काटकी ढिली झालीत आणि झाडं खूपच लवकर पानमोकळी झालीत, आधीच विणीचा हंगाम बिघडल्याने रानपाखरांची घरटी फारशी गजबजलीच नाहीत तशात एकीकडे संध्याकाळ झाली समजून पक्षी दुपारीच परतताहेत अन दुसरीकडे चोच उघडी ठेवून पिल्लं मरून जाताहेत ! पर्यावरणाचा सूरताल बिघडवणारा माणूस नावाचा द्विपाद प्राणी मात्र हवं तेंव्हा स्वेटर घालतोय अन दोन दिवसात पुन्हा कोंबून ठेवतोय मधूनच रेनकोटही घालतोय, सनकोटही वापरतोय ! माणसाने स्वतःला बदलायला हवं अन्यथा त्याला यातलं काहीच अनुभवता येणार नाही, कदाचित त्याचंही अस्तित्व संपून जाईल. म्हणून तरी त्यानं या चराचरास नक्कीच ऐकलं पाहिजे.

पानांची जशी कैफियत असते तशीच मातीचीही एक आर्त गाथा असते. तीही ऐकता येते. पण त्यासाठी आधी चंद्रसूर्य उमगायला हवेत. कारण अस्ताला जाणारा सूर्य निशेच्या कानी त्याची व्यथा सांगत असतो. तो सांगतो की, 'कडाक्याच्या थंडीचा चंद्र फायदा घेईल अन अंधार दाट होताच चांदण्यांची नक्षी तुझ्या देहावर काढेल.' यावर मग रात्र उत्तरते, "माझ्या कुशीत तू वसुंधरेला खुशाल झोपवून जातोस. अशा रात्री ती हमखास उफाणते. तिचे मी काय करू ?" मग निरुत्तर झालेला सूर्य अंधारयात्रेस निघून जातो आणि दिगंताच्या तळाशी प्रेमज्वराने तळमत असलेल्या मातीचं आभाळगाणं चंद्र आळवतो ! चांदण्या ते ऐकतच अंधारपावलांनी मातीच्या देहात विरघळत जातात.

हे झालं पानांचं आणि मातीचं. फुलांचंही स्वतःचं एक ललित असतं. ध्यान देऊन पाहिलं तर लगेच कळतं. झाडावरून गळून पडलेलं कोमेजलेलं, गंध मालवलेलं निस्तेज फुल हळुवार मातीवर पहुडतं. माती त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारते,
"काही त्रास नाही ना झाला ?"
सुकून गेलेलं फुल देठापासून देह हलवण्याचा यत्न करतं आणि नाही म्हणून पाकळयानेच खुणावतं. त्या फुलाला आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेली माती कातर आवाजात पुन्हा विचारते, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"
मातीच्या त्या प्रश्नाने फुलाच्या म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकतं. फुल म्हणतं, "निमिषार्धासाठी वाईट वाटतं. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "
फुलाचा खुलासा ऐकून माती प्रतिप्रश्न करते, "तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस. आता काय करणार ?".
यावर दीर्घ उसासा टाकत फुल म्हणतं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन. वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन. मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !"
फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेली माती त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेते. काही वेळ निशब्द शांततेत जातो आणि पुढच्याच क्षणी येणारी मंद वाऱ्याची एक झुळूक फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन जाते.'

फुलाचं हे ललित गहिवरून टाकतं. आपल्याला ते खूप भावतं कारण आपलं आयुष्यही असंच आहे. संसार, कुटुंब, आप्तेष्ट, मित्र ही सगळी या आयुष्यरुपी झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. मग सुरु होतो हरेक जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. मृत्यूचं सत्य ! आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं. नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो ! पण त्यासाठी आपल्याला निसर्गाचं हे जीवनसत्व उमगायलाच हवं !

- समीर गायकवाड.

२ टिप्पण्या: