सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे.
सर्रास असं दृष्टीस पडत असतं की एखाद्या व्यक्तीने जीवापाड मेहनत करून आपल्यासाठी एखादी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ त्याच्या हातून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कुणीही कानाडोळाच करतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. इथं शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.
हिरोजी इदलकर आणि रायगड यांचे नाते मायलेकरासारखे आहे. हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करून रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. ६ जून १६७४ रोजी जेंव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली.
वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती.
ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली.
शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली.
याहीपुढे जाऊन महाराजांनी आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करून घेतली. त्याचा करार रद्द केला.
हिरोजी आपल्याला खूप जवळचे आहेत त्यांनी विकत घेतलेली पाटीलकी आपण कशी काढून घ्यावी असा दुबळा विचार राजांनी केला नाही, मंडाजी निगडे यास त्याचा मूळ हक्क दिला, मल्हार निगडेवर कारवाई करताना त्याची देशमुखी काढून घेतली आणि रयतेच्या खजिन्यात अनामत जमा केली.
या पत्रातून शिवाजी राजांचा अचूक न्याय दिसतो, न्यायसमानता दिसते आणि न्यायासाठीची कठोरताही दिसते.
शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्मास या असं म्हणत आपल्या अंगावरची जबाबदारी ढकलून पुन्हा त्यांच्याकडूनच सगळ्या आशाअपेक्षा करण्यापेक्षा या शिवजयंतीला संकल्प करूयात की त्यांचा एक तरी गुण आपण सकल आत्मसात करूयात.
- समीर गायकवाड.
~~~~~~~~~\~~~~~~~
अवांतर -
९ सप्टेंबर १६७५ रोजीचे हे पत्र आहे. या पत्राच्या सुरुवातीस जी मुद्रा आहे तो शिक्का आहे कारण तो प्रारंभी आहे. पत्राच्या अखेरीस जी मुद्रा आहे त्यातून पत्राचा मजकूर इथंच संपत असल्याची ग्वाही दिली जात असल्याने त्याला मोर्तब म्हटलं जातं. आपल्या वापरात असलेल्या 'शिक्कामोर्तब' या शब्दाची पार्श्वभूमी ही अशी दोन शिक्क्यातली आहे.
या पत्रातील प्रारंभीचा शिक्का (Opening Seal) - "श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर" असा आहे. अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख प्रधान मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे यांचा तो शिक्का आहे. त्यामुळे तो पत्राच्या डाव्या बाजूस दोन ओळी सोडून खाली आहे. इथे जर शिवराज्यमुद्रा ( प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुविश्व वंदिता। शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।) असती तर पत्रातील मजकुराच्या वरती तिचे स्थान असले असते. कारण राजमुद्रा, मजकूर, डाव्या बाजूस मंत्र्याचा/ प्रधानाचा / कोशागाराचा शिक्का, पुन्हा मजकूर आणि अखेरीस मोर्तब असा एक लेखनसंकेत होता.
या पत्रातील मोर्तब शिक्का - 'मर्यादेयंविराजते' असा आहे. 'विनम्रतापूर्वक (पत्र) संपन्न झाले' असा त्याचा अर्थ.
~~~~~~~ ~~~~~~~
पत्रातील मोडी भाषेतला मजकूर -
मशरहूल अनाम बालाजी कुकाजी प्रभू हवालदार कारकून पांl सिरवल
प्रति राजश्री शिवाजीराजे सुहुरसन सीत सबैन व अलफ मलारजी निगडे देसमुख पाI
( डाव्या बाजूस मुद्रा - श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर)
मजकूर याणी कीकवीची पाटीलकी मंडाजी नीगडा याची असता हिरोजी इदलकरास वीकत दिल्ही साईबी देसमुखी याचा अमानत करून तुम्हास रोखी पाठवीला.
यैसीयास साईबी मनास आणुन मलारजीकडून हिरोजीचे पैके देवीले.
पाटीलकी मंडाजीची मंडाजीस दिल्ही
मलारजीवरही मेहरबानी करून देसमुखी मोकली केली आहे
तरी देसमुखी अमानत म्हणून तुम्हास रोखा पाठवीला असे तो रोखा बजींनस हुजूर पाठवणे.
हुजरून रोखाच रद करून जाणीजें
छ २८ जमादिलाखर परवानगी हुजूर मोर्तब सुद
(पत्राच्या अखेरीस मुद्रा - मर्यादेयंविराजते)
~~~~~ ~~~~~~~~ ~~~~~~~~
संदर्भ नोंदी -
पुराभिलेख प्रकाशनाच्यावतीने १९८८ मध्ये प्रकाशित केलेल्या 'शिवछत्रपतींच्या पत्रांचे प्रतिरूपदर्शन' या पुस्तकात या पत्रास प्रथम प्रसिद्धी देण्यात आली.
पुणे पुराभिलेखागार (पेशवे दप्तर) येथे हे पत्र उपलब्ध आहे.
जाणता राजास मुजरा
उत्तर द्याहटवाधन्यवाद देवा..
हटवाबापूं...खूप माहितीपूर्ण
उत्तर द्याहटवाबापूं...तुम्ही यावर लेखमाला चालवावा अशी ईच्छा आहे...
उत्तर द्याहटवाधन्यवाद माहिती दिल्याबद्दल
उत्तर द्याहटवा