बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

धर्मराज...


तिच्या काळ्या पाठीवरचे
सिग्रेटचे जांभळेकाळे व्रण पाहायचे होते

करकचून चावलेला मांसल दंडाच्या
मागचा भाग बघायचा होता
 
दात उमटलेलं कोवळं कानशील
चाचपायचं होतं

उपसून काढलेल्या डोक्यातल्या केसांच्या बटांना
स्पर्शायचं होतं

ब्लीड झालेल्या पलंगाच्या
कन्हण्याचा आवाज ऐकायचा होता.
 
वळ उमटलेल्या गालाचा
फोटो हवा होता

बुक्की मारून फाटलेल्या
ओठांचे रक्त पुसायचे होते

जांघेत आलेले वायगोळे
मुठी वळून जिरवायचे होते

पिरगळलेल्या हातांची
सोललेली त्वचा निरखायची होती

घासलेल्या टाचांच्या छिललेल्या कातड्यावर
फुंकर मारायची होती

छातीवरच्या चाव्यांना
जोजवायचं होतं

थिजलेल्या अश्रूंचे कढ प्यायचे होते.
या सर्वांची तिला असीम आस होती.

आता ती जून झालीय,
सरावलीय.

आता तीच सिग्रेट पीते
धुराची नक्षी काढते

तिचे मांसल दंड ढिले झालेत,
कानशीलाच्या निर्जीव पाळ्या लोंबतात

आता ब्लीड होत नाही
पिशवी काढून टाकलीय.

ती पक्की सराईत झालीय.
गाल, ओठ, काया, टाचा, वक्ष, कटी, नितंब

सगळं बधीर झालंय
इतकेच काय अश्रूही नुरले आता
जांघेतले वायगोळे तिच्या मेंदूत आता पुरते विरघळलेत

दशकांपूर्वी तिला इथं आणून विकणाऱ्या धर्मराजाच्या शोधात आहे मी...
तोवर यल्लमेच्या पूजेत संस्कृतीचे सरण सजवावे म्हणतो...

- समीर गायकवाड.

२ टिप्पण्या: