‘वपुर्झा’मध्ये व. पु, काळे लिहितात की, “एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमीनीवरच आहोत.“
किती महत्वाची गोष्ट आहे ना ही ! की आपण रोज काही तरी हरवत असतो आणि आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. आपण नेमकं कशाला मुकतो आहोत हे अचूक उमगले नाही तरी चालेल पण त्याचा थोडासा का होईना अंदाज यायला हवा. मग आपले अनुभव समृद्ध होत जातात, मग जगणं विराट आणि उत्कट होतंच ! यासाठी कुणी लेखक कवीच असायला हवं असं काही नाही. कोणत्याही सामान्य माणसाला हे शक्य आहे,
उत्तम कांबळेंच्या 'आई समजून घेताना'मध्ये एक वाक्य आहे- 'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत?...' कांबळेंची अक्का(आई) त्यांना दरडावून विचारते. ते निरुत्तर होतात आणि हातातले पुस्तक बाजूला ठेवून मी ही विचारमग्न होऊन जातो. लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावते, तोंडातून लाळ गळेपर्यंत गतकाळातल्या विनवण्या आठवायला लावते. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते....
हा झाला स्वभावाचा एक पदर. याची दुसरी बाजू थोडीशी आहे. ज्या लोकांनी आयुष्यभर इतरांच्यासाठी नुसत्या खस्ता खाल्लेल्या असतात ते आयुष्याच्या संधीकाळी सुख, स्थैर्य मिळाले तरी चिडचीडे, तुसडे होतात. सतत आत्मक्लेशी वृत्ती बाळगतात. त्यांना सुखच पचवता येत नाही इतके ते दुःखाच्या अधीन झालेले असतात. उत्तम कांबळेंचे हे पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यापुढे माझी आई येते. अख्खं आयुष्य तिनं घरादारासाठी अक्षरशः झिजवले. स्वतःसाठी म्हणून ती कधीच जगली नाही. माझ्यासहीत घरातल्या सर्वांनी तिचंही व्यक्तिगत आयुष्य असेल, विचार असतील, हौस मौज असेल, आवडी निवडी असतील या गोष्टीचा झपाटून विचार केला नाही. आता ती थकलीय. आता मला स्वतःचीच लाज वाटते. मी अजूनही आईजवळच राहतो. तिला जमेल तितके सुख देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित यामुळेच उत्तम कांबळेंनी त्यांच्या आईचे जे वार्धक्य मांडले आहे ते काळजात खोल खोल रुतत जाते.
या पुस्तकात लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखक विचारतात, 'जेवलीस का?' ती म्हणते , 'ढकलंलं दोन तुकडं पोटात'. 'कशी आहेस?' असे विचारल्यावर म्हणते, 'कसंचं काय, मरण जवळ आलंय'. 'डॉक्टरांकडे जाऊया का? 'डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो?' असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट हेच तिच्या तुसडेपणाला कारणीभूत झालेत. आजच्या सुखात भूतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी तिला आजही आठवतात. 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणीत लेखक रमून जातो. पैसे नसल्यामुळे डोक्याच्या केसांचा पुंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई) मुलांना देणारी आई त्यांच्या डोळ्यापुढून हलत नाही. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी व्यक्ती मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी ती गप्पा मारत उभी राहू लागते. तिने असे वागताना लेखकास ऑकवर्ड वाटत राहते. स्वतःला टी. बी. झाल्याचे कळताच ती आपण होऊन नातवंडापासून दूर राहू लागते तेंव्हा कांबळेंना खूप वाईट वाटते. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून 'आई समजून घेताना' लेखकाची आणि पर्यायाने वाचकाची दमछाक होते. तरीही आपण कुठेतरी त्यात आपली आई शोधत राहतो.
हे पुस्तक वाचल्यावर प्रत्येकाला भरभरून बोलावसं वाटतं आणि त्याचबरोबर आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. 'आईं समजून घेताना' वाचून झालं की आपण आधी स्वतःला समजून घेतो हे जास्ती महत्वाचे आहे. प्रत्येक आई आपल्या प्रत्येक मुलाला पुरेपूर ओळखून असते पण क्वचितच एखादं मुल असं असतं जे आपल्या आईच्या प्रत्येक अणुरेणूंना ओळखतं, तिच्या अंतरंगातील सर्व सुखदुःखाशी आपली नाळ जोडून ठेवतं. पण एकुणात अशा पोरांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे ! तरीही कधी कुठल्या आईला या गोष्टीचे कधी वैषम्य वाटल्याचे आजवरच्या वाचनात आले नाही....
ज्याही सृजनाचं अनुभवविश्व अशा विविध पद्धतीने समृद्ध होत जातं त्यांनी अंतःकरणापासून काही सच्चे शब्द जरी लिहिले तरी त्यांच्या लेखनास वेगळीच धार येते, वेगळाच साज चढतो. कारण त्यात असतो सच्चेपणा आणि नितळ मनाचा आरसा. याची अनेक साहित्यिक उदाहरणे देता येतील. 'कोसला'चा नायक पांडुरंग सांगवीकर असो की 'चित्रकथी'चा निवेदक सौंदणीकर असो ही फक्त नावे असतात. या पात्रांमागचे अनुभवविश्व आणि जीवनतत्व हे त्या लेखकांचेच असते. भालचंद्र नेमाडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या उमेदीच्या वयात जे भावविश्व अनुभवले त्याचे हे अनुक्रमे शब्दाविष्कार होत. सच्च्या लेखकाने कितीही प्रयत्न केला तरी तो खोट्या व्यक्तीरेखा उभ्या करू शकत नाही हे अस्सल लेखकाचे लक्षणच म्हणावे लागेल.
'सारे प्रवासी घडीचे' हे जयवंत दळवी लिखित पुस्तक दाखवून देते की दळवींचे बालपण किती अफाट आणि उत्कट अनुभवांनी नटलेले होते, त्याला मानवी स्वभावाच्या नानाविध कंगोऱ्यांची किनखापी किनार होती. वाचणारा कुणीही त्याच्या प्रेमात पडेल असं ते पुस्तक होतं. तरीदेखील पुस्तकाच्या अखरेच्या पानावर दळवी लिहितात की यातील सर्व व्यक्तीरेखा आणि सर्व घटना काल्पनिक आहेत, खोट्या आहेत ! असे असूनही त्यातला सच्चेपणा तसूभरही कमी झाला नाही. पु.लं.चा नंदा प्रधान ही त्यांनी अनुभवलेल्या महाविद्यालयीन जीवनातील एक रसरशीत अनुभव होता, व.पुं.चा 'पार्टनर' देखील दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचेच ते स्पंदन होते.
शंकर पाटील यांच्या 'शाळा'मधला मास्तर आणि 'नाटक'मधला गुलाब हेरवाडे ही सगळी जिती जागती माणसं होती जी पाटलांना त्यांच्या जीवनसफरीत भेटली होती. त्यांचाच दारुडा 'रामा धायगुडे'ही असाच आपलासा वाटतो. श्री.म.माटेंच्या 'उपेक्षितांचे अंतरंग'मधील सत्य रामोशी, बन्सीधर, पुरंदरचा नामा ही सगळी त्यांना भेटलेली माणसं, माटे त्यांना शब्दरूप देत गेले आणि ती माणसं पानापानातून जिवंत होत गेली. आपल्याच समाजाला नव्हे तर अखिल राज्यातील रयतेला उपासमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणारा नायक फकिरा जेंव्हा अण्णाभाऊ साठेंनी चितारला होता तेंव्हा त्यांच्या डोळ्यापुढे एक आयडियालिझम होता, एक आदर्शवादी संघर्ष करणारा नायक होता, म्हणूनच हे पुस्तक अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना अर्पण केले. आणि आपली मनीषा त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडली !
महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्वतरांगांचा भूमीपुत्र तंट्या भिल्ल याच्या स्वातंत्र्य समरातील धगधगत्या जीवनावर बाबा भांड यांनी लिहिलेल्या 'तंट्या' या महाकादंबरीत नायकाबरोबरच लेखकही सतत वाचकांच्या मनात डोकावत राहतो ! चिं.वि. जोशींचे चिमणराव गुंड्याभाऊ ही देखील सजीव माणसांवर बेतलेली पात्रे होती. अरुण साधूंनी 'सिंहासन' कादंबरीत रंगवलेला निर्भीड, निष्ठावान पत्रकार दिगू टिपणीस म्हणजे दिनू रणदिवे होते. विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडरचे मूळ देखील एका सहज घडलेल्या घटनेतून निपजले होते आणि एका चहावाल्याच्या जीवनातील बहुपत्नीत्वातून ती सगळी पात्रे तेंडूलकरांच्या डोक्यात तयार होत गेली.
ही जंत्री लांबू शकते अगदी सिनेमांच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. 'सामना'मधला हिंदुराव धोंडे पाटील असो की मारुती कांबळे असो ही नावे आजदेखील सचेत वाटतात. इतकेच कशाला हिंदी चित्रपटात, साहित्यात देखील हीच बाब लागू पडते. बॉलीवूडचा ऑल टाईम ग्रेट सुपरहिट 'शोले'मध्ये संजीवकुमारच्या पात्राचे नाव होते ठाकूर बलदेवसिंग ! आश्चर्य वाटेल की 'शोले'च्या लेखकद्वयापैकी सलीमखान यांच्या प्रथम पत्नी सुशीला चरक यांच्या वडीलांचे नाव बलदेवसिंग होते आणि त्यांना सगळे जण ठाकूर बलदेवसिंग म्हणत, संजीव कुमारने रंगवलेल्या पात्राचा गेटअप आणि देहबोली मुळच्या बलदेवसिंगांसारखीच होती ! फार कशाला दूर जायचे, गब्बरसिंग नावाचा डाकू चंबळच्या खोऱ्यात स्वातंत्र्यकाळात होऊन गेला होता, त्याची दहशत कशी होती याचे नानाविध किस्से होते ते 'शोले'त संवादरुपात कामी आले ! ही रसाळ यादी अशीच लांबत जाईल !
लेखकाचे अनुभवविश्व जितके समृद्ध असते आणि जोडीला त्याची प्रतिभाशक्ती त्यात किती रंग भरते यावर त्याने लिहिलेल्या कथा कादंबऱ्यांतील नायक नायिकांचे यशापयश अवलंबून राहते. लेखक कित्येकदा खरी माणसे, खऱ्या घटना वापरतात पण ते त्यांचा थेट उल्लेख करू शकत नाहीत मात्र कालांतराने त्यातली सच्चाई लोकांना भुरळ पाडून जाते. ज्याने जितके भोगले तितके त्याचे दुःख टोकदार होत जाते आणि ज्याने जितके पाहिले, अनुभवले तितकी त्याची अक्षरयात्रा उत्तरोत्तर रंगत जाते. ओढून ताणून आणलेली पात्रे आणि तकलादू कथानके या कारणांमुळेच वाचकांच्या मनाची पकड घेऊ शकत नाहीत. म्हणून लेखकाने स्वतःशी प्रामाणिक राहत सच्चेपणाने आणि अंतःकरणापासून लिहिले पाहिजे अन्यथा त्याचे साहित्य हे साहित्य न राहता केवळ पुस्तक-पृष्ठसंख्या बनून राहते !
शेवटी अनुभव म्हणजे तरी काय असतात ? रोजच्या जगण्यातल्या काही घटनांचा तो मर्मबंध असतो, ज्यात आपल्याभोवतालचे विश्व टिपले जाते. सुख आणि दुःख या दोन्ही बिंदूंचा जीवनातला आलेख जितका चढउतारांनी भरलेला तितकी अनुभवाची अनुभूती अधिक. यातलं दुःख जन्मापासून मरणापर्यंत सोबत असतं, त्याच्याशी जुळवून घेतलं तर आयुष्य सुलभ होतं. सुख मात्र पारयासारखं असतं. त्याला कधीच गोळा करता येत नाही आणि मागं जाणारा काळ नको म्हटलं तरी आठवणींच्या वळचणीला साठत राहतो. कधी तो काळजात उतरतो तर कधी मेंदूत उतरतो. वय कितीही वाढत गेलं, किती तरी आप्तं साथ सोडत गेली तरी आपण जगतच राहतो. का जगतो माहिती नसते. भौतिक सुखाची ओढ सरलेली असते, उदास पैलतीर खुणावत असतो. अशा वेळी मनाच्या वाळवंटातली आठवणींची पालवी कधीच सुकत नाही. त्या कोवळ्या पानाआड असणारे काटे एकांतात डोळ्यात रुतत राहतात, गालावरून ओघळत राहतात. अशा वेळी देव्हाऱ्यातल्या समईची ज्योत काळजात तेवती ठेवायची, आपलं जळत राहणंच आपल्याला समाधानाची तृप्तता देत राहतं. आयुष्यातला प्रत्येक क्षण नेटका जगता आला पाहिजे, त्याचा अर्थ जाणता आला पाहिजे. चार सुबक अक्षरे सचेत लिहीण्यासाठी दोन क्षण नीट जगता आलं पाहिजे. मग जीवन समजून घेण्यासाठी कोणत्या तत्ववेत्त्याची गरज पडत नाही, आपणच एक निर्मिक होऊन गेलेलो असतो. साठा उत्तराची ‘अक्षर’कहाणी मग आपसूक सुफळ होऊन जाते.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा