९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन |
मग नेमकं काय असतं या साहित्य संमेलनात ? खूप काही असतं. - भव्य शामियाने. प्रशस्त देखणी बैठक पद्धत. परिसंवादांचे बिन चेहऱ्याचे जत्थे असतात. विराट व्यासपीठ असतं आणि त्यावर स्थान मिळवण्याची केविलवाणी धडपड करणारे काही साहित्यिक. कधी जांभया देत बसलेले तर कधी इतरांच्या टाळ्यांच्या आवाजाने जागे झालेले श्रोते. आत चाललंय तरी काय या हेतूने आलेले काही बघे. घरात कंटाळलेले काही जीव मन रमवण्यासाठी कुठेही जाऊन बसू शकतात त्यांना ही पर्वणी असते. इथं चुरस असते साहित्यिकात, तुझा गट मोठा की माझा मोठा हे दाखवून द्यायचे असते. कितीही टाळले वा लपवले तरी जात धर्म, नाव-गाव, प्रांतवार विभाग, शहरे, जिल्हे यांच्या छुप्या अस्मितांना कवटाळून मनातले छद्म मोठ्या प्रेमाने जतन करून वरवर एकमेकाशी गोड बोलणारे साहित्यिक इथं नक्कीच उपस्थित असतात. बातम्यासाठी आलेले पत्रकार असतात. काही खरे रसिक वाचक आणि वैचारिक आदान प्रदान अनुभवण्यासाठी आलेले साहित्यिकही असतात.
सरकारकडून आलेले प्रतिनिधी असतात जे 'मायमराठी'च्या नावाने गळे काढून रडतात. त्या पलीकडे त्यांची मजल जात नाही. 'मराठीच्या संवर्धनासाठी हे करू नी ते करू' अशा वल्गना त्यात असतात. जोडीनेच साहित्य संमेलनाला दिलेल्या खैरातीचा ते खुबीने उल्लेख करतात. आशाळभूत वृत्तीने साहित्यिक मंडळी त्या वाक्यावरही सवयीने टाळ्या पिटतात. काव्य संमेलनात भंगार कवितांना देखील मंचावरील अन्य कवी दाद देत असतात कारण त्यांना भीती असते की आपण या सगळ्या कवितांना दाद दिली नाही तर आपल्या कवितांना दाद कोण देणार ? कारण त्याच्या कवितांचा दर्जा त्यालाच ज्ञात नसतो. हे दृश्य जसं दर साहित्य संमेलनात पाहायला मिळतं तसंच या भाषणांचं असतं. मंचावरील मान्यवरगण एकमेकाला दाद देत असतात ते याच न्यायाने. स्वागताध्यक्ष वा संयोजन समितीत कोणत्या पक्षाच्या राजकारण्याला व कोणाला स्थान द्यायचे याचे देखील आडाखे ठरलेले असतात. साहित्यिकांच्या कंपूत राजकीय विचारधारेचे अक्षरउंट चतुर राजकारण्यांनी मोठ्या कौशल्याने घुसवलेले असतात. त्याला हाकलून लावावे तर तंबू फाटतो आणि त्याच्या बोकांडी बसावे तर तितका दम अंगी नसतो अशा कात्रीत सापडलेले साहित्यिक निमूटपणे त्या विचारधारांना सहन करतात, काही जण तर भाळी मिरवतात.
हे सर्व कमी असते की काय म्हणून साहित्यिकांचे अभिनिवेश वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत असतात. परिसंवाद हे त्यासाठीचे अचूक माध्यम ठरते. मागील पाच सहा दशकात झालेल्या विविध साहित्य संमेलनात झालेल्या हजारो परिसंवादाची नेमकी फलश्रुती काय झाली वा त्यातून असं काय विशेष निष्पन्न झालं हा संशोधनाचा विषय होईल. नाही म्हणायला याचा एक फायदा होतो, रुसलेल्या वा अडलेल्या साहित्यिकांचे नाव कार्यक्रम सूचीत येण्यासाठी हे परिसंवाद उपयोगी पडतात. या परिसंवादात आपला छुपा अजेंडा रेटणे वा आपल्याला ज्यांनी पोसलेलं असतं, आपण ज्यांच्या देणग्यांवर जगतो अशा संस्थांचा, संघटनांचा, पक्षांचा वैचारिक आलेख चलाखीने उपस्थितांच्या माथी मारणे हा कौशल्यकारक उपक्रम येथे होतो. नावं बदलून तेच रटाळ विषय इथे विषयसूचीत मांडलेले असतात, तेच साचेबंद विभागवर्ग असतात, आताशा तर सूत्रसंचालक देखील घुमवून फिरवून तेच तेच लोक असतात. परिसंवादातूनच मोठी उलथापालथ वा वैचारिक घुसळण अपेक्षित असते कारण सर्वसामान्य लोक अध्यक्षीय भाषणावर प्रश्नोत्तरे करू शकत नाहीत (ते तितकेसे उचित ही नाही) इथे ते शक्य असते. मात्र ते हेतुतः टाळले जात असावे असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे.
साहित्य संमेलनात मग लाखोंच्या संख्येने लोक येतात तरी कसे ? याची उत्तरेही अचंबित करून टाकणारी आहेत. अनेकांना आपण ज्यांची पुस्तके वाचलेली आहेत त्यांना भेटायचे असते (विविध साहित्यिकांच्या सोबत सेल्फ्या काढणे हा या दशकातील नवा फंडा झालाय). सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेण्याची ही नामी संधी असते. सच्चा शब्दप्रेमी इथे येतोच ! विविध प्रकाशकांची मांदियाळी अनेकांना खेचून आणते. साहित्य संमेलनातली पुस्तक प्रदर्शन / विक्री बंद केली तर येणाऱ्यांची संख्या बरीचशी घटून जाईल. पुष्कळशा लोकांना इथल्या भाषणबाजीपेक्षा पुस्तक खरेदीत अधिक रस दिसून येतो. या व्यतिरिक्त माझ्या अमक्या तमक्या मित्र मैत्रिणीचे सादरीकरण आहे त्याला 'एन्जॉय' करण्यासाठी वा 'सपोर्ट' करायचेय या भावनेतून आलेले ' फिजिकल प्रेक्षक'ही असतात. हजारोंच्या संख्येत हौशी कवी असतात त्यावरून अशा 'फिजिकल प्रेक्षक'गणाची गणती वाढती राहते.
साहित्य संमेलनात वाद झाले नाहीत तर ते यशस्वी गणले जाणार नाही असा काहींचा भ्रम असतो. सिनेमा हिट होण्यासाठी त्याला वादग्रस्ततेची झालर लावण्याचे तल्लख खूळ आजकाल सिनेनिर्मात्यांच्या डोक्यात जसे पक्के झालेय त्यातलाच हा प्रकार आहे. संमेलनाची आयोजक संस्था कोणती असावी, कुठल्या ठिकाणी संमेलन व्हावे, त्याचे बोधचिन्ह कसे असावे / नसावे, कोण अध्यक्ष व्हावे, कुणाचे नाव दाबले जावे, स्वागताध्यक्ष कोण असावे, भाषणात कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख असावा / नसावा, संमेलनस्थळास कोणाचे नाव द्यावे / देऊ नये, कुणाला बोलवले जावे / जाऊ नये, कुणाची जिरवावी / कुणास मिरवावे अशा खंडीभर गोष्टींवरून वाद निर्माण होत असतात, केले जातात, त्यात शक्य तितके डाव साधले जातात. एकंदर पाहू जाता स्वतःला प्रज्ञावंत, संवेदनशील, बुद्धिमान, प्रगल्भ, वैचारिक, सृजन इत्यादी बिरुदे लावून फिरणाऱ्या साहित्यिकांच्या अंतरंगात किती घाण साचली आहे याचे दार्शनिक गढूळपण म्हणजे ही संमेलने होत. त्यामुळे हे लोक असे उघडे पडण्यासाठी तरी साहित्य संमेलने झाली पाहिजेत. ती बंद झाली तर या घुमनघुस्क्या साहित्यिकांचा मुखवटा फाटणार तरी कसा ? कारण अनेक साहित्यिक अशा बाबतीत व्यक्तच होत नसतात. न जाणो आपण व्यक्त झालो तर त्याचा परिणाम आपल्या छबीवर होईल, पुस्तक विक्रीवर होईल, आपला वाचक वर्ग विस्कळीत होईल, आपल्यावर शिक्का बसेल अशा पोकळ भीतीने त्यांना ग्रासलेलं असतं. आपल्याच कोशात जगणारे दोनच जीव या जगात आहेत एक म्हणजे किटक आणि दुसरे म्हणजे साहित्यिक ! अर्थात ही तुलना खूपच कठोर आहे हे मलाही मान्य आहे पण जो वर्ग स्वतःला इतकी बिरुदे लावून मिरवून घेतो त्याला तितक्याच कठोर शब्दात मोजले पाहिजे. जगात प्रत्येक गोष्टीत जसे अपवाद असतात तसे या लेखात उल्लेखलेल्या सकल साहित्यिकांच्या घोटीव प्रकृतीपेक्षा भिन्न व भव्य आकृतीबंध असणारे साहित्यिक पूर्वी होते, आजही आहेत आणि भविष्यातही असतील. त्यांचे संमेलनावाचून काही अडले नाही आणि ते संमेलनात मंचावर कधी दिसले नाहीत म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचेही कधी अडले नाही हे विशेष !!
इथे चांगलं काहीच घडत नाही का असाही प्रश्न पडू शकतो. त्याचेही उत्तर विचार करायला लावणारे आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्या त्या व्यक्तीचे विचार ऐकणे ही एक पर्वणी असू शकते. पण ते तर आपण त्यांच्या साहित्यकृतीतून वाचत आलेलो असतोच, पण त्यांना ऐकणे, पाहणे आणि एका वेगळ्या सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं या हेतूने रसिक वाचक तिथे आलेला असतो. अशा वेळी संमलेनअध्यक्ष झालेल्या विभूतीस एक चांगली संधी ,एक मोठा श्रोता समुदाय व एक भव्य व्यासपीठ मिळते. मात्र तरीही साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल होण्याचे निमित्त म्हणून ज्याचा उल्लेख केला जावा असे ओजस्वी भाषण होताना दिसत नाही. सरकार दरबारी काही तरी मागण्या मांडणे, संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख करणे, भाषासंवंर्धनासाठी आक्रोश करणे हे या भाषणांचे नेहमीचे मुद्दे झालेत. नावे बदलून भाषणे छापली तरी चालतील इतकं ते साचेबंद होत चाललेय. साहित्य संमेलनात होणाऱ्या ठरावांचे पुढे काय होते यावर कितीही मोठा खल केला तरी हाती शून्य येईल हे ही सर्वांना ठाऊक आहे तरीही तिथं शेकडोने ठराव होत राहतात हा ही एक मोठा विनोद आहे.
इतकं सारं होत असूनही साहित्य संमेलने होत राहावीत असं माझं मत आहे. कारण अनेकांच्या मनात साठलेला गाळ या निमित्ताने दिसून येतो. मराठी माणसं लाखोंच्या संख्येने पुस्तकं विकत घेताना दिसतात. साहित्य संमेलनात जे जे काही चुकीचे वा अपेक्षेनुरुप घडत नाही त्यावर समाजात चर्चा होत राहते, विरोधी विचारधारांचे लोक आपली मते आग्रहाने आणि आवर्जून मांडताना दिसतात. साहित्य संमेलनांच्या निमित्ताने सामाजिक घुसळण होत राहते. नव्या जुन्या लेखकांना एकत्र यायला व्यासपीठ मिळते. काही काळासाठी का होईना मराठी वृत्तपत्रे, मराठी माध्यमे मराठी साहित्यास / साहित्यिकांस आपल्या माध्यमात जागा देतात. वाचकांच्या मनात आलेली मरगळ दूर होण्यास याने मदत होते ही याची सर्वात मोठी जमेची बाजू ठरते. काही लोक / साहित्यिक यांना बारमाही नावे ठेवतात आणि त्यांना अशा प्रसंगाचे औचित्य साधून पुरस्कार दिले गेले की थेट मंचावर जाऊन हारतुरे स्वीकारत फोटो काढून घेतात, हा दुटप्पीपणाही या निमित्ताने उघड होतो.
साहित्य संमेलने व्हावीत. मात्र तिथं जाणाऱ्या लोकांनी न पटणाऱ्या, अयोग्य व तत्व-सत्वहीन गोष्टींवर नक्की जाब विचारावेत. आपल्याला बोलू दिलं नाही तर निषेध करून यावं पण आपलं मत नक्की मांडावं. जनसमुदायास ठार बहिरेपण येण्याआधी आपला आवाज हा तिथे प्रकट करायलाच हवा. सुजाण वाचकांनीही आपल्या आवडत्या लेखकास या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारावेत, त्याला बेजार करावे. जेणेकरून त्याला खरी आणि योग्य भूमिका घेण्यास बाद्ध्य करता यावे. परिसंवादात जावं. आपल्याला पडणारे प्रश्न छातीठोकपणे विचारावेत.
जन हो, बहुतांश साहित्यिक हे झोपेचे सोंग करून पडून असतात त्यांना गदागदा हलवून जागं करण्यासाठी साहित्य संमलेनाचा वापर करा. तुम्ही ज्यांचं ज्यांचं लेखन वाचतं त्या त्या प्रत्येक लेखकास विचारा की बाबा रे आता तरी बोल, आता तरी तुझ्या स्वमग्नतेच्या कोषातून बाहेर ये आणि बाहेर जे काही घडते आहे, ज्यावर रणकंदण माजले आहे त्यावर तुझे मत मांड. एरव्ही तू लोकांना मत मांडायला शिकवतोस आता तुझ्या मनात काय आहे ते तू सांगच !
लेखन आता आटोपतं घेतो. ज्या घटनेमुळे हा दीर्घ लेख लिहिलाय त्यावरचे माझे मत. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्घाटनासाठी नयनतारा सहगल यांना आमंत्रित केले गेले होते. नयनतारा सहगल या कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, त्या कोणती मते मांडू शकतात याचा किरकोळ आडाखा साहित्यसंमेलन संयोजन समितीस नक्कीच असणार. त्यांचे नाव निश्चित होण्याआधी यावर थोडीफार तरी चर्चा झाली असणार.
मात्र संयोजन समिती हा देखील एक बाहुलाच असतो. यांचे खेळविते धनी साहित्य परिषदांचे, महामंडळांचे तट्टू असतात जे आपल्या विचारधारा आणि छुपे अजेंडे यांना झेपेल, साजेसे होईल अशा बोलक्या बाहुल्यांना बोलण्याची अनुमती देतात. त्यांच्या विचारांना सुरुंग लावणाऱ्यांना तिथे मज्जाव असतो. अशांचा विद्रोह यांना पेलवत नाही. मग हे तिथे आले तर यांचे दुकान बंद होऊ शकते. मग त्यांच्या नावावर फुली मारायची ! सोप्पं काम असतं हे !
नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन आता त्यांना नाकारणाऱ्या लोकांचा, विचारांचा आणि प्रवृत्तीचा निषेध करावा तितका कमीच आहे.
साहित्य संमेलनाने कोंबडे झाकून ठेवल्याने सूर्य उगवण्याचा राहणार आहे काय ? नयनतारांना जे सांगायचे होते ते त्यांनी माध्यमांच्या हवाली केलंय आणि आता ते लोकांपर्यंतही पोहोचतंय. उलटपक्षी यवतमाळ साहित्य संमेलनात त्या बोलल्या असत्या तर त्यावर इतके वादळ उठले नसते जितके आता उठते आहे !
ज्यांचा ज्यांचा विवेक जागा आहे किमान त्या सृजनांनी, साहित्यिकांनी तरी अशा प्रवृत्तीचा निषेध करायला हवा. अन्यथा त्यांनी दाद दिलेलं, लिहिलेलं साहित्य हे निव्वळ प्रचारकी थाटाचे असेल जे काही काळानंतर पुस्तकांच्या कपाटातील वाळवीच्या कामी येईल.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा