
मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.