रविवार, २ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - सोय ..



कौरव पांडवांच्या द्यूतात बोली लागलेल्या 
द्रौपदीसारखे भाग्यही काहींना नसते,  
कपडे उतरवण्यासाठीच जिथे जन्म घ्यावा लागतो,  
तिथे श्रीकृष्ण कायमस्वरूपी रजेवर असतात. 
देवांच्या भाकडकथा विरल्या की 
भयाण वास्तवातून प्रसवतो वेदनांचा कभिन्न काळ.
जिथे उस्मरत्या दिशांच्या भिंतीत देहाची कलेवरे 
राजरोसपणे चिणली जातात 
पंक्चरल्या अवयवांवर मेकअपचे भडक लेप थोपतात  
धगधगते जिवंत शरीर त्यात गोठत जाते...

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

तुम एक अजनबी - फरिदा शादलु : इराणी कविता


इराणमधील गृहयुद्धाच्या दरम्यान कुठेही कबरी खोदल्या गेल्या, माणसं शक्य तशी दफन केली गेली. त्यात अनेक मृतदेहांची हेळसांड झाली. जमेल तिथं आणि जमेल तेंव्हा कबरी खोदणे हे एक काम होऊन बसले होते. त्या मुळे या कबरी अनेक सार्वजनिक ठिकाणी देखील आढळून येतात. ख्रिश्चनांच्या कबरी जशा मातीवरती उभट आकाराच्या चौकोनी बांधीव असतात तशा या इराणी कबरी नाहीत. या कबरींचा पृष्टभाग सपाट असून जमीनीलगत आहे. क्वचित त्यावर काही आयत लिहिलेल्या असतात. सुरुवातीस नातलग कबरीपाशी नित्य येत राहतात पण गोष्ट जशी जुनी होत जाते तेंव्हा कबरीची देखभाल कमी होते आणि युद्धात, चकमकीत मारल्या गेलेल्या लोकांच्या कबरी असतील तर असला काही विषयच येत नाही. लोक अशा कबरी सर्रास ओलांडत फिरतात, कारण पायाखाली काय आहे हे उमगतच नाही.

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

सोशल मीडियावरील अनसोशल तथ्ये...


राजकारण आणि समाजकारण यासाठी सोशल मिडीया किती वाईट ठरतो आहे हे आजकाल जग अनुभवते आहे. एखाद्या राष्ट्राचा निवडणुकीच्या निकालाचा कल बदलवण्यापासून ते विविध जाती धर्मात तेढ माजवून बेबंदशाहीचं वातावरणास यामुळे चालना मिळाली. सोशल मिडिया किती चांगला वा वाईट आहे यावर आजही मतमतांतरे आहेत. काहींना त्यापासून वैयक्तिक, आर्थिक वा सामुदायिक लाभ झालेत तर काहींना त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळालेत जसे की लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्यापासून ते कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची हक्काची व स्वतःची स्पेस मिळाली आहे. सार्वजनिक जीवनात देखील सोशल मिडीयाने चांगले वाईट प्रभाव दाखवले आहेत. मनोरंजन आणि दळणवळणाचे साधन म्हणून सामान्य लोकांच्या आयुष्यात दाखल झालेल्या सोशल मिडीयाचं रुपांतर आता व्यसनात झालेय आणि लोक दिवसेंदिवस त्याच्या खोल गर्तेत लोटले जाताहेत. राजकीय सामाजिक परिमाणे वगळता सोशल मिडीयाचा आणखी एक भयावह चेहरा अलीकडे समोर येऊ लागलाय. तो काळजात धडकी भरवणारा आणि धोक्याची घंटी वाजवणारा आहे. त्यातून मानवता लोप पावून मानवी मुल्यांचा ऱ्हास घडवून आणणारी अनैसर्गिक आणि धोकादायक चिन्हे दिसत आहेत.

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

लेस्बियन महिलांचं क्रूर शोषण - इक्वेडॉरमधली छळ केंद्रे !

'कौन्सिल ऑफ हेमिस्फेरिक अफेअर्स'मध्ये १६ जून २०१७ रोजी मार्टिना गुलीमोन यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता तेंव्हा काही मोठ्या जागतिक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत इक्वेडोर सरकारचा निषेध नोंदवला होता. या संशोधन अहवालात अनेक धक्कादायक बाबी लेखिकेने उघडकीस आणल्या होत्या.

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

सत्तेच्या विरोधातील आवाजाच्या दडपशाहीचे नवे स्वरूप



'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

ग्लोबल वॉर्मिंग : अर्थकारणात नव्या संकल्पना

ग्लोबल वॉर्मिंग - अर्थकारणात नव्या संकल्पना

दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नवनव्या विषयावरील चर्चांना वाव मिळतो वा कधी कधी वादाला नवा विषय मिळतो. यंदा साहित्यातील कामगिरीबद्दलचा नोबेल जाहीर झालेला नाही हा वादाचा विषय होता होता राहिला तर यंदाच्या अर्थशास्त्रातल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे वाचून काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी समाधान व्यक्तवले. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज' नावाने ओळखला जातो. यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम नॉर्डस, पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांत विभागून दिला जाणार आहे. पुरस्काराच्या रुपाने त्यांना ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळतील. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेत्यात अमेरिकनांचा दबदबा कायम राहिलाय, हे वर्षही त्याला अपवाद नाही. विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर हे दोघेही प्रज्ञावंत अमेरिकन आहेत. नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही त्यांनी येल विद्यापीठातूनच घेतले आहे. तसेच प्रतिष्ठित मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी पीएचडी केली आहे. तर पॉल रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक आहेत. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो या विषयावरती संशोधन केलं आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले आहेत. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्या नावाची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रस्तावना महत्वाची आहे. त्यात म्हटलंय की, "जगापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या या जटील आणि महत्वाच्या प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. सर्वंकष व्यापाराच्या बाजाराचं आर्थिक आकलन आणि निसर्गाचे स्वरूप यांच्यातल्या पूरक नात्याचा आर्थिक सूत्रांचा आराखडा यांनी मांडला आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निर्दालन करताना शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...



राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो..

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

रेड लाईट डायरीज - झोपेतून जागे होणार तरी कधी ?


रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते.
युनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका - कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे.
त्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग हे मुख्य पुरवठादार जिल्हे आहेत आणि मुंडा, संथाल व ओरावो या आदिवासी जमातीतील बायका मुली प्रामुख्याने खरीद फरोक्त केल्या जातात.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

#रेड लाईट डायरीज - मुन्नीबाई ...


अशीच एक दास्तान मुन्नीबाईची आहे. ती मराठवाडयातल्या नांदेडची. बाप लहानपणीच मेलेला. पाच भावंडे घरात. चुलत्याने आईला मदत केली पण रखेलीसारखं वागवलं. चार पोरी आणि एक अधू अपंग मुल यांच्याकडे बघत ती निमूट सहन करत गेली. माहेरची परिस्थिती इतकी बिकट की तेच अन्नाला महाग होते. मग ही पाच तोंडे घेऊन तिकडे जायचे तरी कसे. त्यापेक्षा मिळेल ते काम करत देहाशी तडजोड करत मुली मोठ्या होण्याची वाट बघण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. एकदा चुलत्याने आईपाठोपाठ मुलीवरही हात ठेवला.

ती अजून न्हाती धुती देखील झाली नव्हती. घाबरलेल्या आईने त्याला हाकलून दिले. पण हे मरणच होते केंव्हा न केंव्हा येणारच होते. मग मुन्नीनेच यातून मार्ग काढला. ती घर सोडून पळून आली. तिने मुंबई गाठली. मुंबईने तिला धंद्याला लावले.