गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

तुम एक अजनबी - फरिदा शादलु : इराणी कविता


इराणमधील गृहयुद्धाच्या दरम्यान कुठेही कबरी खोदल्या गेल्या, माणसं शक्य तशी दफन केली गेली. त्यात अनेक मृतदेहांची हेळसांड झाली. जमेल तिथं आणि जमेल तेंव्हा कबरी खोदणे हे एक काम होऊन बसले होते. त्या मुळे या कबरी अनेक सार्वजनिक ठिकाणी देखील आढळून येतात. ख्रिश्चनांच्या कबरी जशा मातीवरती उभट आकाराच्या चौकोनी बांधीव असतात तशा या इराणी कबरी नाहीत. या कबरींचा पृष्टभाग सपाट असून जमीनीलगत आहे. क्वचित त्यावर काही आयत लिहिलेल्या असतात. सुरुवातीस नातलग कबरीपाशी नित्य येत राहतात पण गोष्ट जशी जुनी होत जाते तेंव्हा कबरीची देखभाल कमी होते आणि युद्धात, चकमकीत मारल्या गेलेल्या लोकांच्या कबरी असतील तर असला काही विषयच येत नाही. लोक अशा कबरी सर्रास ओलांडत फिरतात, कारण पायाखाली काय आहे हे उमगतच नाही.


१९८५ मध्ये इराणच्या खोरासन प्रांतातील माशाद परगण्यात जन्मलेली फरिबा शादलु ही एक प्रतिभाशाली तरूण कवयित्री आहे. तिची संवेदनशीलता, विषयांची निवड आणि सादरीकरणातला नेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे. २०१२ च्या सुमारास तिने एक कविता लिहिली होती. तिच्या तरुण मैत्रिणीच्या अकस्मात गायब होण्याने ती अस्वस्थ झाली होती. काही काळानंतर तिला कळले की तिचा अकस्मात मृत्यू झाला आहे आणि अमुक एक ठिकाणी तिची कबर आहे. फरिबा जेंव्हा तिथे गेली तेंव्हा तेथील अवस्था पाहून ती स्तब्ध झाली. त्या क्षणी तिच्या कबरीजवळ सुरु असलेली ये-जा आणि तिचं मातीखाली बेवारसागत दफन असणं हे तिला झिंजोडून गेलं. यावेळी तिला जे सुचलं ते नंतर तिने कागदावर उतरवलं.

फरिबाने माशादमधल्या इस्पितळात काम केलेलं असल्याने अनेक मृत्यू तिने पाहिलेत. तिने काही काळ वर्तमानपत्रात देखील काम केलं. त्या नंतर तिचा निकाह झाला. तिचा संसार सुरळीत सुरु आहे पण तिच्यातली संवेदनशीलता तिला बोलतं करते. पर्शियन भाषा आणि साहित्य यावर तिची पकड आहे, तिचं शिक्षण त्याच विषयात प्राविण्य मिळवून झालेलं आहे. तिला इराणमधलं जर्नलिस्ट पोएट्री ऍवार्ड मिळालेलं आहे. जिथं मनःशांती नाही आणि जगण्याला, माणुसकीला पोषक असं काही नाही अशा भूमीतल्या सृजन मनांना कविता सुचाव्यात हेच खूप आहे, त्यातही एखादी तरुण कवयित्री चित्रलिपीतल्या कविता करत असेल तर तिच्या प्रयत्नांना दाद द्यावीशी वाटते.           

फरिबाच्या कवितेचा अनुवाद  - 
तू एक अनोळखी ...

तू एक अनोळखी आहेस,
एका करड्या जॅकेटमधला.
मार्लबोरो सिगारचे झुरके घेत,
मला ओलांडून चालला आहेस.
तुला माझे नाव माहिती नसेल,
आणि मी ही ते सांगू शकत नाही.
ते काही रहस्य नाहीये..
माझ्या कबरीवर खूपच गवत उगवलेलं आहे .....

या कवितेतल्या वेदना केवळ तिच्या मैत्रिणीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. अखिल जगतात जिथं जिथं मृतदेहांचा सन्मान न होता त्यांना बेपर्वाईनं अमानवी पद्धतीने मातीत मिटवलं गेलं त्या सर्व मृतदेहांच्या व्यथा फरिबाच्या कवितेत सार्थपणे उतरल्यात. युद्धग्रस्त असलेल्या इराणमधली ही कविता तिथल्या भावविश्वाचं पुसटसं दर्शन घडवते. भवताल कितीही रक्ताळलेला असला तरी संवेदनशील कवीमन त्यातही आपली स्पेस नेमकी शोधून त्यात असं काही व्यक्त होतं की त्या शब्दचित्रात डोकावलं तर आपलं काटेरी प्रतिबिंब दिसतं हे फरिबाच्या कवितेचे यश आहे.

یه غریبه ای
یه غریبه ای
که داری از اینجا رد می شی
با کت قهوه ای و
سیگار مالبرو
اسممو نمی دونی
منم نمی تونم اسممو بت بگم
نه اینکه یه راز باشه نه!
آخه علفای زیادی سنگ قبرمو پوشوندن…

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा