रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

लेस्बियन महिलांचं क्रूर शोषण - इक्वेडॉरमधली छळ केंद्रे !

'कौन्सिल ऑफ हेमिस्फेरिक अफेअर्स'मध्ये १६ जून २०१७ रोजी मार्टिना गुलीमोन यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता तेंव्हा काही मोठ्या जागतिक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत इक्वेडोर सरकारचा निषेध नोंदवला होता. या संशोधन अहवालात अनेक धक्कादायक बाबी लेखिकेने उघडकीस आणल्या होत्या.
इक्वेडोर या देशात लिंगभेद संपुष्टात येऊन आता २१ वर्षे लोटलीत. सन २००८ मध्ये इक्वेडोरमधील सरकारने त्यांच्या घटनेत दुरुस्ती करत लेस्बियन आणि गे या दोहोंच्या विवाह पद्धतीस कायदेशीर मान्यता दिली होती. त्या नंतर या देशातील लैंगिक जीवनाचा आलेख कमालीचा बदलता राहिला. देशातील विवाहसंस्था मोडीत निघाल्या आणि तद्दन पुस्तकी व संस्कारी व्याख्या मोडीत काढत लोक हवे तसे स्वच्छंद जगू लागले. मात्र काही वर्षात याचा दुसरा भयावह चेहरा समोर आणण्याचे काम मार्टिनांच्या या अहवालाने केले होते.

इक्वेडोरमधील अनेक कुटुंबात लेस्बियन तरुणी स्त्रिया आढळू लागल्या होत्या त्यांवर एक राक्षसी उपाय शोधला गेला. रिहॅबिलेशन सेंटर्स फॉर मेंटल थेरपीजच्या नावाखाली अख्ख्या देशात अनेक क्लिनिक्स उघडली गेली. या क्लिनिक्समध्ये लोक आपल्या बहिणी बाळीना, आपल्या मुलींना आणून सोडू लागले, काहींनी तर आपल्या बायकोला देखील इथे सोडले. या सेंटर्समध्ये या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले जायचे. तशी ती थेरपीच होती. रोज हवे तितके बलात्कार, पाशवी मारहाण, इलेक्ट्रिक शॉक्स, बर्फाच्या लादीवर झोपवून बळजोरी, कोल्ड शॉवर बाथ, चटके देणे, अनैसर्गिक संभोग असे आसुरी मार्ग तिथे अवलंबले जाऊ लागले जेणे करून त्या स्त्रीने आपला समलैंगिक कल विसरून जावा. अनेक कुटुंबे त्यांनी सोडून दिलेल्या स्त्रीचे जोवर मतपरिवर्तन होत नाही तोवर परत नेण्यास राजी नसत. रोजच्या शोषणामुळे आणि अनन्वित अत्याचारामुळे या महिला अखेर बहुताश करून सगळंच विसरत. काही ठिकाणी गे पुरुषांना देखील आणून सोडल्याच्या घटना घडल्या पण त्याचे प्रमाण नगण्य होते.

इक्वेडोरमधील सर्वाधिक खपाच्या 'एलमुडो' या स्पॅनिश दैनिकाने ऑक्टोबर २०११ मध्ये याला वाचा फोडली आणि त्या वर्षी ३० सेंटर्स बंद झाली. पण देशभरात आणखी २०० सेंटर्स पोलीस आणि सरकारच्या आशीर्वादाने सुरु होती ती बंद झाली नाहीत. अधून मधून यावर तिथे लिहिले गेले, अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनेही यावर अनेकवेळा इक्वेडोरला दम देऊन पाहीले पण परिस्थितीत नाममात्र बदल झाला. शिवाय जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी याची म्हणावी तशी दखल घेतली नव्हती. याची खंत काही पत्रकारांना लागून राहिली आणि त्यातून त्यांनी एक प्रोजेक्ट हाती घेतला. छायाचित्रकार पाओला परेड्सनेने यात पुढाकार घेतला. तिने रिस्क घेत आपण एक अभिनेत्री असल्याची बतावणी करत या थेरपी सेंटर्समध्ये प्रवेश मिळवला. तिथल्या अत्याचाराचे तिने फोटो शूट केले आणि जगभरात व्हायरल केले. त्या नंतर इक्वेडोरची सर्वत्र छीथू होते आहे. आता त्या स्त्रियांना न्याय मिळेल, दोषींना सजा मिळेल, सरकार - प्रशासनातील याच्या पाठीराख्यांची चौकशी होईल, कदाचित फोटोग्राफर पाओलास गौरवले जाईल. हे सर्व होईल तेंव्हा होईल.

पण या बायकांच्या आयुष्याचा नरक झाला त्याचे काय याचे उत्तर कदाचित मिळणार नाही. या निमित्ताने जगभरातील स्त्री समानतेचा बुरखा टराटरा फाटून निघालाय. कारण 'गें'च्या बाबतीत त्यांनी बदलावे म्हणून हजारो कुटुंबांनी अशी पाशवी बळजोरी केल्याचे अजून तरी कुठे आढळले नाही. मग लेस्बियन महिलांच्या बाबतीत असे का घडले याचे उत्तर पुन्हा एकदा पुरुषी शोषक मानसिकतेत दडलेले आढळून येते. महिला कुठलीही असो कारण काहीही असो आधी शोषण व अत्याचार तिच्यावरच आजमावले जाते हे पुन्हा अधोरेखित झाले.

आपल्याकडे तर मध्ययुगाचे वारे वाहू लागलेय. दरोडा, लुट, बदला, सूड, दंगल काहीही असो बाईला टार्गेट केले जाते. दिल्लीतील माशिदेतला बलात्कार असो की कठुंआच्या देवळातला बलात्कार असो वा आणखी कुठल्या धार्मिक आस्थापनेतला बलात्कार असो दोन्ही बाजूनी लोक तुटून पडतात. शरमेची बाब अशी की काही समर्थनही करत असतात. पण सर्वच घटनात स्त्रीच पिळवटुन निघते याचा सोयीस्कर विसर पडतो. हा देश बंदीशाळा नसून हे विश्व बंदीशाळा आहे जिथे बायका या भोगवस्तू आहेत आणि वेगवेगळ्या लेबल्सखाली पुरुष त्यांना लुटत असतात, छळत असतात, वर अपराध्यांची बाजूही घेत असतात.

स्त्रीचे शोषण कसलेही असो, कुणीही केलेले असो ते तिरस्करणीय आणि निंदनीयच होय ही भूमिका रुजायला आणखी किती दशके लोटतील याचे उत्तर कुणाकडेही नसावे असे आता वाटू लागलेय ....

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा