शिकागोहून दिल्लीला नॉनस्टॉप येणारे एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरवावे लागल्याची लाजिरवाणी घटना काल उघडकीस आली. या विमानातील १२ टॉयलेट्सपैकी अकरा टॉयलेट्स / कमोड चोकअप झाल्याने विमान माघारी फिरवावे लागल्याने ही घटना अत्यंत लज्जास्पद म्हणावी लागेल. या टॉयलेट सीट्समध्ये प्रवाशांनी पॉलिथिन बॅग्ज, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरविअर्स आणि बॉटल्स टाकल्याचे उघड झालेय. या घटनेमुळे आपल्याकडील काही लोक एअरइंडियाला ट्रोल करत आहेत. खरेतर अपवाद वगळता समग्र भारतीय माणूसच यासाठी ट्रोल व्हायला हवा! कारण आपल्याकडील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स मधील टॉयलेट्स अत्यंत गलिच्छ घाण अवस्थेत असतात. चुकून कधी अशा ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तर केवळ दरवाजा उघडून पाहिला तरी माणूस ओकारी करेल असे दृश्य दिसते. इतकेच नव्हे तर अशा कमालीच्या घाणेरड्या ठिकाणी गेल्याची एक घृणास्पद स्मृती मनात अकारण ठासून राहते त्याचा पुनर्स्मरण देखील शरमेने मान खाली घालायला लावते!