शनिवार, ११ मे, २०१९

गुलकी बन्नो आणि जग्गी ...


विख्यात हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत. त्यांची 'गुलकी बन्नो' नावाची एक कथा आहे. गुलकी नामक एका कुबड्या मध्यमवयीन स्त्रीचं भावविश्व त्यात रेखाटलं आहे. घेघाबुवाच्या ओसरीवर बसून भाजीपाला विकून गुलकी आपला चरितार्थ चालवायची. आपल्या पित्याच्या मृत्यूच्या पश्चात ती पूर्णतः एकाकी झालेली. तिचा नवरा मनसेधू यानं दुसरं लग्न केलेलं. खरं तर गुलकीला कुबड येण्यास मनसेधूचं वागणंच अधिक कारणीभूत असतं. गुलकी अल्पवयीन असतानाच मनसेधूसोबत तिचा विवाह झालेला असतो. खुशालचेंडू मनसेधूच्या संसाराचं ओझं उचलताना गुलकी दबून जाते. अतिकष्ट आणि शरीराची झिज यामुळे तिच्या पाठीवर कुबड येतं. वयाच्या पंचविशीत तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळं पसरतं. ती कंबरेत वाकते. देहाने आणि मनाने खचून जाते. घेघाबुवाच्या कट्ट्यावरल्या तिच्या भाजीपाल्याच्या दुकानाभवती गल्लीतली सगळी पोरंठोरं दंगामस्ती करत असतात. त्यांच्या खेळण्याचा तो ठिय्या असतो. ही पोरं तिथं खेळतही असतात आणि जोडीनंच गुलकीची यथेच्छ टिंगलही करत असतात. त्यांच्या दृष्टीने ती टवाळीचा विषय असते. या मुलांत जानकी उस्तादाची मिरवा आणि मटकी ही बहिण भावंडं सामील असतात. जानकी उस्ताद अज्ञात रोगानं मरण पावल्यानंतर ही भावंडं रस्त्यावर आलेली, त्यांना कुणी वाली नव्हता पण त्यांचं अल्लड बालपण अजून पुरतं सरलेलं नसल्यानं परिस्थितीच्या झळा त्यांना बसल्या नव्हत्या. ही भावंडंही रोगग्रस्त आणि अपंग होती. गोड गळ्याच्या बोबड्या मिरवाला गायला खूप आवडायचं. गुलकीच्या दुकानाजवळ बसून तो गायचा. गल्लीतल्या पोरांना रागे न भरणाऱ्या गुलकीचा मिरवा आणि मटकीवर विशेष जीव होता. मिरवा गाऊ लागला की त्याच्यासाठी ती मटकीपाशी खाण्याची जिन्नस देई. मिरवा आणि मटकीच्या कंपूत झबरी नावाची कुत्रीही सामील होती.
गुलकीला बऱ्याच वर्षापासून ओळखत असणारी सत्ती अधूनमधून तिला भेटायला येत असते. गल्लीतली बच्चे कंपनी मात्र तिला जाम टरकून असत कारण बारोमास तिच्यापाशी एक धारदार सुरी असे, जिच्याबद्दल अनेक वदंता होत्या. एकदा घेघाबुवाशी कडाक्याचं भांडण झाल्यानं गुलकी तिची ओसरी सोडून देते. त्यातच तिच्यावर आणखी आपत्ती येते. संततधार पावसानं तिचं घर कोसळतं. बेसहारा, बेघर गुलकीला सत्ती आश्रय देते, घेघाबुवाचं पाच महिन्याचं थकलेलं भाडंही देते. गुलकीचं आयुष्य काहीसं स्थिरावतंय असं वाटत असतानाच तिच्या आयुष्यात नवं वळण येतं. मनसेधू परततो. तो गुलकीला न्यायला आलेला असतो. सत्तीला मनसेधूचा कुटील डाव उमगतो. ती गुलकीला खूप समजावते, विरोध करते. तरीही तिचा विरोध झुगारून गुलकी मनसेधूसोबत जाते. खरं तर मनसेधूनं तिला एका फुकट कामवाल्या बाईच्या रुपानं परत नेलेलं असतं. आपली दुसरी पत्नी आणि तिच्या मुलंबाळां काळजी घेण्यासाठी, घरकामासाठी त्याला गुलकीची आठवण झालेली असते. सत्तीनं सांगितलेलं सत्य गुलकीला थोडंफार पटतंही. पण आपला नवरा आपल्याला न्यायला आला, आता उर्वरित आयुष्यभर आपण त्याच्या सहवासात राहू. त्याचा आधार नसला तरी त्याचं नाव आपल्याला परत मिळालं या आनंदानं गुलकी त्याच्यासोबत प्रयाण करते. गुलकी आणि मनसेधू गाव सोडून जाताना मिरवा आणि मटकी गावाच्या वेशीपर्यंत त्यांच्या मागोमाग येतात. डोळ्यातले अश्रू लपवत ते गात असतात आणि पतीकडे परतण्यास अधीर झालेली गुलकी सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर स्वार झालेली असते असा या कथेचा शेवट आहे.

लेखक धर्मवीर भारती यांनी ही कथा मुद्दामहून अशी अर्धवट समाप्त केली असावी. गुलकीचं पुढं काय झालं असावं याबद्दल प्रत्येक वाचकानं आपल्या परीने अर्थ लावून कयास लावावेत असं त्यांचं गृहीतक असू शकतं. पांढरपेशा समाजात पुरुषानं दुसरं लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या बायकोची मनोवस्था काय असू शकते याचं त्रोटक पण भेदक वर्णन या कथेत येतं. एकटं राहून एकांतात जगणाऱ्या बाईचं भावविश्व काय असतं, अकाली एकाकीपण आलेल्या आणि अधू असलेल्या स्त्रीचं मन अधू मुलांकडे का ओढलं जातं याचं रेखाटन मर्मस्पर्शी आहे. अशा स्त्रीला मदत करणारी स्त्री देखील बहुतांश करून तिच्यासारखीच असते. तसेच तिला छळणारी स्त्री देखील तिच्यासारखीच असते. असं का ? याचं उत्तर कथेत कुठंही येत नाही पण समवयीन स्त्रियांची मानसिकता आणि त्याच अवस्थेतून गेलेल्या स्त्रीची वय झाल्यानंतरची मानसिकता यावर कथा प्रकाश टाकते. नावालाच समानता असणारा समाज पुरुषहिताचीच उघड जोपासणी करतो. या सामाजिक उतरंडीत अशा खचलेल्या स्त्रियांचं तळाशी असणं समाज निमूटपणे पाहत राहतो हा सल काळजाला सोलून काढतो. असो. धर्मवीर भारती यांच्या कथेची आठवण होण्यास कारणीभूत ठरली जग्गीच्या संदर्भातली एक घटना.

'रेड लाईट डायरीज'मधल्या गिरिजाबाईच्या प्रकरणात मीराचा उल्लेख आहे. मीरासारखीच जग्गी होती. जगदेवी तिचं नाव. हरियाणातल्या भींडमधील कुठल्याशा खेड्यातून जन्मदात्या वडीलांनीच तिला विकलेलं. दलालाने तिला आणलं तेंव्हा बुटक्या अंगचणीच्या जग्गीवर सगळेच जण हसले होते कारण तिच्या पाठीवरचे कुबड तेंव्हा नुकतेच कुठं दिसू लागलं होतं. कमी वयात तिचं लैंगिक शोषण झाल्यानं तिच्या देहाची झिज वेगाने होत गेली आणि अवघ्या काही वर्षात ती जख्ख कुबडी झाली होती. नंतर त्याच गल्ल्यात धुणीभांडी करून तिनं पोट भरलं. या गल्ल्यात येणाऱ्या पुरुषांच्या अनेक तऱ्हा असतात, अनेक चॉईस असतात. कुणाला कोवळी मुलगी हवी असते तर कुणाला पोक्त बाई ! थोराड, लठ्ठ, सावळी, गोरी, काळी, कृश, सशक्त, भरगच्च, बुटकी, ऊंच, किरकोळ, सुबक, देखणी, साधारण अशा अनेक वर्गवाऱ्या तिथं असतात. खेरीज तिची भाषा, तिचा मूळ प्रांत हे घटक ही महत्वाचे ठरतात. जो तो आपल्या आवडीनिवडीनुसार सावज हेरत इथं फिरत असतो. यातही काही अतिविकृत असतात. असाच एक साठी पार झालेला तोंडावर देवीचे व्रण असलेला इसम थोराड झालेल्या जग्गीला शोधत शोधत तिच्याकडे येऊ लागला. सुरुवातीला त्याच्यावर संतापणारी, खेकसणारी जग्गी नंतर भुलली. आपल्यामागेही कुणीतरी लागलं आहे या भावनेनं ती सुखावली होती. गिरीजाबाईच्या अड्ड्यावरच तिचं ते 'काम' ती उरकून घेई. असं करता करता दोनेक महिने रोजचे लचके तोडण्यात गेले. गेली कित्येक दशकं हेटाळणी सोसणाऱ्या जग्गीने त्यातही सुख शोधलं होतं. काही दिवसांनी तो इसम जग्गीला आपल्या सोबत घेऊन गेला. सरोज आणि गिरीजाबाई दोघांनीही तिला विरोध केला होता. पण प्रेमाला आसूसलेल्या जग्गीला कशाचीही पर्वा नव्हती. आपलं चंबूगबाळ आवरून ती त्या इसमासोबत निघून गेली. ती गेली आणि कामाठीपुरा तिला विसरून गेला. बाकी जगाचं या दुनियेशी फक्त भोगविश्वापुरतंच देणंघेणं असल्याने कुणाला इथली फिकीर असण्याची गरज ती काय ? बऱ्याच वर्षानंतर गिरीजाबाईच्या अड्ड्यावरील जुन्या बायकांकडून कळले की तो इसम एक एजंट होता. वय झालेल्या, पोटपाण्याची भ्रांत असलेल्या बायकांना तो आपली शिकार बनवायचा. वैद्यकीय व्यवसायातील एका रॅकेटचा तो एक किरकोळ घटक होता. अवयव काढून घेण्याचा त्यांचा धंदा होता. त्याचं पितळ उघडं पडल्यावर त्याची हत्या झाल्याचं उघडकीस आलेलं. ही माहिती कळताच एकच विचार मनात आला. जग्गीचे सगळे अवयव त्यानं काढून घेतलेले असावेत, तिची सुटका झालेली असावी. एखादी किडनी वा लिव्हर काढून काय होईल ? फार तर तिचे हाल वाढतील. त्यापेक्षा मेंदू, हृदय, डोळे यासह जे जे काही लागतं ते ते काढून घेतलेलं असावं. जग्गीचे अवयव ज्यांना बसवले असतील त्यांचा जगण्याचा कणा ताठ असेल की नाही हे कळायला मार्ग नाही. 

गुलकी आणि जग्गी एकाच जगाच्या दोन बाजू असल्या तरी दोघींच्या पारड्यात दुःख आलं, फसवणूक आली. त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन असमान आणि बधीर का राहिला याचे उत्तर आता शोधतोय...


- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा