गतवर्षी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ती प्रकाशित केली. 'द स्कल ऑफ आलम बेग' हे तिचं नाव. भारतीय माध्यमात त्याची फारशी चर्चा झाली नाही परंतु ब्रिटीश आणि आयरिश माध्यमात त्यावर खरपूस चर्चा झडल्या. इव्हन बीबीसीनेही या कादंबरीची दखल घेतली होती. डॉक्टर किम वॅग्नर हे इतिहास संशोधक आणि प्राध्यापक आहेत. त्यांनी दक्षिण आशियाच्या इतिहासावर केम्ब्रिज विद्यापीठात २००३ साली पीएचडी केलेली आहे. यात त्यांची सहा वर्षे खर्ची पडलीत. सुरुवातीला त्यांनी एडिनबरो विद्यापीठात संशोधन सहाध्यायीची भूमिका निभावली. त्यानंतर बर्मिंगहॅम विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आता ते लंडन विद्यापीठात ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास शिकवतात. वॅग्नर लिहितात की ही कवटी ब्रिटिशांना एक शौर्यचिन्ह वाटावं हेच मुळात लांच्छन आहे. खरं तर ही कवटी एक दुःखद प्रतिक आहे ज्यातून वसाहतवादी साम्राज्याविरुद्धचा एल्गार प्रकट होतो आणि सोबतच दुबळ्या लोकांवरच्या क्रौर्याचंही ते प्रतिक आहे. ही कवटी अशा पद्धतीने जोपासून ठेवण्यावरून ब्रिटीशांच्या अमानवी छद्म दृष्टीकोनाच्या चिंधडया वॅग्नर उडवतात.
ब्रिटिशांनी किती क्रूरतेने व पाशवी पद्धतीने १८५७ चे बंड मोडून काढले याचा रक्तरंजित पट त्यांनी कादंबरीतून उभा केला. एकोणीसाव्या शतकातील सर्वात मोठ्या बंडाचा संवेदनात्मक पट त्यांनी रेखला आहे. मृत्यूचे तांडव आणि मायभूमीच्या स्वातंत्र्याच्य ओढीपायी जीव देणारे, जीव घेणारे भारतीय सैनिक यांची दास्तान त्यांनी मांडलीय. १८५७ चे बंड हा किम वॅग्नर यांच्या कादंबरीचा विषय नसून बंड शमल्यानंतर सुडाने पेटलेल्या आणि साम्राज्यवादास ललकारणाऱ्या निशस्त्र दुबळ्या लोकांना, सैनिकांना ब्रिटीश सैन्याने कसे वेचून वेचून मारले याचा मस्तक सुन्न करणारा इतिहास ते मांडतात. भूमिगत झालेल्या विद्रोहयांना कुठून कुठून कसे कसे शोधून काढलं गेलं, अगदी हिमालयात देखील ब्रिटिशांनी छापेमारी केली यावर ते लक्ष वेधतात. कादंबरीत अकरा प्रकरणे आहेत. त्यानंतर एक परिशिष्ट आहे ज्यात बंडात सामील असल्याच्या संशयावरून मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावण्यात आली यावर प्रकाश टाकला गेलाय. पुस्तकातील नकाशांवर काही अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह लावलंय हा मुद्दा वगळता भारतीय वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल. शोषण, पिळवणूक आणि अत्याचार यांचा उल्लेख करताना किम वॅग्नर यांनी नकळतच पण सजगतेने ब्रिटीशांच्या वर्णभेदी मनोवृत्तीवरही कटाक्ष टाकला आहे.
किम वॅग्नर यांची दुसरी शोधकादंबरी याच वर्षी प्रकाशित झालीय. तिचे नावच 'अमृतसर 1919' असे आहे. 'ऍन एम्पायर ऑफ फिअर अँड द मेकिंग ऑफ ए मॅसॅक्रे' अशी त्याची टॅगलाईन आहे. यावरून वॅग्नर यांचा स्पष्ट रोख कुणावर आहे हे कुणासही कळेल. जलियानवाला बाग हत्याकांडास यंदा शंभर वर्षे पूर्ण झालीत. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे महत्व अधिक आहे. येल युनिव्हार्सिटी प्रेसने हे ३६० पानी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 'इकॉनॉमिस्ट' सारख्या दिग्गज नियतकालिकाने या पुस्तकाची दखल घेऊन त्यावर एक स्वतंत्र लेख प्रकाशित केलाय. त्यामुळे कुतूहल चाळवलेय हे निश्चित. 'इकॉनॉमिस्ट' मधल्या लेखाचे शीर्षक आहे : "साम्राज्याची पिशाच्चे - अमृतसर हत्याकांड एक लाजिरवाणा अत्याचार' (Evils of empire - The Amritsar massacre was a shameful atrocity) या लेखात चर्चिलेल्या मुद्द्यांचा परामर्श येथे घेतलाय.
१३ एप्रिल १९१९ रोजी सैन्याच्या तुकडीचे व शस्त्रसज्ज वाहनांचे नेतृत्व करणाऱ्या जनरल रेगीनल्ड डायर यांच्या ताफ्याने अमृतसर मधील जलियानवाला बागेच्या परिसरात घुसखोरी केली. या ठिकाणाकडे जाणारया गल्ल्या अरुंद होत्या, पुढे जाऊन त्यांचे रुपांतर छोट्या बोळात झालं होतं त्यामुळे जनरल डायरला त्याची शस्त्रसज्ज वाहनं बाहेर रस्त्यावर सोडून देऊन केवळ शस्त्रधारी सैनिकांच्यासह आत यावं लागलं. आतल्या पटांगणात तब्बल १५००० निशस्त्र शांत भारतीय स्त्री पुरुषांचा जमाव होता ज्यात लहान मुले आणि वृद्धही सामील होते. तिथं सुरु असलेल्या राजकीय भाषणांना ते शांततेत ऐकत होते. काहीजण तर केवळ उत्सुकतेपोटी आल्याचं मत पुस्तकात नोंदवण्यात आलंय. असं असूनही डायरला हा जमाव विचलित करणारा व खुनशी वाटला याकडे लेखक किम वॅग्नर लक्ष वेधतात. डायर म्हणतो की, 'या जमावाचे हात घटनेच्या एक दिवस आधी ब्रिटीशांच्या रक्ताने माखले होते आणि हा जमावही बेकाबू झाला होता' प्रत्यक्षात असं काहीच नव्हतं. अगदी थंड डोक्याने डायरने गोळीबाराचे आदेश दिले. सलग दहा मिनिटे गोळीबार सुरु होता. रायफल्सचे १६५० राऊंड फायर करून झाले. किमान ३७९ जण मरण पावले. शेकडो जखमी झाले. घटनास्थळी कोणतीही वैद्यकीय मदत वा औषधोपचार दिले जाऊ नयेत यासाठी डायरने आधीच सूचित केलेलं होतं. आपल्याला दिलेलं काम 'चोख' बजावून होताच तो अगदी निर्विकारपणे तेथून बाहेर पडला. ब्रिटिशांनी ही बातमी एक महिना जगापासून लपवली होती. मात्र 'बाॅम्बे क्रॉनिकल'चे संपादक बी.जी. हॉर्निमन यांनी या घटनेचा सचित्र व अचूक रिपोर्ताज ब्रिटनच्या ‘द डेली हेरॉल्ड’मध्ये प्रकाशित केला. तेव्हाकुठे हे वास्तव समोर आलं. आयरिश वंशाच्या बेंजामिन हॉर्निमन यांच्यावर नाराज झालेल्या ब्रिटिश सरकारने त्यांना २ वर्षे तर साक्षीदारांना ३ वर्षे तुरुंगात डांबले. तुरुंगवासात त्यांनी या जेनोसाईडला शब्दबद्ध करत ‘अमृतसर अँड अवर ड्यूटी टू इंडिया’ नावाचे पुस्तक लिहिलं. हॉर्निमननी या नरसंहाराची तुलना कांगो अत्याचार, बेल्जियम व फ्रान्स येथे जर्मनीने केलेल्या नरसंहाराच्या घटनेशी केलीय.
अमृतसर हत्याकांड हा आजवरच्या ब्रिटीश साम्राज्याच्या इतिहासातील एकल व्यक्तीने केलेला सर्वाधिक कठोर नृशंस नरसंहार ठरावा. नरसंहार कसा, कधी केंव्हा झाला यावर ब्रिटीशांकडून प्रश्नचिन्हे लावली गेली नाहीत कारण वास्तव बदलता येत नव्हतं मात्र हा नरसंहार का घडवून आणला गेला, याचे नेमके अन्वयार्थ कोणते यावर बराच खल झाला. पण नेमका व खरा हेतू, मतितार्थ कधीच समोर आला नाही असा निष्कर्ष किम वॅग्नर नोंदवतात. इतकेच नव्हे तर भारतास स्वातंत्र्य दिल्यापासून अनेकदा दिग्गज ब्रिटीश असामींनी अमृतसरला भेट दिली आहे पण आजवर बिनशर्त माफी मागितली नाही हे धक्कादायक असल्याचं मत ते नोंदवतात. अशी माफी मागणं कदाचित ब्रिटीश साम्राज्यास तिरस्करणीय वाटत असावं. या हत्याकांडावर बोलताना विन्स्टन चर्चिल यांनी अत्यंत त्रोटक प्रतिक्रिया नोंदवली होती. कत्तलीने कदाचित राक्षसी स्वरूप घेतलं असावं असं ते म्हणाले होते. पण त्यात कुठेही निषेध, आत्मवंचना जाणवत नाही. त्याचवेळी ही घटना ब्रिटीश इतिहासाच्या आधुनिक इतिहासातील भयावह एकाकीपणाचं व एकाधिकार वृत्तीचं प्रतिक असल्याचं बोललं गेलं. वाईट गोष्ट अशी की अलीकडील काळातील इतिहासकारांनीही याच मल्लीनाथीची री ओढली आहे. खरं तर असं प्रतिपादन म्हणजे या हत्याकांडाचं संपूर्ण उत्तरदायित्व जनरल डायरवर ढकलण्याचा लाजिरवाणा प्रकार होय.
'अमृतसर 1919' चं उद्दिष्टच मुळात चर्चिल आणि ब्रिटीश सत्तेचा खरा चेहरा समोर आणणं हाच आहे. किम वॅग्नर म्हणतात की जनरल डायर हा मुळात कुणी स्वयंभू निर्णयक्षमता असलेला उच्चपदस्थ अधिकारी नव्हता. भारतात विद्रोहाचं वारं वाहू लागलं होतं तेंव्हा, विशेषतः १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातल्या दहशत आणि हिंसा याच्या बळावर पोसलेल्या वसाहतवादी ब्रिटीश साम्राज्याचा तो एक प्रामाणिक पाईक होता ! १८५७च्या विद्रोहाआधी कानपूर येथे युरोपियन महिलेची आणि तिच्या मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती त्याने ब्रिटीश साम्राज्य हादरून गेले होते, हा धक्का इतका मोठा होता की त्याच्या भीतीतून सावरण्यासाठी भारतीयांना भीती वाटली पाहिजे असं कृत्य केलं जावं असं ब्रिटीश राजसत्तेला वाटू लागलं. त्यातूनच अमानुष क्रूर हत्याकांड करण्याचं डायर सारख्या विकृत अधिकाऱ्यांच्या मनात घोळू लागलं. कदाचित यामुळेच डायरने जे केलं त्याचा ब्रिटीश सत्तेने कधीही धिक्कार केला नाही.
अमृतसरच्या घटनेआधी दोन स्थानिक नेत्यांना अकारण निष्कासित केलं गेलं त्यामुळे संतापलेल्या जमावानं तीन ब्रिटीश पुरुषांची हत्या करून महिलांचा विनयभंग केला अशी एक आवई उठवली गेली. डायर याचे कधीही पुरावे देऊ शकला नाही तरीही त्याने या कथित घटनेस बंदुकीच्या टोकावर जोखले. जलियानवाला बागेत एकत्रित आलेल्या निशस्त्र समुदायाची कत्तल करून डायरला बंडाचे निशाण फडकवू द्यायचे नव्हते, त्या विद्रोहाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि क्रांतीकारकांची कर्मभूमी असलेल्या भूमीत हे हत्याकांड घडवून लोकांच्या मनात जरबयुक्त भीती निर्माण करायची होती हे सत्य होतं. सर्वसामान्य माणसांनी बंडात सामील होऊन क्रांतीकारक होण्याआधी इंग्रजांची भीती त्याच्या मेंदूत ठाण मांडून बसली पाहिजे हा त्याचा हेतू होता. हत्याकांडानंतर या भागात सहा आठवडे मार्शल लॉ लागू होता. यादरम्यान लोकांना दंडुक्यांनी मारहाण होत होती. अकारण तुरुंगात डांबलं गेलं. पुढची पायरी गाठत गुजरांवालामध्ये लोकांवर बाॅम्ब डागण्यात आले, गोळीबारदेखील केला. लोकांना निर्वस्त्र करून गुडघ्यावर बसवत मारहाण केली. डायरने कथित सूडाच्या भूमिकेतून केलेल्या या कारवाईमुळं ब्रिटीश अधिकाऱ्यात तो नायक ठरला. ब्रिटीश जनतेनेही त्याला डोक्यावर घेतलं. एका ब्रिटीश वर्तमानपत्राने तर त्याच्यासाठी फंडरेझिंग करून तब्बल २६००० पाउंड इतकी रक्कम जमा केली. त्याकाळी ही रक्कम खूप मोठी होती हे नमूद करण्याजोगे होय. याचा एक परिणाम असाही झाला की जलियानवाला बाग हत्याकांडाची झळ पोहोचलेल्या कुटुंबियांना ब्रिटिशांनी, विविध संघटनांनी देऊ केलेली पुनर्वसन रक्कम स्वीकारण्यास भारतीयांनी ताठ मानेने नकार दिला !
जलियानवाला बाग प्रकरणी हंटर कमिटीच्या अहवालात सत्य समोर आल्यानंतर पुरती शोभा होऊनदेखील ब्रिटिशांनी यावर मनःपूर्वक माफी मागितलीच नाही. किम वॅग्नर यांच्या या पुस्तकाने ब्रिटीश राजसत्तेची पुरती पोलखोल केल्याने यंदा तरी ब्रिटीशांकडून या प्रकरणी माफी मागितली जाईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही. १९२०मध्ये पंतप्रधान विंस्टन चर्चिल म्हणाले होते की, जालियनवाला घटना भयंकर व राक्षसी घटना होती. १९९७ साली महाराणी एलिझाबेथ द्वितीय वदल्या की, हे भारतासह आपल्या इतिहासातील एक वेदनादायी उदाहरण आहे. २०१३ला पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जालियानवाला बागेच्या अभिप्राय वहीत लिहिलंय की, ‘या घटनेला आपण कधीही विसरता कामा नये.’ तर यंदा पंतप्रधान थेरेसा मे म्हणाल्यात की ही घटना ब्रिटिश इतिहासावरील कलंक आहे. त्या वेदनेबद्दल दु:ख वाटते. जलियानवाला बागेतील हत्याकांडात व १८५७च्या बंडात मृत्यूमुखी पडलेल्या हुतात्म्यांना आपण खरा न्याय देऊ शकलो नाही हे एक लाजिरवाणे सत्य आहे आणि आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही ही वृत्ती अधिक क्लेशदायक आहे.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा