काचेच्या तावदानातून खाली पाहताना
तिला रस्त्यावरचे जथ्थे दिसायचे
गर्दीला चेहरा नसतो असं कोण म्हणतं?
इथे तर चेहरा आहे कराल, अक्राळ विक्राळ वासनेचा !
घरी नातवंडे असलेली
कंबरेत पोक आलेली माणसे सुद्धा इथे आलीत,
वर्षाकाठी कित्येक पोरींशी अफेअर करणारी पोरंही आहेत,
वळवळ वाढली आहे त्यांच्या डोक्यात.
ढेरपोटे आहेत, बरगडया मोजून घ्याव्यात असेही आहेत,
भुकेकंगालही आले आहेत आणि
लॉकेट ब्रेसलेटानी मढलेलेही आलेत.
त्यात गांजेडी, दारुडे, बैरागी, फकीर, नशेखोर,
माव्याचे लेंड भरलेलेही आहेत.
नोकरदार आहेत, व्यापारी आहेत, रोजंदारीवाले आहेत
रुमालाला तोंड बांधलेले गिर्रेबाज ऑफिसरही आहेत.
नुकतीच मिसरूड फुटू लागलेली
कोवळी पोरेही आलीत,
निर्लज्ज झालीत ती जरा!
कसलेही पाचकळ प्रश्न विचारतात,
कितीही सरळ उत्तरे दिली तरी दात विचकतात
मोबाईल क्लिप काढू दे म्हणतात!
एकाच वेळी तिघे चौघे आत असुदेत म्हणतात,
हे सर्वात नीच असतात.
साले बाहेर पण असेच लिंगपिसाट फिरत असणार.
दिलजलेही आलेत, घटस्फोट झालेले आलेत,
तुंबलेलेही आलेत,
नौटंकीबाज तर खूप येतात.
काही अगदी कमीने येतात
नको तिथे हात घालून सवालजवाब करतात,
असं वाटते की त्याच्या तोंडावर अंगावर पचापचा थुकावं पण
राग गिळून नि लाज सोडून मुकाट उभं राहावं लागतं.
काही एकदम ‘अनोखेलाल’ही येतात,
साले दारू पाजतात, चिकनचं पार्सल मागवतात ;
सिगारेट बिडी सगळं देतात,
रात्रभर नंगड बसवतात,
हात लावत नाहीत पक्वत राहतात.
तर काही एकदम जले मुर्दे उखाडणारे येतात,
फुल नाईटचे पैसे देतात,
काही करत नाहीत, कलेजा खाली करून जातात,
साला फोकटमधी इमोशनल करून जातात.
हा बाजार आहे, इथे विकते ती चमडी
इथे रगडली जाते ती बॉडी
फेडली जाते ती आपलीच लाज
कुस्करला जातो तो मादीचा ऐवज
इथे डस्टबीनमध्ये जाते त्या साळसूदांचे वीर्य
ज्याच्या डीएनएत भोंगळ संस्कृतीचे अधम जोपासलेले असतात...
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा