शनिवार, २५ मे, २०१९

हुस्न, इश्क और बदन : गुजरी हुई जन्नत...

नवाबाच्या दरबारातलं पण आम आदमीसाठी खुलं असलेलं गाणं बजावणं 
मागे काही दिवसापूर्वी मुजरेवाल्या तवायफांवर एक लेख लिहिला होता. त्यातला एक संदर्भ लागतच नव्हता. लखनौमधील एक मित्र योगेश प्रवीण यांनी तो संदर्भ मिळवून दिला. एका जमान्यात बनारस हे तवायफ स्त्रियांचं मुख्य शहर होतं. सुरुवातीच्या काळात लोक त्यांच्याकडे लपून छपून जायचे. बाकी अमीरजादे या गल्ल्यात पाय ठेवत नसत कारण कैकांनी आपल्या बगानवाडीत अशा खंडीभर बायका ठेवलेल्या असत. या बायकांकडे जायचं म्हणजे पुरुषांना खूप कमीपणा वाटायचा. शिवाय लोकलज्जेचा मुद्दाही होता. पण हे चित्र एका माणसामुळे बदलले. त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. आपल्याला सिराज उद्दौला म्हटलं की फक्त प्लासीची लढाई आठवते. मात्र या खेरीजही या माणसाचं एक सप्तरंगी चरित्र होतं.

हा बंगालचा नवाब होता. १७५७ मध्ये त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्हच्या अधिपत्याखालील सैन्याशी प्लासी येथे मोठं युद्ध लढलं होतं, ज्यात त्याची मोठी हार झाली होती. १८५७ च्या बंडापूर्वी शंभर वर्षे आधी त्यानं इंग्रजांशी पंगा घेतला होता, खुन्नसने लढला. भारतीय इतिहासाला वेगळं देणारी लढाई म्हणून या घटनेकडे पहिले जाते. तर हा सिराज उद्दौला जितका शूरवीर योद्धा होता तितकाच मोठा रसिक दर्दी होता. त्याला घुंगरांचा आणि अत्तरांचा नाद होता.

नवाबाच्या शाही कुटुंबात नाचगाणं करताना विशेष अदाकारा येत 

तो बायकांकडे जायचा पण बाईलवेडा नव्हता. राजे राजवड्यात ठेवलेल्या बायकांत फारसा दम नाही हे त्याने काही मैफलीत ताडले होते. खरं गाणं बजावणं ऐकायचं असेल, घुंगरांचा अस्सल आवाज ऐकायचा असेल तर आपल्याला बदनाम गल्ल्यांची धूळ अनुभवावी लागेल हे त्यानं पक्कं केलं.

त्यानं बनारस गाठलं, पण तिथल्या हिंदू देव देवळांची गर्दी आणि लोकांची देवभक्ती पाहून त्याच्या मनात वेगळा विचार आला. त्यानं तिथला हा सगळा शृंगार सौंदर्याचा 'बाजार' हलवून लखनौला आणला. तेंव्हापासून लखनौ हे तवायफ आणि शायरीचं शहर म्हणून ख्यातीही पावलं आणि काहीसं बदनाम ही झालं. तिथलं आदरातिथ्य, तिथलं नाचगाणं, तिथली आदबीची बोली, तिथली गंगा जमुनी संस्कृती, तिथली श्रीमंती आणि तिथले दौलत लुटवण्याचे किस्से हे सगळं लोकांच्या चर्चेचे विषय झाले. लखनौच्या ज्या गल्लीत हा बाजार वसला त्याला ‘फूलवाली की गली’ असं सार्थ नाव पडलं.

खुद्द नवाबच इथं येऊ लागल्यानं सामान्य माणसाची भीड चेपली आणि हरेक दर्दी रसिक व्यक्ती इथं पायधूळ झाडू लागली. नंतरच्या काळात तर इथे दिवसाही गुलाब, अत्तर आणि घुंगरांचा अंमल राहू लागला. कालांतराने इथं येणाऱ्या लोकांची संख्या इतकी वाढली की स्त्रिया कमी पडू लागल्या, कोठे खुजे पडू लागले.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्व प्रमुख प्रांतातील वेशभूषा इथे दिसून येई 

सौंदर्यवतींची मागणी होऊ लागली. सिराज उद्दौलाने आपली पारखी नजर बंगालकडे वळवली. तिथल्या मातीत असणाऱ्या लावण्यवतीचा मादक देहगंध त्याच्या चांगल्या परिचयाचा होता. त्यानं तिकडच्या अदाकारा, गायिका, नर्तिका, सौंदर्यवती ललनांचा ओघच लखनौकडे वळवला. मग लखनौ आणखी रंगीन मिजाज झालं. (आजही सेक्सवर्किंगमध्ये, चामडी बाजारच्या स्कीन करन्सीमध्ये बंगाली मुली मोठ्या प्रमाणात का आढळतात त्याचं उत्तर इथं आढळतं)

सिराजच्या मृत्यूनंतर मुजराविश्वावर अवकळा आली. तो जोश, ती दाद उरली नाही, ते कदरदान लोप पावले, ते कलाप्रेमही उरलं नाही. दोन्ही बाजूंनी नुसती

फसवणूक, पिळवणूक सुरु झाली. बायकांचे शोषण होऊ लागले. दरम्यान ब्रिटीशांनी मुंबईत कामाठीपुरा वसवला. इथल्या काही बायका पैशाच्या आशेने तिथं गेल्या. या बायका कामाठीपुऱ्यात जिथं वस्तीत आल्या तो भाग मुजरेवाली की गली म्हणून लौकिक पावला. तिथे आजही बच्चूची वाडी नावानं थोडासा भाग आपलं नाचगाण्याचं अस्तित्व टिकवून आहे. इथल्याच काही बायका पुन्हा कोलकत्यास गेल्या आणि सोनागाचीचा उदय झाला. आशियातील सर्वात मोठया वेश्यावस्तीचा धब्बा तिला लागलाय. याच दरम्यान मराठी मुलखातूनही काही बायका लखनौच्या मंडीत विकल्या गेल्या. त्यांची तिथं स्वतंत्र इमारत होती ! विविध स्वाऱ्या, युद्धे यासाठी उत्तरेत येणारे ‘वीर’(!) त्यांच्याकडं यायचे ! या बायका मराठी मुलुखात परतल्या की नाही हे ज्ञात नाही पण यातल्याच काही बायका पाकिस्तानपर्यंत फिरवल्या गेल्या.
डेव्हिड कोर्टनीनं काढलेलं छायाचित्र 

पाकिस्तानच्या लाहौर शहरातील कुख्यात हिरामंडीतल्या काही मोजक्या बायकांना हिंदीमिश्रित मराठी अवगत असल्याचं कारण इथं दडलं असावं. डेव्हिड कोर्टनी या प्रवासी छायाचित्रकाराने १८२६ मध्ये लखनौच्या ‘फूलवाली की गली’स भेट दिली होती. त्यानं काढलेल्या काही छायाचित्रापैकी एक छायाचित्र मराठी तवायफांचे आहे. नाकात नथणी, आवळून बांधलेला अंबाडा, काष्टा असलेली नऊवार साडी या पारंपारिक मराठी पोशाखात या बायका खास फोटोसाठी तयार झाल्याचं त्यात जाणवतं.

मुजरेवाल्या तवायफ देहविक्रय करत नसायच्या, पण जेंव्हा त्यांचं शोषण सुरु झालं तेंव्हा त्यांच्यापुढं पर्यायच उरले नाहीत. कल्पना करा जो समाज आज स्वतःला आधुनिक आणि लिबरल म्हणवून घेतो तो देखील एखाद्या वेश्या स्त्रीचं पूर्वायुष्य माहित झालं की तिच्याकडे वखवखल्या नजरेने पाहतो, मग त्या काळात दोनशे अडीचशे वर्षापूर्वी नाचगाणं करणाऱ्या एखाद्या स्त्रीचं शोषण झाल्यावर जगण्यासाठी तिच्याकडं देहविक्रयाखेरीज पर्यायच उरत नसत. लखनौमधून तवायफ आणि कोठे नामशेष होत गेले. 'फूलवाली की गली' पाहता पाहता ओस पडली. मग तुम्ही म्हणाल की लखनौतल्या त्या बायका कुठे गेल्या ? नेमका हाच संदर्भ मलाही लागत नव्हता. उत्तर होतं, त्या बायका तिथंच लखनौमध्येच राहिल्या पण त्यांच्या गल्लीतून त्या विस्थापित झाल्या.

हळूहळू त्या सगळ्या जणी एकाच गल्लीत जमा होत गेल्या. आणि त्या गल्लीला नाव पडलं 'चावल की गली' ! नावावरून काहींना असं वाटेल की इथं तांदूळ वगैरे

तत्सम काही विकलं जात असेल. तर तशी स्थिती तिथं कधीच नव्हती. आजही नागमोड्या वळणांचे अरुंद बोळ असणारी चावल की गली लखनौमध्ये अस्तित्वात आहे. चावल म्हणजे भात. कुणीही या आणि या भाताच्या वाडग्यात आपला हात घाला, हवं तितकं खा, ओरबाडून खा, ओरपून खा, ओकाऱ्या येईपर्यंत खा ! कुणी अडवणार नाही. किती सूचक नाव पडलं नाही का ! तेंव्हाची स्थितीच तशी होती. तो काळच तसा होता. किंबहुना तोच काळ का, मी तर म्हणेन की थोड्या फार फरकाने आजही तोच काळ आहे. भाताचे वाडगे आजही खुलेच असते, जिथे खुले नसेल तिथं आता लोक कळपाने हात मारत असतात. लैंगिक अत्याचार असं गोंडस नाव आम्ही त्याला दिलंय. असो. विषयांतर नको. तर, मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातील मुजरागल्लीतल्या अखेरच्या काही मोजक्या बायका ज्या वार्धक्याकडे झुकल्या होत्या त्यातील एकीने ( ती चिकाच्या पडद्याची आणि त्या मागच्या अप्सरेची मधाळ पोस्ट आठवतेय ना !) तिचा अंधुक इतिहास सांगताना खीन्नी गलीमधून तिच्या गतपिढ्या आल्याचं सांगितलेलं.

आश्चर्य वाटेल पण यातही एक रसिला अर्थपूर्ण इतिहास दडला होता. ज्या बायका लखनौमधून
लाहौरच्या हिरा मंडीचं रात्रीचं दृश्य    
कामाठीपुऱ्यात येऊन इथंच स्थायिक झाल्या होत्या, त्यांची लत लागलेले काही दर्दी शायर होते. काही केल्या त्यांच्या काळजातून या बायका जात नव्हत्या. त्यांनी मग अवध. लखनौहून थेट यांच्या वाऱ्या सुरु केल्या. हे शायर इथं येऊ लागल्यामुले या बायकांचीही चलती झाली. अन्य ठिकाणाहूनही जसे की हैदराबाद, दौलताबाद, मुरादाबाद, कानपूर येथूनही त्यांच्याकडे ओढा सुरु झाला. एकाच वेळी शायरी आणि शृंगार यांचा लुत्फ घेण्याचा तो जमाना पुरता नशीला असणार ! कालांतराने इथला मुजराही लोप पावत गेला. या इलाख्यातील अत्तराचा फाया विकणारे लोक म्हणजे सर्वात मोठे खबरी समजले जात. आजही ग्रांट रोडच्या खेतवाडी परिसरातील अत्तरांच्या दुकानातील वयोवृद्ध मालकास गाठले की ते बरीच माहिती देतात. त्यांच्या ओठातून अत्तराहून सुगंधी माहिती बाहेर पडत राहते आणि काही वेळाने अश्रूही ओघळताना दिसतात. कदाचित त्यातून गुजरा हुआ जमाना आणि त्यातली यादे पाझरत असावीत...

मात्र या बायकांकडे असणारं विविध शायरांनी तिथं येऊन मद्य मदिराक्षीच्या साक्षीनं लिहिलेलं एक
शगुफ्ता बेगम कधी काळी पायांना घुंगरू बांधत होत्या,
त्यांना  आता जिने उतरता येत नाहीत  
अप्रतिम बाड होतं. जे प्रत्येकीकडं होतं. काहींनी ते विकलं, तर काही भंगारात गेलं, तर काहींना त्याचं मोलच कळलं नाही. ते नामशेष झालं. मी अप्सरा रंभा उर्वशी पाहिल्या नाहीत पण यांच्यापैकी काहींच्या वारसाचं 'ओझं' असणाऱ्या बायका पाहिल्यात, भेटलोय. त्यांचे सौंदर्य पाहता त्यांच्या पूर्वज स्त्रिया या मदनिकाच असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. असो. खीन्नी गल्लीचा शोधही लागला. नावच खिन्न वाटत होतं, पण इतिहास जिंदादिल निघाला. लखनौमध्येच 'खीन्नी वाली गली' आहे. इथं मीर तकी मीरचा दौलतखाना होता, आता या गल्लीत मीर अनिस आणि मीर दबीर यांच्या कब्र आहेत. लखनौमधील सगळ्या शायरांची या गल्लीत बैठक असायची. हुस्न, इश्क आणि बदन यांचे शब्दकारंजे इथंच फुलले. याच गल्लीतले काही बंदे कामाठीपुऱ्यात आले आणि तिथल्या रात्री बहारदार होत गेल्या !

‘त्या’ रात्री मी अनुभवलेल्या नाहीत पण या दुनियेत फिरलेलो असल्याने त्याची कल्पना करू शकतो. जन्नत म्हणतात ती अजून काय वेगळी असणार ? नाही का ?


- समीर गायकवाड.



आजच्या काळातली लखनौमधली चावल की गली  

1 टिप्पणी: