Thursday, January 11, 2018

मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले....एक आरसपानी पाऊस ! ,,,,,,,,,,,,


मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले....एक आरसपानी पाऊस !....
सगळीकडे मेघ नुसते दाटून आलेले आहेत. संततधार धुंद पाऊस एका लयीत शांतपणे पडतो आहे. वातावरण सगळे कुंद झालेले आहे. आभाळातून येणारया प्रत्येक थेंबाचा आस्वाद सकळ वसुंधरा घेते आहे. झाडे अगदी चिंब ओली झाली आहेत पण तरीही अजूनदेखील आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि गर्द ढगांच्या दाट सावल्यांचे आकाशच आता वाकून झाडांच्या मनात डोकावते आहे. या हवेने या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारया भूमिपुत्राचे मन चिंब झाले आहेअन नुसते ते चिंब - झिम्माड झालेले नाही तर ते झाडांच्या मस्त नानाविध रंगात न्हाऊन गेले आहे. झाडांच्या पाना फुलात पालवीत इतकी ओली हिरवाई आलीय की त्या हिरवाईतच ओलेते व्हावे वाटते आहे. भरून आलेले काळेकुट्ट मेघ इतके दाटून आहेत की त्यांच्या सावल्यांनी आकाश खाली आल्याचे भास होतोय...

पाऊस पाखरांच्या पंखांवर थेंबथेंबाच्या दाटीने बसून आहेअधून मधून मध्येच येणारा मोठ्या सरींचा शिडकावा आकाशाच्या निळाईत डोकावणारया झाडांना कुसुंबात मळवून टाकतोय.हा पाऊस काही थांबणारा नाहीयेकारण ही संततधार आहे. त्यामुळे शेवटी पक्षी आपले ओलेते पंख घेऊन दाट झाडीत असणारया आपापल्या घरट्यात परत येतायत. मात्र तिथेही पावसाची हवा घेऊन फिरणारा ओलसर गर्द वारा आहेया वारयात सगळी गात्रे गोठून जातील असा गारवा आहे त्यामुळे पक्षांच्या पंखांचा ओला पिसारा अजून धुरकट फिकट होत चाललेला आहे.बाहेर थंडी वाढत चालली आहेआभाळ अजून काळसर होत चालले आहेअशा वेळेस मन बेचैन होऊन तिची (प्रियेची) आठवण येणे साहजिक आहे. पण ती येथे नाहीयेतर मग या श्रावणी धुंद हवेला घट्ट मिठीत कवटाळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या हवेला कवटाळले की ह्याच ओलेत्या घनगर्द आकाशाचा एक हिस्सा बनता येईल अन हे दाट भरलेले मायेने ओथंबलेले मेघ पांघरोनी तिच्या शोधात दूरदूर जाणे सोपे होणार आहे.

तिच्या शोधात जाणारे मन हे आधी कुठे जाणार पावसाळी सांजवेळेमुळे सगळा आसमंत हा लवकर रिता होत जातोगावाकडची माणसे आपली कामे उरकून आपापल्या घरात लवकर येतात. परिसर निर्मनुष्य होऊन जातो. आपसूकच सगळ्या शिवारालारानाला एकसुरी सुनसान शांतता लाभते. तर अशा या भावविभोर धुंद संध्येला मनमोर रम्य गावातल्या एककल्ली रानात ती मोकळ्या केसांत फुले माळून वाट बघत बसली असणार आहेतिच्यासाठी फुलांनी देखील पुन्हा नव्याने उमलून यावे अशी अल्वार नार उंबरठ्यापाशी उभे राहून आकाशाकडे डोळे लावून आहे.तिच्याकडेच मन मेघातून जाणार यात नवल ते काय ?

या मनोरम्य पावसाळी सांजवेळी तिची आठवण माझ्या मनात अशी काही रुंजी घालते आहे की माझ्या डोळ्यांच्या गलबतात हिरव्या ओल्या मेंदीने मस्त सजवलेले तिचे ते मखमली हात तरळत आहेत. खरे तर असं कोणी आहे का नाही हे माहिती नाहीपण या चिंब पावसाळी झाडांच्या रंगात ओलं झालेलंश्रावणी हवेला मिठी मारुन आकाश पांघरून अनामिक भ्रमंतीला निघालेलं मन या धुंद हवेमुळेच की काय एका देखण्या राजकुमारीच्या शोधात कुठे तरी डोळे गुंतवून बसले आहे हे मात्र नक्की !

एका धुंद पावसाळी संध्येचे अप्रतिम वर्णन करताना चिंब भिजलेल्या मनाने घातलेली प्रेमाची हळुवार अन आर्त साद या कवितेत आहे. पावसाचं देखणं आरसपानी चित्र रंगवत रंगवत कवी आपल्याला नकळत मुग्ध प्रेमाच्या शोधातल्या सुंदर राजकुमारीच्या डोळ्यांच्या पारयात अलगद नेऊन ठेवतात हे या कवितेचे अद्भुत यश.यातल्या प्रतिमांचे वर्णन करायला शब्द कमी पडतील इतक्या त्या गहन व अर्थगहिरया आहेत. झाडात रंग ओलेझाडे निळी कुसुंबी,ओला फिका पिसारारानात एककल्ली सुनसान सांजवेळीमन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले … शब्दांचे प्रयोजन असं काही आहे की त्या ओळींना एक मस्त लय येते आणि ते चित्र आपल्या डोळ्यापुढे एखाद्या पोर्ट्रेटसारखे उभे राहते.
मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओलेघनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेलेपाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबीशिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबीघरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारागात्रात कापणारा ओला फिका पिसाराया सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावेआकाश पांघरोनी मन दूरदूर जावेरानात एककल्ली सुनसान सांजवेळीडोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावींकेसांत मोकळ्या या वेटाळुनी फुलांनाराजा पुन्हा नव्याने उमलून आज यावेमन चिंब पावसाळी मेंदीत माखलेलेत्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले......

निसर्गाचे वर्णन ज्यांच्या कवितांमधून नदीच्या प्रवाहाप्रमाणे बारोमास येत राहते तेही अगदी सहजतेने ओसंडून वाहत रहावे अशा पद्धतीने असे काही मोजकेच कवी आपल्या मराठी मातीत आहेत. त्यात कविवर्य ना.धों.महानोरांचे नाव अग्रस्थानी आहे. जो जसा जगतो आणि जसे अनुभव बाह्य जगातून प्राप्त करत राहतो तसे त्याचे भावविश्व घडत जाते. त्यातून आकाराला येते ती त्या निर्मितीक्षम साहित्यिकाची जडण घडण. अनुभव व अलौकिक प्रतिभाशक्ती याचा आत्यंतिक प्रत्यय महानोरांच्या कवितेत सातत्याने येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी जन्म झालेल्या महानोरांना त्यांच्या सभोवतालच्या आसमंताचे अपार वेड आहे. हे निसर्गप्रेम त्यांच्या कवितेतुन आपल्याला नवीन अनुभूती देत एक चेतना बनून राहिले आहे.

ही कविता ते अजिंठ्याच्या परीसरात भटकंती करायला गेले होते तेंव्हाची आहे. त्या देखण्या निसर्गरम्य परिसरात अशी चिंब पावसाळी संध्याकाळ घालवताना त्यांच्या मनात दाटून आलेल्या या सुंदर पंक्तींच्या निर्मितीसमयी तिथल्या कोरीव लेणी साक्षीला होत्या म्हणून तर ही कविता इतकी कसदारआशयघन आणि रसरशीत झाली नसेल ?

'मुक्ताया सिनेमातील एका प्रसंगात ही कविता गुणगुणली गेली आहे. त्यातली चाल मस्तच आहे. अगदी मनाच्या एका कोपरयात ही मस्त ओलीचिंब संध्याकाळ अन तिच्या नाजूक आठवणी हव्याहव्याशा वाटत राहतात अन आपणही नकळत गुणगुणत राहतो. दोनेक वर्षांपूर्वी आलेल्या अजिंठा या सिनेमात याचे रुपांतर नयनरम्य गाण्यात केलं गेलंय..आजही कधी असा कोसळते आभाळ कवेत घेणारा एखादा उनाड दिवस आला तर महानोरांच्या या कवितेसम मन चिंब पावसाळी होऊन जाते....

अंतरंगीच्या लेण्यात कोरून रहावा असा हा मेघमल्हाराचा अक्षय ठेवा रसिक वाचकांच्या ओंजळीत देऊन महानोरांनी पाऊसगाण्यांचे एक अप्रतिम शब्दशिल्प मराठी साहित्यात निर्मिले आहे हे मात्र नक्की ....

- समीर गायकवाड.sameerbapu@gmail.com