Saturday, January 13, 2018

पांथस्थांचा विसावा ...यंदा ऊन जरा जास्त आहे तेंव्हा वाटंनं पुढं जाताना आमच्या या पडवीत येऊन घडीभर बसा अन ताजंतवानं व्हा, शांतशीतल सावलीचा मनसोक्त आनंद घ्या.... वारयासोबत सांगावा धाडा अन सावलीला कान देऊन ऐकतानाच थोडी पाठही टेकवा..प्रेमाच्या दोन गुजगोष्टी करा अन मनातलं मळभ निघून गेलं की आमचा हळवा निरोप घ्या...आमच्याशी बोलायला तुम्हाला ओळखीची गरज नाही पडणार ! सगळे वाटसरू आमचे सोयरेच ! त्यासाठी नात्यागोत्याची गळ कशाला ? गावाकडच्या वाटंवरची आम्ही पिकली पानं, तरीही आमचे जिणं कसं बहारदार आहे हे डोळे भरून बघून जा ! नावं, आडनावं, नातीगोती काहीही कशीही असली तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही. आमच्या घरात टीव्ही, फ्रीज, एसी असलं काही नाही... पण अशा वस्तू ज्यांच्या घरात असतात त्यांच्याइतकंच आमचं मनही मोठं आहे.
रांजणातले पाणी अन लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता आहे. पोटातली आग अन चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी आहे. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा अन पितळी तांब्यातलं थंडगार पाणी तुमची तहानभूक भागवेल...आमच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नाही. निवांत गप्पा मारताना मार्क्स - ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासारख्या गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी घनगंभीर चर्चाही इथं नसते.

वारयाच्या झुळुकेनं गळून पडणारी पानं स्वतःभोवती गिरक्या घेत तुमच्या पुढयात येऊन पडतील, उन्हाचे कवडसे लपाछपीचा खेळ खेळतील अन परसात बांधलेल्या गाई हंबरून तुमचे स्वागतच करतील ! झाडाच्या बुंध्यावर संसार थाटून बसलेल्या खारुताई तुमच्याकडे डोळे भरून बघतील, झाडांच्या फांद्याआडून वारा पानापानातून तुमच्यासाठी वेणुनाद करेल !... तेंव्हा इथल्या मऊशार वाकळीवर बसा अन आळस घालवून टाका. दोऱ्याने बांधलेल्या, काचांचे टवके उडालेल्या चष्म्याआडून आमचे विझत चाललेले डोळे तुम्हाला घडीभरच न्याहाळतील अन तुमच्या काळजात सुरु असलेली घालमेल अचूक ओळखतील....

इथे कुणीही येऊन कितीही वेळासाठी बसू शकतो, पटलं तर इथल्या चवदार शिदोरीचे दोन घास खाऊही शकतो... आपली सुखदुःखं आम्हाला सांगून मनातलं मणामणाचं ओझं तुम्ही अलगदपणे हलकं करू शकता. तुमच्या सुखाचं हसू आमच्या ओठी उमटंल अन तुमच्या दुःखात आमचं डोळं ओलं होतील. घराच्या चार भिंतीतल्या संसाराच्या खरया आनंदाचे अस्सल रुपडं तुम्हाला या चंद्रमौळीत नक्कीच दिसेल. इथल्या जीर्ण दंड घातलेल्या धडूत्यात मखमलीची ऊब मिळेल.

अंतःकरणापासून आमच्या काळजात डोकावलंत तर मात्र आमच्या चेहरयावरच्या सुरकुत्यांत दिसतील सुकून गेलेल्या आसवांचे झरे, बोथट झालेले अठरापगड दुनियादारीचे टोकदार सल, आयुष्याच्या गाथेतल्या कोरलेल्या ओव्या, सटवाईच्या दैन्य भाष्यास खोटे ठरवणारया सुखाच्या बदललेल्या व्याख्या अन कपाळावरच्या आठ्यात विरघळून गेलेला अबीर गोपीचंद !

आम्ही तुमच्याकडून चार गोष्टी शिकून घेऊ, दोन गोष्टी ऐकून घेऊ. तुम्हाला डोळ्यात साठवू. जगायचं कशासाठी अन चिंता कशाची करायची हे जमल्यास आमच्याकडून शिका. मातीच्या गर्भात आम्ही माणुसकीचे कोवळे अंकुर उगवतो, त्याची पेरणीही बघा अन त्याचं उगवणंही बघा ! गाईचं हंबरणं ऐकून इथल्या भिंतीही कान टवकारतात, टाळ मृदंगाचे नाद ऐकून वृक्षवल्ली इथल्या डुलतात. इथे नांदतो पांडुरंग, इथे गातो तुकयाचा अभंग, इथे घुमते ज्ञानियाची विराणी, इथे मुक्ताईचे आख्यान अन निवृत्तीची विरक्ती, इथे जनीचा सेवाभाव, इथे नाम्याची आपुलकी, इथे सावत्याचे मळे, इथे गोरयाची मडकी, इथे एकनाथी भागवताचे गारुड, इथे सेनाचे कर्तन, इथे चोख्याचे कीर्तन. इथला एकएक जीव जणू मायबापाच्या चरणी लीन पुंडलिक.

या इथल्या मातीत तुम्हाला दिसेल तुमचे खरे प्रतिबिंब जे कुठल्याच आईन्यात दिसणार नाही अन पोथ्यापुराणातूनही उलगडणार नाही ! तेंव्हा इथे या अन स्वतःला ओळखून घ्या, थोडा विसावा घ्या अन पुढे मार्गस्थ व्हा....

- समीर गायकवाड