
काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...