![]() |
यंदाच्या जूनमध्ये जागतिक स्थलांतरितांच्या विश्वात दोन महत्वाच्या घटना घडल्या. बेकायदेशीर मार्गाने युरोपात घुसखोरी करण्याच्या एका प्रयत्नांत स्थलांतरितांची एक बोट भूमध्य समुद्रात उलटली. त्यात जवळपास ५० लोकांना जलसमाधी मिळाली. त्यातील ४७ मृतदेह ट्युनेशीयाच्या किनाऱ्यावर आढळून आले आहेत. ६८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेतील सर्व मृत अस्थिर असलेल्या आखाती देशातील होते. बोटीत नेमके किती लोक होते याची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. या नंतरची दुसरी घटना जीवितहानीची नव्हती पण त्याने जगाचे लक्ष वेधले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आपल्या आईची झडती घेताना भेदरलेल्या अवस्थेतील रडणाऱ्या बालिकेच्या फोटोला जगभरातील माध्यमांनी प्रसिद्धी दिली. टर्कीच्या सीमेवर वाहत आलेल्या चिमुकल्या सिरीयन मुलाच्या मृतदेहाच्या फोटोने जगात जशी खळबळ उडवून दिली होती तशीच खळबळ याही घटनेने उडाली. या दोन घटनांमुळे जगभरातील स्थालांतरितांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले. विशेष म्हणजे मागचं वर्ष याच मुद्द्यावर एक निराशाजनक नोंद करून गेलं. गतवर्षीची जगभरातील निर्वासितांची संख्या तब्बल सोळा दशलक्षाहून अधिक झाली. ही आकडेवारी जाहीर व्हायला आणि या दोन घटना एकाच वेळी समोर आल्याने यावर सुंदोपसुंदी सुरु झालीय.