
राजकीय भाषणांनी देश ढवळून निघाला. काही ठिकाणी सामाजिक सलोख्याचे पापुद्रे खरवडून निघाले तर काही वक्तव्यांद्वारे विषमतेचे विखार पसरले! वेगवेगळ्या अस्मितांचे दंभ कुरवाळले गेले, भिन्न पद्धतीने विभाजन करण्याकडे नि त्यायोगे आपली मतपेढी घट्ट करण्याचे घाट घातले गेले! जातीधर्म भेदाच्या भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला गेला. आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली गेली. एकमेकांचा आब न राखता अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीकाटिप्पणी केली गेली. धनसंपत्तीची लयलूट केली गेली, मते मिळावीत म्हणून सामान्य भोळ्या मतदारांना असंख्य आमिषे दाखवली गेली. आपणच जनतेचे मसिहा आहोत हे सिद्ध करण्याकरता समोरच्याचे वस्त्रहरण करण्याच्या नादात अनेकदा आपलेच कपडे फाडून टाकण्याचे प्रकारही घडले. वय, ज्येष्ठता, योग्यता, व्यासंग, बुध्दिमत्ता, पात्रता आणि कुवत यांचा विचार न करता कुणीही कुणावर तुटून पडत होते. सोशल मीडियाच्या बोलभांड चावडीवर तर अक्षरशः सुंदोपसुंदी माजली होती. राजकीय प्रवक्ते भान सुटल्यासारखे वागत होते नि शीर्ष पातळीवरच्या नेत्यापासून ते गल्लीतल्या छोट्या पुढाऱ्यापर्यंत पुष्कळांची जिभ अनेकदा घसरली! सारा माहौल एकदम कलुषित नि कोलाहलग्रस्त होऊन गेला होता. चराचरात उन्हांची जिवघेणी भाजणी आणि भौतिक जगात निवडणुकीची असह्य कराल घुसळण यामुळे अनेकांना हा काळ अगदीच अंगावर येणारा असा वाटला तर त्यात नवल ते काय! मात्र हे चित्र ही चिरंतन नसते त्यात बदल हे होत असतातच! हरेक रात्र कधी न कधी सरते आणि नव्याने सूर्य उगवतो, नव्या उमेदीने नवा दिवस उगवतो, आशेची पालवी पल्लवित करणारा नवा प्रकाश हरेकाच्या अंगणात येतो तेव्हा गेलेल्या दिवसाचे मळभ नकळत गळून पडते तद्वतच हे दिवसही मागे पडतील अशीच साऱ्यांना आशा आहे!
ही आशा म्हणजे केवळ दिवास्वप्ने नव्हेत, निसर्गाचे परिवर्तन चक्र अव्याहतपणे सुरु असते. ऋतुचक्र हा त्याचाच भाग होय. उन्हे सरलीत, आता पाऊस जोर धरेल नि पावसाचे दिवस संपताच थंडी अवतरेल! थंडीला कवेत घेण्यासाठी उन्हे पुन्हा अवतरतील, हे चक्र सतत घडत राहील. तसेच भौतिक जगाचेही आहे, कधी एका विचासरणीची सरशी होते तर विरोधात असणाऱ्या विचारधारेलाही कधी न कधी सत्तेचे दिवस येतात! सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणताही पक्ष, कोणताही विचार वा कोणती व्यक्ती जन्माला आलेली नसते याचे भान काळाला असते मात्र मानवी समुदायास याचे भान असेलच असे नाही त्यामुळे अहंकार, गर्व, उन्मत्तता नि अनिर्बंध अधिकाराचे डोहाळे लागतात जे पुढे जाऊन ध्वस्त होतातच! हे देखील एक चक्र आहे जे आपल्या नकळत वर्षानुवर्षे, शतकानुशतके जारी आहे. आताचा काळही याला अपवाद राहू शकत नाही. सर्वत्र असलेली अस्वस्थता नक्कीच लयास जाईल नि सुखाचे, शांततेचे, सामंजस्याचे, प्रेमाचे, सौहार्दतेचे दिवस येतील. समता, बंधुता, स्वातंत्र्याचे ध्वज दिमाखात फडकत राहतील. असेच आनंददायी बदल चराचरातही घडतील. मात्र यात एक मेख आहे, निसर्ग स्वतःच हे बदल घडवून आणतो, माणसाला मात्र आपले अधिभौतिक जगातल्या परिवर्तनासाठी काही अंशी का होईना पण झटावे लागणार आहे!
जसे माणसाचे गाऱ्हाणे होते तसेच ऊनपावसाचेही होते. उन्हे सरत नव्हती नि पावसाचे आगमन लांबत होते. मात्र मागच्या दोनेक दिवसात चित्र बदललेय. होय नाही म्हणत म्हणत काल अखेर ढगांमधले भांडण संपले. बऱ्याच काळापासून असलेला अबोला मिटला, अन त्यांचे काल मनोमिलन झाले. त्यांच्या मिलनासाठी आसुसलेल्या वीजांनी नेत्रदीपक रोषणाई केली. बघता बघता त्यांच्या मिलनाला धुमारे फुटले, पावसाचा जन्म झाला. पावसाचे थेंब अगदी नाचत नाचत ढगामधुन बाहेर पडले. नाचऱ्या थेंबाना वाऱ्याने आपल्या झोक्यावर मनमोकळे झुलवले. हवेतल्या धुलीकणांनी त्या थेंबाना मायेने ‘गंध-पावडर’ लावली. धरतीवर कासावीस झालेल्या सगळ्या भूमिपुत्रांनी आपल्या डोळ्यातल्या पाण्यात हे थेंब अलगद झेलले. त्यांच्या डोळ्यातले पाणी अधिकच खारे झाले. काल सर्वत्र पाऊस येऊन गेला. गावाकडे त्याचे स्वागत माहेरवाशिनीसारखे डोळ्यात पाणी आणून झालेय. तुलनेने शहरातला पाऊस अगदीच अरसिक. त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते. गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. राजकीय धगदेखील याचपद्धतीने विझावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे. नव्याने मशागत केलेल्या मातृभूमीत काही कसदार जोमदार लोकशाहीचे पीक तरारून यावे हीच मनीषा आहे. अशोक कोळी यांच्या धूळपेरणी या कवितेच्या पंक्ती खूप बोलक्या आहेत –
असो, बरकत धूळपेरणीला
लागला मातीचा जीव झुरणीला!
देशाच्या पटलावरचे चित्र बदलण्यासाठी नव्या सर्वसमावेशक राजकीय इच्छाशक्तीची, विचारधारेची, सुख शांततेची पेरणी व्हावी नि लोकशाहीचे पीक जोमात यावे यासाठी जनसमूहाचाच नव्हे तर मातीचाही जीव झुरणीला लागलाय! म्हणून एकच मागणे निर्मिकाला, अंतरीचे द्वेष गाडू देत धरणीला, येऊ दे बरकत पेरणीला!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा