मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

आनंदाची एक्सप्रेस..

क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर  

घटना काही दिवसांपूर्वीची आहे मात्र सोशल मीडियावर त्याविषयी लिहिण्यासाठीची औपचारिक अनुमती उशिराने मिळाली, सबब आज लिहितोय. विख्यात वाहिनीच्या निर्मितीप्रक्रियेत सामील असणाऱ्या सुजाण सहृदयी मित्राच्या पत्नीस कर्करोगाचे निदान झाले. कुटुंब काहीसे विस्कळीत झाले. नोकरी सोडून पत्नीला वेळ देणे क्रमप्राप्त ठरले. यात काही वर्षे गेली. डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि उभयतांच्या जिद्दीला यश आले. त्यांची पत्नी यातून बरी झाली. आपण आजवर खूप कामावले आहे आता समाजासाठी काहीतरी केले पाहिजे नि आपल्याला लाभलेले उर्वरित आयुष्य समाजकारणी लावले पाहिजे असा निर्धार त्यांनी मनोमन केला. यातून काही समाजोपयोगी उपक्रमही राबवले. तरीही ते सॅटीसफाइड नव्हते. मग त्यांनी एक नवा मार्ग निवडला.

ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.