शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

वक्त ने किया क्या हसीं सितम..

गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.

कैफी आजमी धार्मिक कर्मठतेला त्याजून साम्यवादाच्या आकर्षणातुन मुंबईला संघटनेच्या कामासाठीच आले होते. ते रीतसर साम्यवादी संघटनेचे सभासद झाले तेव्हा त्यांचे वय होते सतरा वर्षांचे! वयाच्या पंचविशीत असताना 1943 ला मुंबईत आल्यावर त्यांनी 'मजदूर मोहल्ला' या उर्दू जर्नलचे संपादन केले. या सर्व सफरीत त्यांचा हमसफर त्यांच्यापासून दूर झाला, जिच्याशी त्यांची किशोरवयात सख्य होते. कदाचित त्यांचे विचार बदलले नसते नि त्यांनी स्थलांतरही केले नसते तर त्यांच्या जीवनाचा जोडीदार वेगळाच राहिला असता! मात्र हे होणे नव्हते. याच कैफात त्यांनी हे गीत लिहिलं नि गुरु दत्तला ते अफाट आवडलं. पुढे जाऊन हिंदी चित्रपटसंगीतातला तो एक मास्टरपीस झाला!

काळाने आपल्यावर अन्यायच केला नि आपण आपली ओळख विसरून गेलो, आपल्या वाटा बदलल्या. आपण दोघेही हरवलो नि विरहात गुरफटत गेलो अशा अर्थाची ती रचना. सिनेमात अगदी परफेक्ट सिच्युएशनला हे गाणं येतं नि स्मरणात राहतं. हे गाणं गीता दत्तने गायलं. सिनेमा रिलीज होण्याआधी जेमतेम काही महिन्यापूर्वीच हे गीताचा गुरु दत्तशी विवाह झाला होता. मात्र काही वर्षांतच साठचे दशक संपायच्या काळात त्यांच्यात दरार पडली. त्यांचं नातं पुन्हा पूर्वीसारखं राहिलं नाही. 

गीताच्या मनात सतत संशय असायचा की गुरूदत्तचे वहिदाशी अफेअर आहे! त्यांच्यात तशी जवळीकही काही अंशी होती. मात्र त्यांच्यातलं नातं वेगळं होतं कारण त्या काळापर्यंत गुरूदत्त वर्कोहोलिक होता. मात्र त्यानंतर गुरुने स्वतःला नशेत डुबवल. ऑक्टोबर १९६४ मध्ये गुरूदत्तचे निधन झाले. त्याच्यानंतर आठ वर्षांनी गीता मरण पावली. तिला लिव्हर सिऱ्होसिस झालेलं! 

या दांपत्यास तरुण आणि अरुण ही दोन मुले अन नीना ही मुलगी होती. त्यातील तरुण दत्त यांनी देखील नंतरच्या काळात आत्महत्त्या केली अन काही वर्षांपूर्वी अरुण दत्त यांचे कर्करोगाने पुण्यात निधन झाले. ज्या प्रमाणे तरूण दत्तने आत्महत्या केली होती त्याच प्रमाणे अरुणनेही आत्महत्त्या केल्याचे कल्पना लाजमी सांगतात पण ऑन द रेकॉर्ड ती आत्महत्या सिद्ध होऊ शकली नाही. कॉमेडीयन मेहमूदचा भाचा नौशाद मेमन हा गीतादत्तच्या मुलीचा म्हणजे नीना दत्तचा पती होय, नीना मेमन आणि नौशाद मेमन या दांपत्याची कन्या नफिसा मेमन हिने काही दिवसापूर्वी म्युझिक अल्बम रिलीज केला होता पण तिला यश मिळू शकले नाही. नीनाने सुद्धा दोन अल्बम काढले होते पण देखील अपयशी ठरले होते. ह्या सर्व संगीताच्या नादात हेही कुटुंब विस्मृतीत अन दैन्यावस्थेत गेले. अशा प्रकारे पूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याने कधी कधी गुरु दत्त वा गीता दत्तचे नाव देखील कधी गप्पात निघाले की उगाच उदास वाटत राहते.

या सर्वावर ताण करणारी गोष्ट म्हणजे 'कागज के फूल'मधले हे गाणं! जे गीता दत्तने गायले होते नि गुरू दत्तवर ते चित्रित झाले होते. एका अत्यंत विलक्षण दुःखद क्लेशदायक पद्धतीने खरे ठरले. या गाण्यातला शब्द न शब्द खरा झाला! तो देखील अतिव वेदनादायक तऱ्हेने! या दोघांच्या निधनानंतर तीन दशकांनी कैफी आजमींचा इंतकाल झाला. त्यांना हे सारे संदर्भ कसे वाटले असतील याचे उत्तर कुणीच देऊ शकत नाही. 

कैफींनी खूप भावोत्कट गाणी लिहिलीत. त्यांचंच 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है छिपा रहे हो... ' हे गीत अत्यंत लोकप्रिय झालं. त्यांची लेक शबाना आणि राज किरण अभिनित 'अर्थ'मध्ये ही गझल होती. वास्तवात त्यांची पत्नी शौकत हिला रेल्वे प्रवासात देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना वाटलं की पत्नीला आपली अडचण ठाऊक नसावी. मात्र शौकत सारं जाणून होती. हसण्याआड तिने दुःख लपवलं हे कळल्यावर कैफींना वाईट वाटले. त्यांनी एकटाकी ही गझल लिहिली नि मन रितं केलं! 

युपीच्या आझमगढसारख्या कर्मठ धर्मवेड्या भागातून बाहेर पडून व्हाया लखनौ मुंबईला आलेले कैफी उदारमतवादी नि आधुनिक विचारांचे होते. त्यांची गाणी याची साक्ष देतात. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा जन्मदिवस येऊन गेला. तेव्हा कैफींसोबतच गुरुदत्त नि गीतादत्तही आठवले.

कधी कधी असा प्रश्न पडतो की वहिदा रेहमान जर हे गाणं ऐकत असतील तर अजूनही स्मृतींचे दंश होत असतील का? काही स्मृती अतिशय खोलवर घाव करतात; वहिदासाठी त्यातलीच ही एक दुखरी स्मृती असेल, तिचा घाव किती खोल असेल हे त्यांनाच ठाऊक असेल!

नियती आणि काळ यांची कधी कुणी थट्टा करू नये, त्यांचा कहर कधी नि कसा कुणावर बरसेल सांगता येत नाही. कारण नियतीचे सितम सोसण्याचं बळ भल्या भल्यांमध्ये नसतं!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा