यंदाचा उन्हाळा अत्यंत प्रखर उन्हांचा होता. उकाड्याने जिवाची घालमेल होत होती, दिवसा घराबाहेर फिरणे असह्य झाले होते. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र उन्हाचा तडाखा होता. नद्यांचे प्रवाह कोरडे पडले, कित्येक धरणं रिकामी होण्याच्या स्थितीत आली, तप्त कोरड्या हवेची दुपार असे नि धग टिकून असणारी संध्याकाळ अंधार उरात घेऊन येई. किमान सकाळच्या वेळेस तरी थोडी शीतलता असावी असं राहून राहून वाटायचं मात्र ते सुखही नशिबी नव्हतं. केवळ मध्यरात्रीचे काही तास वगळता दिवसभर उष्म्याची काहिली होती. निव्वळ मनुष्यप्राण्यास याची झळ बसली असेही काही नव्हते. अख्खे चराचरच जणू होरपळून निघाले होते. धुळीत माखलेली झाडे माना तुकवून निश्चलपणे उन्हे सोसत मुकाट उभी असत, ना कुठली पानांची सळसळ नि ना कुठली वाऱ्याची आल्हाददायक झळक! गावाकडच्या गाडीवाटा, पाऊलवाटा असोत की शहरातल्या डांबरी सडका असोत दुपारच्या प्रहरात सारे सुनसान पडलेले असे. भर दुपारी रणरणत्या उन्हात गावे ओस पडलेली असत, केवळ वयस्क माणसं नि पोरंबाळंच गावात असत. कामाची वा वर्दळीची ठिकाणंही ओस पडलेली असत. आकाशात पक्षी दिसत नसत, कष्टकरी जिवांना कामावर जाण्याशिवाय पर्याय नसे तसं या पक्षांचं नव्हतं परिणामी दुपारी आकाश रिते वाटे! निळे निरभ्र आकाश आणि पूर्ण ताकदीने आग ओकणारा सूर्य हे समीकरण गेले तीन महिने देशभरात जारी होते. या उन्हाळ्यातली धग काहीशी वेगळीच होती, माणसं म्हणत की यंदाचा उन्हाळा काही वेगळाच आहे, थोडं जरी उन्हांत गेलं तरी पोळून निघतंय! असं असलं तरी एव्हढीच धग आपल्या देशात नव्हती, आणखी एक हिट आपल्याकडे कार्यरत होती! ती म्हणजे निवडणुकांच्या धामधूमीची धग! गेले अडीच महिने आपल्या देशात निवणुकांचा धुरळा उडाला होता. सभा, बैठका, पत्रकार परिषदा, वाद प्रतिवाद, आश्वासने नि त्यांची पोलखोल, वृत्तवाहिन्यांवरची भांडणे नि जिकडे तिकडे सुरु असलेल्या राजकारणाच्या गप्पा यामुळे साऱ्या वातावरणात निवडणुकीचा ज्वर व्यापून होता. बाहेर निसर्गाच्या तप्त झळा आणि अंतर्बाह्य शेकून काढणारा निवडणुकीचा मोसम असा एक वेगळाच सिलसिला साऱ्या देशाने या निमित्ताने अनुभवला!