शनिवार, २२ जानेवारी, २०२२

डेथ ऑफ गॉडमदर


जगभरात रोज इतक्या घटना घडत असतात की त्यांचा आवाका कळून येत नाही. खेरीज आपल्यापर्यंत बातम्या घटना पोहोचवणारी माध्यमे आपल्या सोयीच्या आणि समविचारी धारणेच्या अनुषंगाने काम करतात त्यामुळे गाळणी लागते. परिणामस्वरूप आपण ज्या माध्यमांवर अवलंबून असतो ती माध्यमे आपल्याला ज्या घटना दाखवतात वा ज्या बातम्या सांगतात तेव्हढाच आपला स्त्रोत मर्यादित होतो. त्या परिघा पलीकडच्या बातम्यांना, घटनांना आपण मुकतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेशी आपला तसा थेट संबंध नसतोच मात्र कुठे तरी त्यांचा संदर्भ रोजच्या जगण्याशी कधीतरी निगडीत असतो. रोजच्या घटनांच्या गदारोळात तळाशी जाऊन एखादी घटना निवडून आपल्या जीवनाशी असणारा तिचा संदर्भ खऱ्या अर्थाने उमगतो तेंव्हा आपण थक्क होतो. अशी अज्ञात असणारी घटना आपल्याला कळली नाही तरी फारसे बिघडत नसते मात्र आपल्या जाणीवा समृद्ध होण्यात यांची जी मदत असते त्यापासून आपण वंचित राहतो हे नक्की ! अशीच एक घटना गत महिन्यात घडून गेली जी भारतीय प्रसारमाध्यमात औषधाला देखील आढळली नाही. माफिया जगताची पहिली लेडी बॉस असंता मारेस्का हिचे निधन झाले. तिच्या निधनाची दखल युरोपियन देशातील माध्यमांनी घेणं साहजिक होतं. मात्र मेक्सिकोसह अन्य काही लॅटिन अमेरिकन देशांतही त्याची दखल घेतली. याखेरीज इंडोनेशिया, सोमालिया या देशांनीही दखल घेतली कारण ड्रगतस्करीशी असलेलं या देशांचं नातं. भारतीय माध्यमांत कोणत्या बातम्यांना स्पेस द्यायची याची गणिते ठरलेली आहेत त्यात ही बातमी बसत नसावी सबब आपल्याकडे ती सर्वदूर पोहोचली नाही. असंता मारेस्काचं आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं होतं. तिच्या राईज अँड फॉलची कहानी अगदी फिल्मी आहे.

असंताने वयाच्या अठराव्या वर्षी नेपल्‍समध्‍ये आपल्या नवर्‍याच्‍या मारेकर्‍याला ठार मारलं आणि माफिया जगात तिच्या नावाचा एकच कल्ला झाला. इथून तिच्या गुन्हेगारी जीवनाचा प्रवास सुरु झाला तो तिला थेट इटलीच्‍या शक्तिशाली कॅमोरा माफिया कुळातील पहिल्या महिला बॉसच्या उपाधीवर घेऊन गेला. तिला पुपेटा या नावानेही ओळखले जायचे. गुन्हेगारी जगासाठी ती 'लिटल डॉल' या नावाने परिचित होती कारण तिचं अल्पवयीन असणं ! अंगापिंडाने अगदी आखीव रेखीव असणाऱ्या असंताचा क्राईम ग्लॅमरच्या दुनियेत सहज प्रवेश झाला. विन्सेन्झो मारेस्का हे तिचे वडील होते. त्यांची ख्याती नामचीन काळा बाजार करणारा गुंड अशीच होती. ड्रग्जच्या सिगार्ससह, चाकू, लाईटब्लेड्स यांची तस्करी ते करत. अशी पार्श्वभूमी असूनही असंताचे सर्व लक्ष सुंदर दिसण्याकडे आणि सजण्या सवरण्याकडे असे. एप्रिल १९५५ मध्ये पास्क्वेल सिमोनेट्टी ह्या डॉनसोबत तिचं लग्न झालं. त्यांच्या लग्नात हजर असलेला अँटोनियो एस्पोसिटो हा तिच्या नवऱ्याचा क्राईम पार्टनर होता. तो पास्क्वेलसोबत क्राईम डील करत असला तरी त्याचे इरादे नेक नव्हते. त्याला गॅंगवर ताबा हवा होता, धंद्यातली पाती नको होती. त्यामुळे असंता आणि पास्क्वेल यांच्या लग्नाला जेमतेम तीन महिने उलटल्यानंतर त्याने पास्क्वेलला संपवण्याचा निर्णय घेतला. कार्लो गाएटानो ऑर्लॅंडो हा एके काळी त्यांच्याच टोळीचा फुटकळ सदस्य होता, अँटोनियोने त्याला या नवदांपत्यास खलास करण्याची सुपारी दिली. नेपल्सच्या पिझ्झा मार्केटचा स्पॉट फिक्स झाला, गेम झाली परंतू अर्धवट झाली. गोळीबारात असंता वाचली मात्र पास्क्वेल जागीच मृत्यूमुखी पडला. क्राईम हाउंडचं रक्त अंगी असणाऱ्या असंताने याचा बदला घ्यायचं ठरवलं, तिने तत्काळ प्लॅन आखून त्यावर अंमल देखील केला. नोव्हेंबर 1955. पन्नासच्या दशकाच्या त्या पर्वात युरोपला टोळ्यांच्या गुन्हेगारीने ग्रासले होते. अगदी अस्वस्थ दशक होते ते. अँटोनियो एस्पोसिटो हा स्मिथ आणि वेसन ह्या दोन हस्तकांसोबत एका क्राईमप्लॉटसाठी रवाना झाला होता. अगदी मजेत चालले होते ते, कारण अँटोनियो आता स्वतःला बॉस समजत होता. मात्र वास्तव वेगळं होतं, असंताच्या रूपाने मृत्यू त्यांचा पाठलाग करत होता. तिने नेमका स्पॉट हेरून त्या तिघांची निर्मम हत्या केली. या वेळी तिचं वय होतं अठरा वर्षे. त्यावेळी ती सहा महिन्यांची गरोदर होती हे विशेष ! या हत्याकांडाचा इतका मोठा बभ्रा झाला की ती थेट माफिया बॉस झाली.

1954 साली असंताने नेपल्समधील सौंदर्यस्पर्धा जिंकून स्वतःचा जलवा दाखवला होता. ती कमालीची आकर्षक आणि मादक होती. कदाचित यामुळेच पास्क्वेलच्या नजरेत भरली असावी. तिने केलेल्या हत्याकांडाची दहशत अशी होती की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुणीच पुढे आले नाहीत, सगळीकडून भ्रामक माहिती समोर येत राहिली. या केसच्या तपासकर्त्यांचा असा विश्वास होता की घटनास्थळावर एकापेक्षा जास्त शूटर असावेत ! एका व्यक्तीला इतक्या सफाईदारपणे हत्या करता येणार नाही असा त्यांचा कयास होता. पकडलं गेल्यावर असंताने गुन्हा कबूल केला तेंव्हा न्यायालयासह पोलीस देखील हादरले होते. आपल्या नवऱ्याला ज्यांनी कुत्र्याच्या मौतीने मारले त्यांना त्याहून वाईट मरण द्यायचे हा निर्धारच असंताने केला होता, शिवाय टोळीवर तिचेच राज्य हवे होते. आपली पत राखण्यासाठी नि वर्चस्वासाठी इतकं केलंच पाहिजे या भावनेने तिच्यावर राज्य केलेलं. 1959 मध्ये तिच्या हत्येचा खटला सुरू असताना तिने निर्विकारपणे न्यायालयाला सांगितले की, “मी पुन्हा पुन्हा हा गुन्हा करेन!” इतकी ती वज्रनिश्चयी होती !
 
हत्याकांडाच्या वेळी गरोदर असणाऱ्या असंताची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर तिथेच तिने मुलाला जन्म दिला. इटलीच्या कायद्यानुसार तिच्या मुलाला तुरुंगात न ठेवता तिच्या वडिलांकडे ठेवलं गेलं. 1959मध्ये तिला वीस वर्षांची सक्तमजुरीची सजा सुनवली गेली. मात्र नंतर तिची शिक्षा सहा वर्षांनी कमी करण्यात आली. असंताने सुटका झाल्यानंतर आपला मुलगा पास्क्वालिनो याची भेट घेतली. तब्बल चौदा वर्षांनंतर मायलेक भेटत होते. ती तुरुंगात होती तेंव्हा देखील तिच्या नावाने टोळीचे काम सुरूच होते, बाहेर पडताच तिने ते अधिक जोमाने सुरु केले. तिच्या नावाची पुन्हा चर्चा होऊ लागली. तिच्याच जिन्दगानीवर बनवण्यात आलेल्या सिनेमात तिने काम केले. त्यानंतर स्वतःमध्ये बदल झाला आहे हे जगाला दाखवण्यासाठी तिने नेपल्समध्ये कपड्यांची दोन अद्ययावत दुकाने उघडली. पण तिचे खासगी आयुष्य मात्र अशांतच राहिले. अंमली पदार्थ तस्कर आणि शस्त्रास्त्र विक्रेता उम्बर्टो अम्मातुरो याच्याशी परिचय झाल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. त्याच्यापासून तिला जुळी मुले झाली. पण उम्बर्टो तेव्हढ्यावर समाधानी नव्हता तो पास्क्वालिनोचा मत्सर करायचा. कॅमोरामध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी तो तडफडत होता.

पास्क्वेलिनो विशीच्या उंबरठ्यावर असताना, जानेवारी 1974 मध्ये नेपल्समधल्या मेन फ्लायओव्हरच्या बांधकामाच्या साईटवर उम्बर्टोने त्याला भेटायला बोलवले. या नंतर तो कुणाच्याही नजरेस पडला नाही. तो गायब झाला. आपला प्रियकर उम्बर्टो यानेच आपला तरुण मुलगा पास्क्वेलिनो याची हत्या करून मृतदेह फ्लायओव्हर खालील सिमेंटब्लॉक्समध्ये पुरल्याचा संशय असंताला होता. 1995 मध्ये एका मुलाखतीत तिने 'द गार्डियन'ला सांगितले की, या घटनेनंतर तिला वाटायचे की आपण उम्बर्टोचा खून केला पाहिजे मात्र तिच्यातली आई याला राजी नव्हती. एका लेडी गॅंगस्टरला तिच्यातल्या आईने मात दिली होती. आपला पहिला मुलगा जसा मारला गेला तशी आपली जुळी मुले मारली जातील या भीतीपोटी ती गप्प राहिली. उम्बर्टोच्या गुन्हेगारी कारवायात त्याला साथ देत राहिली. मात्र तिचे अंतर्मन तिला नेहमी सलत राहिले. 1981 च्या सुमारास कॅमोराच्या माफिया जगतावर कुणाचा ताबा असावा यावरून टोळीयुद्ध सुरु झाले. राफेल कटोलो या उलट्या काळजाच्या निर्दयी गुन्हेगाराने कॅमोरा ऑर्गनिझाटाच्या नावाखाली नव्या लोकांची भरती सुरु केली. सिरो गॅली हा त्याच्या टोळीचा मुख्य हस्तक होता. याच वर्षी त्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. असंताच्या आदेशावरून ही हत्या झाल्याचा गवगवा झाला. यामुळे असंता - उम्बर्टो यांच्या टोळीत फूट पडली. संतापलेल्या असंताने थेट पत्रकार परिषद घेऊन राफेल कटोलोवर गंभीर आरोप केले. त्याला खुले आव्हान दिले. याच घटनेची एक शृंखला म्हणून न्यायवैद्यक शास्त्रज्ञ आणि सुप्रसिद्ध निओ-फॅसिस्ट अल्डो सेमेरारी यांची हत्या केली गेली. एका चोरीच्या गाडीत शिरच्छेद केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. बोलोग्ना येथे 1980 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 80 लोक मारले गेले होते त्यात हा शास्त्रज्ञ सहभागी असल्याचे मानले जात होते. या हत्येप्रकरणी उम्बर्टोसोबत असंतालाही अटक करण्यात आली. या खटल्यातुन निर्दोष साबित होईपर्यंत असंता मारेस्काने तब्बल चार वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. या नंतरही उम्बर्टोचा कंड जिरला नव्हता. कोकेन बॅरन बनण्यासाठी तो पेरूला पळून गेला. मात्र इटली सरकारने अल्डो सेमेरारीच्या हत्येप्रकरणी त्याचे प्रत्यार्पण करून घेतले. हत्येची कबुली दिल्यानंतर माफिया जगताचा 'कोड ऑफ सायलेन्स' ब्रेक करण्यासाठी त्याला माफीचा साक्षीदार बनवले गेले आणि परिणामी अवघ्या काही महिन्यात इटलीचे समग्र माफिया जगत मोडीत निघाले.

काळ पुढे जात राहिला. असंता विजनवासात निघून गेली. प्रसारमाध्यमेही तिच्यापासून दूर झाली. २९ डिसेम्बर २०२१ रोजी इटलीमधील प्रसिद्ध ऐतिहासिक शहर पोम्पेईजवळ आपल्या राहत्या घरी आजारपणामुळे तिचे निधन झाले. ती मरण पावली तेंव्हा तिला कोणतेही ग्लॅमर नव्हते नि तिची कसली दहशतही नव्हती. बालपणी चार भावांच्या कुटुंबातील ती एकुलती एक मुलगी होती. असंताने लहानपणीच आपले हिंसक गुण दाखवले होते, आपल्या वर्गमित्रावर हल्ला केला होता ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. एके काळी सौंदर्यस्पर्धा जिंकून टॉपची मॉडेल व्हायचं स्वप्न पाहणारी असंता गुन्हेगारी विश्वात अशी काही पिसली गेली की तिचं निम्मं आयुष्य त्यात वाया गेलं. तिच्या तरुण मुलाची हत्या झाली. प्रियकर परागंदा झाला. वृद्धत्व एकांतात गेलं. क्रूरकर्मा राफेल कटोलो याची बहीण रोझेटा ही देखील माफिया क्वीन होती, तिच्या चार मुलांना खुनाची चिथावणी देणाऱ्या ऍना मेज हिला तर 'ब्लॅक विडो' या टोपणनावाने ओळखलं जायचं. या सगळ्यांचा शेवट वाईटच झाला. माणूस जोवर धडधाकट असतो तोवर त्याची दहशत असते, एकदा का त्याची गात्रे शिथिल झाली की मग मात्र विजनवासच त्याच्या सोबतीला असतो. थेट मृत्यूनंतरच त्याच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळतो हे कटूसत्य आहे. हे तत्व जगभरातील अपराधी दुनियेस लागू पडते. मात्र जिथे धग अधिक असते तिथे अशा मृत्यूंची दखल अधिक घेतली जाते बाकी दुनियेत साधा नामोल्लेख देखील होत नाही. जन्माला येणं आपल्या हाती नाही मात्र समज आल्यानंतर या जन्माचं सार्थक करायचं की माती करायची हे सर्वस्वी आपल्या हाती असतं.

- समीर गायकवाड


पूर्वप्रसिद्धी दैनिक पुण्यनगरी दि. १८ जानेवारी २०२२. 

डेथ ऑफ गॉडमदर   #sameergaikwad #sameerbapu
असंताला पहिल्यांदा अटक करण्यात आली तेंव्हाचे छायाचित्र - सौजन्य द ब्लेक  
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा