
राज्यात, देशभरात रोज इतक्या घटना घडताहेत की आपण नेमकं कशावर व्यक्त व्हावं नि कोणकोणत्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा हेच अनेकांना सुचेनासे झालेय. सारा भवताल जितका गोंधळलेला झालाय तितकाच विषाक्त आणि कोलाहलग्रस्त झालाय. अशा पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या घटना घडूनही त्यावर नेमकं लक्ष जात नाही अथवा समाजाचं ध्यान खेचण्यात त्या अयशस्वी ठरताहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडलीय. भविष्यात उत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ् व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलीय. तसं तर आपला समाज आत्महत्या आणि बलात्कार या शब्दांना इतका सरावलाय की आपल्याला त्याचं काहीच वाटेनासं झालंय. घडलेली आत्महत्या वा बलात्कार जर अत्यंत क्रूर, नृशंस, भयंकर अमानवी पार्श्वभूमीवरचा असेल तरच त्याला कव्हरेज मिळतं आणि समाजमाध्यमांसह मीडियाचंही त्याकडे लक्ष वेधलं जातं. बाकीच्या घटनांना वर्तमानपत्राच्या आतील पानांवर दोन बाय सहाचा छोटा कॉलम बहाल होतो ही आपली संवेदनशीलता! डॉ. प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली त्याला आता आठवडा लोटलाय. तरीही या घटनेने अजूनह अस्वस्थ होतंय याचे संदर्भ या आत्महत्येच्या कारणांत, आत्महत्येच्या मानसिकतेत नि स्युसाईड नोटमध्ये दडलीत. पतीच्या संशयी वृत्तीमुळे व त्यातून होणाऱ्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने आत्महत्या केली. तिने केवळ आत्महत्या केली इतकीच ही बाब मर्यादित नसून स्युसाईड नोटमधले तिचे विचार सामाजिक आत्मचिंतनाची गरज असल्याचे सूचित करतात. त्यातला सूर असा की प्रतीक्षाने स्वतःला विसरून पतीवर जिवापाड प्रेम केलं. त्या बदल्यात पतीने हसत्या, खेळत्या प्रतीक्षाला त्रास देऊन मंद करुन टाकलं! एका स्वावंलबी, महत्वाकांक्षी मुलीला परावलंबी बनवलं. अनेक स्वप्नं उरी बाळगून तिने लग्न केलं होतं. पती खूप जीव लावेल, काळजी घेईल, सपोर्ट करेल असं तिला वाटलं होतं. त्यांच्या सुखी कुटुंबात छोटा पाहुणा येण्याची तयारीही तिने सुरू केली होती. मात्र त्याला संशयाने पछाडलं होतं. प्रतीक्षाला तिच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी बोलण्यास मनाई होती इतकेच नव्हे तर तिच्या जन्मदात्या आई वडिलांशीही तिने बोलू नये अशी बंधने लादली गेली. तिने मोबाइल बदलला, नंबर बदलला तरीही त्याचे समाधान झालं नाही. आपण पतीशी प्रामाणिक होतो नि आपल्या चारित्र्यात खोट नव्हती हे त्याला पटवून देण्यासाठी तिने अखेरीस आत्महत्या केली.