
विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !