
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच ! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय ! चहा म्हणजे भारतीय जनतेचा हळवा कोपराच जणू ! हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत.. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच ! त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते. शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओगराळयाने त्या पातेल्यात ओतत असतो.झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा - साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेतो अन फक्कन पातेल्यात टाकतो.बऱ्याचवेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जीलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.