रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

शिवबा आपल्याला खरेच कळलेत का?


शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते !

शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते.
मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे?
मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते.

ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.
शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात.

रविवार, १५ जानेवारी, २०२३

विहीर..

#sameerbapu
विहीर .. 

तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

हम भी अगर बच्चे होते!

सन ऑफ इंडिया 

हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला 
चाची 420 
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम  मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

गजब माणूस - इफ़्तिख़ार


हिंदी सिनेमाच्या कथा, पटकथांमध्ये अनेक तऱ्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोटयामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर - कमिशनर ही पात्रे बऱ्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भुमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तेकार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तेकार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

एका शापित राजहंसाची दास्तान..    


शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल.
त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन


इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.

बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे!


मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

तर आपली मान झुकलेली राहील..


आपण जर शरद पवार यांचे समर्थक असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या भाजपचा कट्टर विरोध करतात त्यांच्या नेत्यांशी वेळ येताच युती कशी काय करतात?

आपण जर आशिष शेलार, फडणवीस यांचे चाहते असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा प्रचंड तिरस्कार करतात त्यांच्याशी आघाडी कशी काय करतात?

आपण शिंदे, ठाकरे वा गांधी नि आणखी कुणाचे जरी समर्थक असलो तरी आपल्या पक्षाने ज्यांना विरोध केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याविषयी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत?
इथे मुद्दा एमसीएचा आहे त्यामुळे आपल्या चाणाक्ष नेत्यांचे उत्तर असते की आम्ही राजकारणातले विरोधक आहोत मात्र इथे खेळांत आम्ही मित्र आहोत!

मग एक सुजाण नि परिपक्व नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खेळात राजकारण्यांचे काय काम? त्यांना त्यांतले नेमके काय ज्ञान वा अनुभव याचा सवाल पडला पाहिजे!

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

अजूनही जिवंत आहेत रोमन साम्राज्यातील राजप्रवृत्ती!

काही माणसं अधुरी असतात, त्यांची पात्रता एक असते आणि भलतेच काम ते करत राहतात. त्यांच्या आवडत्या प्रांतात त्यांना स्पेस लाभत नाही, त्याहीपलीकडे जाऊन काहींच्या वाट्याला अधिकचे भोग येतात. त्यांच्या नावावर अशा काही विलक्षण नकोशा गॊष्टींची नोंद होते ज्यात त्यांचा महत्वाचा रोल नसतो! रोमन सम्राट टायबिरिअस हा अशांचा शिरोमणी ठरावा. पराक्रमी रोमन सम्राट ऑगस्ट्स आणि विकृत रोमन सम्राट कॅलिगुला या दोघांच्या मधला कार्यकाळ टायबिरिअसच्या वाट्याला आला.