सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र

या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.

*** *****

सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

भितीवर विजय - 'द कराटे किड'चे सार



'द कराटे किड' २०१० मध्ये रिलीज झाला होता. त्याने तिकीटबारीवर तुफान टांकसाळ खोलली. जॅकी चेन आणि जेडन स्मिथच्या मुख्य भूमिका त्यात होत्या.
एका शाळकरी मुलाचं भावविश्व त्यात अत्यंत भेदक पद्धतीने साकारलं होतं.

कोवळया ड्रे पार्करच्या विधवा आईची शेरीची कार कंपनीत बदली होते.
ती डेट्रॉईटवरून थेट चीनमध्ये दाखल होते.
खरे तर ड्रे पार्कर डेट्रॉईटमध्येच झळाळून उठला असता, पण तसे घडत नाही.
चीनमध्ये आल्यानंतर त्याला त्याच्या वेगळेपणाचं, बॉडी शेमिंगचं शिकार व्हावं लागतं.

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..


मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!
की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

जेंव्हा मृत्यू हवा असतो..

एक असतो मृत्यूदूत. त्याचं काम असतं जीवांना मृत्यू बहाल करण्याचं.


तो फिरतो जंगलांतून, माळांमधून. असो ससा की असो गरुड, कोल्हा वा कुणी वन्य जीव.
हरेकास त्याच्या नुसत्या स्पर्शाने यायचा मृत्यू.
एकदा त्याच्या मोहिमेवर असताना दिसतं त्याला एक कोवळं देखणं तरतरीत हरीण. तो जातॊ हरिणापाशी त्याला स्पर्श करण्यास.
कसा कुणास ठाऊक पण हरणास लागतो सुगावा मृत्यूदूताच्या हेतूचा, तो जवळ येण्याआधीच सावध होतं हरीण.
त्याच्याकडे नजर देत पाहतं, क्षणेक थबकून उभं राहतं नि धूम ठोकून पळून जातं.

त्याच्या डोळ्यातली जगण्याची आशा नि मृत्यूची भीती पाहून मृत्यूदूतास येते निराशा. तो पाहू लागतो स्वतःच्याच हातांकडे.
आपण इतके कसे वाईट आहोत मनी येतो विचार त्याच्या.
न राहवून तो हरणाच्या दिशेने उडत जातो माग काढत. हरीण गेलेलं असतं त्याच्या कळपात हुंदडायला.
दुरून त्याला पाहताना मृत्यूदूताचा हात लागतो झाडांच्या पानांना, पाने जातात करपून सुकून!
वाईट वाटते मृत्यूदूताला.
तो तिथेच राहतो रेंगाळून.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

तू कायम जिवंत असशील!

मुंबईत तुला भेटायला आलेलो तर
तू निघून गेलेली.
मध्ये एकदा तू भलतीकडेच भेटलीस
विलक्षण म्लान थकलेली,
तू नाव बदलले होतेस.
 
खरे सांगायचे म्हटलं तर
तू पुरती संपत आलेली..
माझा पडेल चेहरा पाहून
डोळ्यातलं पाणी लपवत म्हणालीस
इट्स ओके,
आणखी काही दिवस तरी असेन ना..
 
खूप दिवस झाले या भेटीला
पुन्हा तुझी चौकशी नाही केली मी
 
निदान माझ्या स्मृतीत तरी तू कायम जिवंत असशील!

- समीर गायकवाड.

❤🤎🖤

कवितेच्या नोंदी - 

काही शोध न संपलेलेच बरे असतात. शोध पुरे होतात आणि शोकाच्या डागण्या कायमस्वरूपी राहतात.
आपलं जीवश्च कंठश्च माणूस मरणपंथाला लागलेलं असतं. आपण असहाय असतो, त्याच्यासाठी काही करावं असं वाटत असतं मात्र तो जीव दुनियेच्या गर्दीत नाहीसा होतो. मग कुठे जरी चौकशी केली तरी ती वाईट बातमीच कळणार असते, अशा वेळी विचारपूस न केलेली बरी, निदान ते जीवाचं माणूस आपल्या विश्वात तरी सचेत असतं. सगळ्याच जिवाची किंमत सर्वांनाच नसते!

खऱ्या घटनेत न राहवून तिची चौकशी केली तर सारं संपलेलं होतं. हैदराबादला तिचा ठावठिकाणा असल्याचं कळलेलं. तिथेही तिने नाव बदललं होतं, त्याच्यासाठी! तिचा मृत्यू होऊन दीडेक वर्ष झालेलं. हा तिथे गेला, तिची कबर तरी पाहता येईल म्हणून कबरस्तानमध्येही गेला. मात्र तिथे नुकतीच माती खालीवर केलेली. आपल्याला दहन केलं तर आपल्या अस्थीदेखील कुठे तरी विसर्जित केल्या जातील म्हणून तिने नाव बदललेलं. शेवटी तिच्या अस्थीदेखील मिळाल्या नाहीत. असहाय अवस्थेत आलेलं बेवारसासारखं मरण कवटाळून ती गेली. मृत्यूआधी तीन आठवडे निपचित पडून होती मात्र अखेरच्या क्षणी पूर्ण ताकद एकवटून तिने याचंच नाव घेतलेलं. मग दोन आचके नि खेळ खल्लास. आता त्याला वाटतं की तिची विचारपूस केली नसती तर बरे झाले असते. काही दुःखे काळजात खोल खोल रुततात!

आपल्या सर्वांना निदान रक्ताची माणसं, मित्र, नातलग तरी असतात मात्र ज्यांचं कुणीच नसतं त्यांच्यातलं कुणी असं मरणपंथाला लागल्यावर त्या व्यक्तीच्या मनात गतकाळात आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांच्या भेटीची अनिवार इच्छा असते, किमान एक क्षणतरी हव्याशा व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःला पाहावं आणि मग श्वास सोडावेत असं वाटत असतं. ही तगमग मी पाहिलीय. खोटं बोलून आपणच तिच्या हातात हात द्यायचा, ग्लानीत असणाऱ्या जीवाला वाटतं 'तो'च आलाय! मग त्या जिवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागतात आणि काही क्षणातच तो जीव हे जग सोडून गेलेला असतो, मरतुकड्या अशक्त हातात आपला हात घट्ट धरून! अशांचे मरणसोहळे होत नाहीत नि त्यांच्यासाठी कुणी रडत नाही. मग घट्ट धरलेल्या हाताचे ठसे अनेक वर्ष आपल्याला एकट्यालाच दिसत असतात! हे फार भीषण दुःखद असतं!

आजाराने ग्रासलेल्या एखाद्या अश्राप जीवाच्या अकाली जाण्याची बातमी आपल्या कानी येऊ नये अशीच बहुतेकांची इच्छा असते. तिकडून एखादा फोन आला तरी तो घ्यावा वाटत नाही. मेसेज आला तर वाचला जात नाही. एखाद्याचं असणं आधारदायी असतं, आजारी असलं म्हणून काय झालं आपलं माणूस हयात आहे याचंही एक सुख असतं. त्यातलीच ही एक चटका लावून गेलेली एक्झिट, जिचा मी कधीच सामना करु शकलो नाही...

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आखरी ख्वाहिश..

नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!

एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.

मंगळवार, १२ जुलै, २०२२

शिंजो आबे यांची हत्या आणि चीन जपान वैमनस्य ..

नुकतेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरात याचे तीव्र पडसाद 
उमटले. हेच चित्र सर्वत्र दिसले अपवाद होता चीनचा! आबेंच्या हत्येनंतर चीनी सोशल मीडियावर अक्षरशः दिवाळी साजरी केली गेली. 'वन प्लेट मोअर राईस' असं म्हणत चिन्यांनी वाढीव कल्ला केला. चिनी इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी आबेंचा मारेकरी यामागामीचा गौरव करत त्याला हिरो म्हटलंय. जगभरातल्या माध्यमांनी चिनी विकृतीची दखल घेतली. खुद्द चीनने मात्र याविषयी ठोस भूमिका न घेता लोकभावनांना एकप्रकारे मूक संमतीच दिली. अनेकांनी चिनी मानसिकतेमागची कारणमीमांसा मांडली. त्यांचा सूर असा होता की, शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. आबेंच्या पुढाकाराने चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा समूह सुरु झाल्यावर चीनचा तिळपापड झाला होता. आबेंनी चीनच्या महत्वाकांक्षी 'ओबोर' या बहुराष्ट्रीय रस्ते प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यामूळे आबे चिन्यांच्या डोळ्यात सलत होते. वास्तवात चीन जपानमधलं वैमनस्य अधिक गहिरं, जुनं नि कडवट आहे ज्याबद्दल भारतीय माध्यमे क्वचित लिहितात. अशी मांडणी अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेण्यासारखे असले तरी हा इतिहास आहे जो बदलता येणार नाही.

रविवार, १० जुलै, २०२२

बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.

गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !

मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.