रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

पौष...

हरेक मराठी महिन्याला एक वलय आहे. त्याची स्वतःची अशी महती आहे मात्र पौष त्याला अपवाद आहे. पौषची कुख्यातीच अधिक आहे.
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना

समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

दिव्या चेकुदुराई - जिथे मृत्यूचाही थरकाप उडाला

लॉकडाउनने माणसांची काय आणि किती दुरावस्था केली हे पाहायला कुणाला वेळ नव्हता कारण ज्याला त्याला स्वतःची भ्रांत पडली होती. यात काही वावगं नाही. मात्र लॉकडाउन सरल्यानंतर एकमेकाला पायाखाली घेऊन पुढे जाण्याची चढाओढ सुरु झालीय तेंव्हा तरी आपण भवतालात डोकवून पाहण्यास हरकत नसावी. मन सुन्न करणाऱ्या या घटना होत्या. यातलीच एक दास्तान दिव्याची आहे. दिव्या चेकुदुराई. वय 22.
जून २०२० मध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तिची हत्या झाली. जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक मर्डर असं तिच्या मृत्यूचं वर्णन करता येईल.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

नागम्मा @रेड लाईट डायरीज - लॉकडाउन स्टोरीज

नागम्माचं मूळ नाव नागपार्वती.
हैदराबादमधील बशरतनगर मध्ये तिचं किरायाचं घर होतं.
काला पत्थर रोड परिसरात हा भाग येतो.
ती सादमूद हेमामालिनी सारखी दिसे. सौंदर्याहून अधिक जादू तिच्या रसिल्या आवाजात होती.
तिला तेलुगू, कन्नड चांगलं येई. काही हिंदी भजनं देखील ती गायची. ठुमरीवर तिचा विशेष जीव होता.
उमर ढळलेली असूनही तिच्या अदा कातिल होत्या.

सत्तरी पार केल्यानंतर तिची गात्रे साहजिकच शिथिल झाली होती. तिच्या ढिल्या झालेल्या कातडीने कैक मौसम झेलले होते.
नागम्मा तिच्या तरुणपणात अगदी जहरी कहर असणार यात काहीच शंका नव्हती.
ओल्ड हैदराबादमधलं तिचं वास्तव्य तीस वर्षापासूनचं होतं.
त्याआधी ती समुद्रतटाशी लागून असलेल्या कृष्णा जिल्ह्यातील मछलीपटणमध्ये वास्तव्यास होती.
तिच्या डोळ्यात एक तहानलेला समुद्र दिसे.
तिची गुजराण कशावर चाले हे काहींसाठी कोडे होते मात्र त्यात तथ्य नव्हते. ती स्वाभिमानाने जगणारी बाई होती.
कमालीची संवेदनशील आणि निश्चयी.

अर्थ जगण्याचा..

ढलाण निसटलेल्या बांधावरल्या दगड मुरुमाच्या बेचक्यात सांजेपासून बसून असलेल्या सागवानी म्हाताऱ्याने आपल्या जास्वंदी नातवाला मांडीवर घेतलं होतं. अंधारून येऊ लागल्यावर पायाला रग लागलेला म्हातारा धोतर झटकत अल्लाद उठला. पुढं होत त्यानं नातवाला उचलून कंबरेवर घेतलं. निघताना नातवानं आज्ज्याला विचारलं, "आबा आता पुन्ना कदी यायचं ?"

गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

साखरीबाई @रेड लाईट डायरीज

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत १९९८ साली घडलेल्या घटनेचे एक वर्तुळ गतसालच्या लॉकडाउनमध्ये पूर्ण झाले. बुधवार पेठेतील पिंपळाच्या झाडानजीकच्या छोटेखानी मंदिराला लागून बहुमजली चांदणी बिल्डिंग आहे. या इमारतीत साखरीबाईचा कुंटणखाना होता. साखरीबाईचं मूळ नाव शकुंतला मुंदळा नाईक. पस्तिशीतली ही बाई अत्यंत कठोर निर्दयी आणि कमालीची व्यावहारिक होती. पैसा तिचं सर्वस्व होतं. साखरीबाईकडे घटनेच्या दोनेक वर्षांपूर्वी शांता नावाची एक तरुणी रिप्लेसमेंट मध्ये आली होती. साखरीने तिला तिच्या अड्ड्यात सामावून घेतलं आणि त्या बदल्यात तिच्या धंद्यात पाती केली. शांता दिसायला अप्सरा मदनिका वगैरे नसली तरी तिचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य होतं आणि तिचे काही आशिक देखील होते. पैकी एक दल्ला तिचा नवरा असण्याची बतावणी करायचा. शांतेने देणी चुकवण्यासाठी म्हणून साखरीबाई कडून सात हजार रुपये उचल घेतले आणि तिथून तिचे दिवस फिरले. सतत पैशावरून टोमणे बसू लागल्यावर मारहाणीच्या भीतीने शांतेने एका दिवशी पोबारा केला. साखरीबाईने शांताचा खूप शोध घेतला मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर जूनच्या मध्यावधीत साखरीबाईला कुणकुण लागली की शांता इथेच बुधवारपेठेत आलीय आणि नव्या ठिकाणी धंदा करू लागलीय. ही खबर कानी पडताच साखरीबाईचा पारा चढला. अवघ्या काही दिवसात तिने शांताचा ठावठिकाणा शोधून काढला. शांता बुधवारपेठेतच परतली होती मात्र तिचा पत्ता होता प्रेमज्योती बिल्डिंग पहिला मजला !

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

केरसुणी...

गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.
केरसुणी तयार करण्यासाठी शिंदीची पानं नाहीतर मोळाचं गवत वापरलं जातं.
आमच्या सोलापूर जिल्ह्यात मायबाप पुढाऱ्यांच्या कृपेने काही अधिकृत तर मोकार वावरभरून अनधिकृत शिंदीची झाडं आहेत.
आमच्याकडं मजूर मंडळी आणि विडी कामगारांसाठी शिंदी आणि ताडी अजूनही फर्स्ट प्रेफरन्सवर आहे.
शिंदी चवीला आंबूस लागते, रिकाम्या पोटी ढोसू नये लागते. पोट डरंगळतं. ढंढाळ्या लागतात.
स्वस्तातली नशा म्हणून लोक शिंदी पितात, आजकाल केमिकल वापरून खोटी बनावट शिंदी विकली जाते. खिसे हलके झालेले आणि जिन्दगानी हरलेले लोक त्यातदेखील अमृत शोधतात.
त्याच शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करतात.
आज तिची पूजा होते. मात्र वर्षभर गावाकडे केरसुणी हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.
"कुठं गेली ती केरसुणी गतकाळी ? " असा उध्दार होत असतो.

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

मुक्या लेकीचं दुःख...



कालपरवाच्या पावसात जगूनानाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली.
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चित्रीचं वासरू



चित्रीचं वासरु पोटातच मेलं.
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

प्रेमचंदांची फाटकी चप्पल...



तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ? 
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो. 
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ? 
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो.. 

ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. 
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते. 
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं. 
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.