गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!


दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.

तिला सारखे कुणाचे तरी फोन यायचे आणि मग ती हुंदके आवरत हळूच रडायची. तिच्या सोबत तिची तरुण मुलगी होती जी थिजल्या डोळ्याने बसून होती नि अधून मधून त्या आज्जीच्या मस्तकावरून, गालांवरून हात फिरवायची. असं करताना तिचे डोळे भरून आल्याचे स्पष्ट जाणवायचं.

दरम्यान काही वेळ तिला फोन आलाच नाही तेव्हा ती कासावीस झाली. बऱ्याच वेळाने अचानक फोन वाजला, त्या मुलीने घाबरतच फोन घेतला. ती काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे वाहत होते, तिच्या डोळ्यांकडे पाहून विधवेने टाहो फोडला.

त्या क्षणी बस गच्च भरलेली असूनही त्या दोघी एकांतात असल्यासारख्या होत्या. काही वेळ गेल्यानंतर न राहवून त्या मुलीला विचारलं, "काय झालं, मुली?"

तिचे डोळे पुन्हा वाहू लागले. ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.
डोळ्यांना पदर लावून आज्जीबाईच बोलल्या.

त्यांचा एकुलता नातू गेला.
त्यांना एकच मुलगा होता ज्याचे कोविड काळात निधन झाले होते.
सुनेने नवऱ्याच्या पाठीमागे मुलाला तळहाताच्या फोडासारखा जपला होता. दिवाळीत घराबाहेर अंगणात खेळताना अज्ञात वाहन त्याला ठोकर मारून गेलं नि पोर मरणाच्या दारात गेलं.

ती वृद्धा, पैशाअभावी लग्न न झालेली तिची एकुलती मुलगी आणि पोर गमावून बसलेली सून इतकेच त्यांच्या कुटुंबात उरले होते. त्या क्षणी खिडकीतून दिसणारे आकाश मला विलक्षण उदास भासले. मागेपुढे होणारी झाडे रडवेली वाटत होती. वर उंच आभाळात काही घारी घिरट्या घालत होत्या, त्यांची पिले बहुधा खाली असावीत. सारी बस स्तब्ध झाली होती. भिन्न कारणांने लोक प्रवास करत होते मात्र त्या क्षणी सारेच त्यांच्या दुःखात सामील होते! माणसं शोकव्याकुळ झाली की त्यांच्यातला भेदाभेद धूसर होतो!

करमाळयाचं एसटी स्टँड आलं नि मी खाली उतरलो.
धूळ उडवत चाललेल्या त्या बसकडे वळून पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती, त्यांना तर त्या परिस्थितीला आयुष्यभर तोंड द्यायचं होतं.

त्या बसमध्ये कित्येक थकलेले उदास चेहरे होते नि कित्येक आनंदी चेहरेही होते मात्र या दोघींच्या वाट्याला आलेले दुःख आणखी कुणाच्या हिश्श्याला आलं नसावं.

त्या मायलेकी वगळून बाकीचे सारे प्रवासी उतरल्यानंतर ती बस तिथे जावी जिथे त्या आज्जीचा मुलगा असेल, अपघातात गेलेला पती असेल नि कुण्या अवजड वाहनाखाली गेलेला कोवळा नातू असेल!
ते सारे त्यांना भेटावेत अन् त्यांचे सुखाचे दिवस परत यावेत. या भेटी स्वर्गीय सुख देतील!
नियतीने इतके क्रूर होऊ नये की कुणा एकाचे जगणे मरणाहून कठोर, क्लेश यातनादायी व्हावं!

सुखाचे रस्ते सर्वांना हवे असतात, ते सहजी मिळत नाहीत मात्र कायमचीच दुःखाच्या पाऊलवाटांची जीवघेणी वणवण कुणाच्या नशिबी येऊ नये.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा