मंगळवार, २९ जुलै, २०२५

साप - मनातले आणि हरवलेल्या जंगलातले!



साप हा शेतकऱ्याचा मित्रच! काही हजार वर्षापूर्वी जेव्हा आताच्या विविध धर्मातल्या देवदेवतांच्या संकल्पना रूढ नसतील तेव्हा माणूस निसर्गातील प्रतिकेच शिरी मिरवत असावा, त्यांच्यापुढेच नतमस्तक होत असावा. सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या हे त्याची तत्कालीन दैवते (?) असावीत. पर्वतशिखरे, टेकड्या, नद्या, मैदाने, शेतशिवारे, जंगले यांची तो आराधना करत असावा. त्याच्यासाठी झाडे, पाने, फुलं, पाणी, पाऊस, अग्नी हे सर्व जीवश्च असणार. त्यांची आपल्यावर कृपा राहावी हा विचार त्याच्या मनात जेव्हा आला असेल वा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्याने निसर्गातल्या अशा सर्व प्रतिकांना वंदनीय स्थान दिले असणार. जेव्हापासून कृषक संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून झाडे, पाने, फुलं, पाणी. पाऊस, साप, माती, पिके आदींना वेगळेच स्थान असावे. त्यांच्या नागपूजनाचे कारण हे असू शकते. आताच्या समाजाच्या डोक्यात नागपूजनाची ती संकल्पना अंशतःही नाही. सर्वच धर्मात अशा सर्व प्रतिकांना वेगळेच स्वरूप दिले गेल्याने यामागची मूळ भावना कधीच लोप पावली असावी. आता नारायण नागबळी या भाकड संकल्पनेपुरताच अनेकांचा नागांशी संबंध उरलाय! असो. व्ही.सुरेश या प्रसिद्ध सर्पमित्राविषयी ही पोस्ट!

मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

बुधवार, ९ जुलै, २०२५

ब्लॅक बॉक्स डायरीज – एकाकी स्त्रीच्या संघर्षनोंदी


'ब्लॅक बॉक्स डायरीज' ही 2024 मध्ये प्रदर्शित झालेली एक शक्तिशाली आणि एका पीडित महिलेच्या वैयक्तिक नोंदीविषयीची डॉक्युमेंट्री आहे, जी जपानी पत्रकार शिओरी इतो यांची निर्मिती आहे. सिनेमॅ व्हेरिटे शैलीत याची निर्मिती केली गेलीय, ज्यामध्ये शिओरी यांच्या वैयक्तिक व्हिडिओ डायरीज, कोर्टरूम फुटेज आणि गुप्त रेकॉर्डिंग्ज यांचा समावेश आहे. त्यायोगे प्रेक्षकांना एक थरारक, भावनिक अनुभव मिळतो, जो शिओरी यांच्या संघर्षाची आणि धैर्याची जाणीव करून देतो. ही त्यांची पहिली पूर्ण-लांबीची डॉक्युमेंट्री, जी त्यांनी स्वतःच्या लैंगिक अत्याचाराच्या अनुभवावर निर्मिलेली. यात शिओरी इतो स्वतःच्या केसचा तपास करतात आणि एका प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध न्याय मिळवण्यासाठीचा त्यांचा लढा दाखवतात. हा लढा जपानमधील तत्कालीन #MeToo चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनला होता आणि त्याने जपानच्या कालबाह्य कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थांवर प्रकाश टाकलेला.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बदनाम गल्ल्यातले सच्चेपण – सैली 13 सप्टेंबर!



श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेला 'सैली 13' सप्टेंबर हे आत्मकथनपर कथासंग्रह त्या काळातला आहे ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे ओवळे पाळले जात होते इतकेच नव्हे तर साहित्य प्रवाहात देखील अशा प्रकारचे अंडर करंट अस्तित्वात होते. अपवाद दलित साहित्याचा! मराठी साहित्यातील शहरी / नागर आणि ग्रामीण या वर्गवारीपैकी कथित शहरी साहित्यामध्ये जे विविध आशय विषय हाताळले गेलेत त्यातही काही घटक बऱ्यापैकी अस्पृश्यच राहिलेत. अर्थात यातही काही तुरळक सन्माननीय अपवाद होते. मराठी साहित्यामध्ये ज्याप्रमाणे विज्ञान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, निढळ लैंगिक कथा, वैश्विक वैचारिक समाजपट असणारे वाङ्मय तुलनेने कमी निर्मिले गेलेय, त्याचप्रमाणे काही विशिष्ठ वंचित शोषित घटकांचा अंतर्भाव असणारे सामाजिक साहित्यही कमी लिहिले गेलेय. त्यातलाच एक घटक वेश्या होय. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत. देहविक्री करणाऱ्या पुरुषांचा कथावकाश मराठी साहित्यात येण्यासाठी तर 2019 चे साल उजाडावे लागलेय. डॉ. माधवी खरात यांच्या 'जिगोलो' या कादंबरीने ती उणीव भरुन काढली.

गुरुवार, ३ जुलै, २०२५

टायटन – एका डिझास्टरची दुःखद गोष्ट!




'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.