मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

'गुड़िया' - सहस्त्र लेकींची आई!

मंजू सिंह त्यांच्या एका मानसकन्येसोबत    

शोषणाच्या नि देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या स्त्रियांना काय काय सोसावं लागतं हे मंजू सिंहनी अनुभवलं आहे. यातल्या हरेक स्त्रीला मुक्त होता यावं नि त्यांचा छळवाद संपावा यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं आहे. त्यात त्यांना पती अजित सिंह यांची उत्तम साथ मिळाली. मंजू आणि अजित या दांपत्याने आजवर साडेपाच हजार मुलींची सुटका केली आहे. बाराशे मुलींचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. 

1988 साली त्यांनी वेश्यावस्तीतल्या तीन मुली दत्तक घेतल्या आणि आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दत्तक देण्यास स्त्रिया कच खाऊ लागल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण थेट मुलींच्या सुटकेचे उद्दिष्ट ठेवू! त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा एक प्रोटोकॉल ठरवला. छोटेखानी टीम बनवली. त्यांचे काम इतके जबरदस्त होऊ लागले की त्यांचा आपसूक गवगवा होऊ लागला. त्यांनी संस्थेची नोंदणी करून स्वरूप व उद्दिष्टे व्यापक करण्याचे ठरवले. 1993 मध्ये त्यांच्या 'गुड़िया' या एनजीओची अधिकृत नोंदणी झाली. 

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

आयेशा परवीन नावाची दुर्गा!

समीर गायकवाड
आयेशा परवीन 

जगात कुठेही गेलं तरी अपवाद वगळता शोषणप्रवृत्ती असणारे लोक आपल्या प्रभावाच्या बळावर यंत्रणांना हवं तसं वाकवतात हे वास्तव आहे. ही दास्तान आहे आयेशा परवीन हिची. ती पाकिस्तानातली आहे. काही दिवसांपूर्वी तिने युरोपियन देशांत दिलेल्या मुलाखती प्रकाशझोतात आल्या होत्या. जी आयेशा आज तिच्या कामाच्या बळावर जगभरात प्रसिद्धी मिळवतेय तिने काही वर्षांपूर्वी नरकयातनेहून वाईट आयुष्य भोगलंय हे कुणालाही खरं वाटणार नाही. तिचे अपहरण केले गेले, ती शुद्धीवर येऊ नये म्हणून तिला अंमली पदार्थ दिले गेले आणि एका वेश्यागृहात विकलं गेलं, जिथे तिने पाच वर्षांहून अधिक काळ काम केलं. आयशा परवीन बद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती सहजी या गाळातून सुटली नाही परंतु तिने तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणे कधीही सोडले नाही! सामान्यतः सभ्य पांढरपेशी स्त्रिया लवकर हिंमत हारून आपल्या वाट्याला आलेले भोग आयुष्यभर सोसत राहतात, त्यांना बाह्य जगातून पाठबळ असले तरीही त्या विद्रोह करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आयेशाने मात्र कठोर तपस्या करावी तसा संघर्ष केला.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

हिरवाई..

समीरगायकवाड
हिरवाई 


आज पुष्कळ हिरवाई दिसतेय. त्याविषयी काही अवांतर. गावाकडं एखादा पिकल्या केसांचा वा अर्धवट वयाचा डंगरा इसम बाईलवेडा झाल्यागत वागू लागतो तेव्हा 'गडी लई हिरवट' असल्याचा शेरा मारला जातो.
'पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा..' ही संकल्पना यातूनच उगम पावलेली!

'पांढरे केस, हिरवी मने' या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते 'कथित' हिरवट नाहीये. असो.

शांता शेळके यांची 'पाकोळी' ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी 'झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्‍याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. '

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

अनमोल 'रतन'!


भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले!