शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

शोध मराठी रंगभूमीवरील 'ती'च्या अस्तित्वाचा!



सिनेमाच्या तुलनेत नाटकाची परिणामकारकता अधिक आहे हे सर्वमान्य आहे. लेखकाला काहीतरी सांगायचे असते वा मांडायचे असते त्या सूत्राला नाट्यरूप देत नाटक आकारास येते. मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की बदलत्या काळानुसार रंगभूमीही बदलत गेलीय नि सादरीकरणापासून ते विंगेमागील घटकांच्या भावविश्वापर्यंत सारं काही बदलत गेलंय. नाटकांचे आशय बदलत गेले, नाटकांचे नेपथ्य वेष केशभुषा नि प्रकाशयोजना सारं सारं आमूलाग्र बदलत गेलं. त्यामुळेच नाटकांना समाजाचा आरसा असं म्हटलं गेलं तर त्यात वावगं असं काही नाही. मराठी रंगभूमीच्या मुहूर्तमेढीपासून ते अगदी अलीकडच्या नाटकापर्यंत नजर टाकली तर लक्षात येते की नाटकांनी जशी कात टाकलीय त्याहून अधिक वेगाने नि वैविध्याने नाटकांमधील स्त्री पात्रांनी कात टाकलीय. भारतीय रंगभूमीची सुरुवात ही भरताच्या नाट्यशास्त्रापासून सांगितली जाते. चारही वेदांतून आवश्यक बाबी एकत्र करून पंचमवेद तयार करण्यात आला; ज्यात सादरीकरणाचे मूल्य आणि प्रबोधनाची कास होती. भरतमुनी आणि त्यांच्या शंभर पुत्रांनी या पंचमवेदाचा अभ्यास केला. पौराणिक दाखल्यांनुसार स्वर्गात इंद्रसभेत ‘ध्वजामह’ नावाच्या महोत्सवात भरतमुनीने पहिले नाटक सादर केले, तेव्हा त्या नाटकातील स्त्री आणि पुरूष पात्रांचा अभिनय अप्सरांनी केला. म्हणजे नाट्यकलेची सुरुवात स्त्रियांकडून झाली. खरेतर स्त्रियांची पात्रे मुबलक हवी होती वा स्त्रियांच्या प्रश्नांवर नाट्यसंहिता पुष्कळ हव्या होत्या मात्र झाले उलटेच! नाट्यकला पृथ्वीतलावर आल्यावर महिलांना नाटकात प्रवेश करण्यासच बंदी झाली! जगभरातल्या लोकसंस्कृतीत जे घडत गेले तेच आपल्याकडेही घडले तेही अधिक प्रभावाने! हा प्रभाव पुरुषप्रधान संस्कृतीचा होता! समाजात हजारो वर्षे स्त्रियांवर अन्याय होत आला, त्यांची मुस्कटदाबी होत गेली मात्र त्याचे परिणामकारक चित्रण नाटकात अभावाने येत गेले. संस्कृतीच्या कडबोळ्याखाली स्त्रियांचे शोषण लपवून टाकण्यात समाजाच्या नैतिक ठेकेदारांना यश मिळाले. मात्र कोंबडे झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहील काय या न्यायाने स्त्रियांच्या प्रश्नांची नि भावभावनांची दखल रंगभूमीला घ्यावीच लागली!

सुखाचे घर!



सोलापुरात आमचे घर ज्या परिसरात आहे तिथे वेगाने नवनवी बांधकामे होताहेत. गेल्या दशकापासून या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. वीस वर्षांपूर्वी इथे घासगवताने वेढलेला इलाखा होता. आता मात्र मोकळी जमीन नजरेसही पडत नाही. इथे बांधकामावरचे मजूर नित्य नजरेस पडतात. या संपूर्ण भागात बांधकामांवर सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी काही माणसं नेमली जातात. रामय्या आणि त्याची बायको भारती हे इथे दोन दशकापासून याच कामावर आहेत. अनेक प्रोजेक्टवर त्यांनी हे काम इमाने इतबारे केलेय. बांधकाम साहित्याची राखण केली आहे.

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!


दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.