शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

देशोदेशीच्या विवाह प्रथा - एक आकलन!



एक काळ होता जेव्हा विवाह ठरवला जायचा तेव्हा वर वधूचे जन्म देखील झालेले नसत. म्हणजेच मूल जन्माला येण्याआधी त्याचा विवाह कुणासोबत होणार आहे हे ठरवले जायचे! त्याचबरोबर हे विवाह केवळ दोन कुटुंबांचे संबंध जुळवून आणण्यासाठी केलेले द्राविडी प्राणायाम असत. पुढे जाऊन हे विवाह टिकविण्याची जबाबदारी त्या वर वधूपेक्षा कुटुंबातल्या सर्व सदस्यांची असे. कारण हे विवाह त्या दोघांचेच नसत! त्यांचे आपसात पटले नाही तरी बळजबरीने ते नाते निभावावे लागायचे. परिणामी अत्यंत शुष्क शरीरव्यवहार वगळता काहीच नसे! पती पत्नीचे नाते नावाला असे.त्यानंतरच्या काळामध्ये मुलाचे आणि मुलीचे आईवडील या दोघांचे लग्न ठरवू लागले त्यात त्या नवदांपत्याची परवानगी नावापुरती असे. घरच्या मोठय़ा माणसांचा दबावच इतका असे की ते म्हणतील त्या जोडीदारासोबत लग्न लावले जाई. लग्न म्हणजे आर्थिक संबंध जोपासण्याचा नामी सोहळा असे.

पुढच्या काळात नव्या पिढीतल्या उपवर वर-वधूने स्वतःच्या मर्जीने लग्न करण्यास सुरवात केली आणि जुन्या परंपरा थोड्याफार मोडीत निघाल्या. चित्र आता काहीसे बदलले असले तरीही आपल्या देशात अजूनही बालविवाह होतात, दांपत्याच्या मर्जी विरोधात विवाह होतात, बळजबरीने नाती लादली जातात. 

विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन आहे याचा विसर पडतो आणि माणसं स्वतःचा स्वार्थ, कुटुंबाचे हित, आर्थिक हितसंबंध यांचा विचार करून खोटं नातं जोडतात! खरं तर इथं नातं माथी मारले जातं असं म्हणणं योग्य ठरावे!
जगभरामध्ये विवाहाच्या कोणकोणत्या परंपरा आहेत, कोणत्या रूढी आहेत हे अभ्यासलं तर लक्षात येते की कालागणिक जगातल्या अनेक देशांनी यात बदल केलेले आहेत, अनेक देशात सामाजिक क्रांती घडलेली आहे, तर काही देशामध्ये चक्क विवाहसंस्थाच मोडीत निघाल्यात तर काही देशात विवाह हे नावापुरते उरले आहेत!

जगभरातले आताचे आणि गतकाळातील विवाह रिवाज-परंपरा यांच्याभोवतीच अजूनही रुंजी घालतात ही नवलाची गोष्ट आहे, कारण मानवी जीवनाच्या उत्क्रांतीनंतर आजवरच्या दीर्घ कालखंडात अनेक रिवाज रुढी अमूलाग्र बदलत गेले त्याचा मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव पडला.

त्यामुळे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक प्रादेशिक प्रांतीय आणि राष्ट्रीय पातळीवरती नानाविध बदल घडत गेले कारण कोणत्याही समाज संस्थेचा सर्वात छोटा घटक कुटुंबसंस्था आहे आणि कुटुंबाचा मुख्य घटक दाम्पत्य आहे. असे असूनही दाम्पत्य जीवन जिथून सुरू होते त्या विवाह सोहळ्यात देशागणिक फरक आढळतात आणि ते फरक काही ठिकाणी अस्मिता म्हणून गोंजारले जातात!

जगभरातला विवाह परंपरांचा हा धांडोळा निश्चितच अंतर्मुख करणारा आहे कारण यातून मानवी मनाचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. तो म्हणजे नात्यांच्या नावाखाली केला जाणारा व्यवहारच आहे, प्रेमाच्या मुस्कटदाबीचा नवनवा आविष्कार आहे.

हे सर्व पाहू जाता असे वाटते की जेव्हा कुठलीही नाती नव्हती वा कुठल्याही कौटुंबिक संस्था नव्हत्या तेव्हा मानवी प्रेमजीवन हे निश्चितच सरस आणि रसरशीत असेल. अजूनही विवाह संस्थाच्या जोखडाखाली अनेकांचा जीव घुसमटत असेल. या लेखात चितारलेला विवाह परंपरांचा वैश्विक आलेख केवळ माहितीसाठी नसून त्यापासून बोध घेण्यासाठी आहे, किमान काहींचे विचार बदलले तरी लेखन कारणी लागेल!

विवाह प्रकारापैकी अरेंज्ड मॅरेज हे एक प्रकारचे वैवाहिक मिलन आहे जिथे वधू आणि वर प्रामुख्याने जोडप्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींद्वारे निवडले जातात, विशेषत: पालकांसारख्या कुटुंबातील सदस्यांद्वारे!
काही संस्कृतींमध्ये तरुण व्यक्तीसाठी जोडीदार शोधण्यासाठी व्यावसायिक मॅचमेकरचा वापर केला जातो. अनेक संस्कृतींमध्ये एरेंज्ड विवाह ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहेत.

ही प्रथा बर्‍याच प्रदेशांमध्ये कॉमन आहे, विशेषत: दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया, मध्य पूर्व आखाती देश, उत्तर आफ्रिका, उप-सहारा आफ्रिका आणि कॉकेशस पर्वतीय भाग इथे अधिक प्रचलित आहे. जगाच्या इतर अनेक भागांमध्ये, 19व्या आणि 20व्या शतकात या प्रथेत लक्षणीय घट झालीय.

काही कुटुंबांमध्ये प्रचलित असलेल्या सक्तीच्या विवाहाचा संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला आहे. सक्तीच्या बालविवाहाचा निषेध करणे नितांत गरजेचे आहे. इतर संस्कृतींमध्ये बहुतेक लोक स्वतःचा जोडीदार निवडतात. अठराव्या शतकापर्यंत जगभरात व्यवस्थित विवाह प्रक्रिया खूप सामान्य होती. सामान्यतः वर वधूचे पालक, आजी आजोबा किंवा इतर जवळचे नातेवाईक आणि विश्वासू मित्रांद्वारे विवाह आयोजित केले जात असत.

काही ज्ञात ऐतिहासिक अपवाद असे आहेत की, जसे इटलीच्या पुनःउभारणीच्या काळात विवाहसंस्था आणि वैवाहिक संस्कार बदलले गेले, त्याच बरोबरीने भारतातील वैदिक काळात गंधर्व विवाह पद्धत! या विवाहात कोणत्याही बंधनं, परंपराविना वधू वर परस्परांना वरत असत. नंतर कुटुंबिय आप्तेष्ट यांचे आशीर्वाद घेत असत. आता हे विवाह कालबाह्य झाले असले तरी आताचे प्रेमविवाह काहीशा अशाच स्वरूपाचे असतात.

प्राचीन ग्रीको रोमन काळातील विवाह सामाजिक जबाबदारीवर आधारित होता. लग्न सहसा पालकांनीच लावले जायचे; प्रसंगी प्रोफेशनल मॅचमेकर वापरण्यात येत असत. विवाह कायदेशीर ठरण्यासाठी, वधूच्या वडिलांनी किंवा पालकांनी लग्न करण्यास परवडेल अशाच योग्य पुरुषास परवानगी देणे आवश्यक होते. आर्थिक बोजा पडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असावी असा सहज निष्कर्ष इथे काढता येतो.

आताच्या काळातील लग्न समारंभावर खर्च होणारी अफाट रक्कम पाहू जाता ही प्रथा अगदी विलक्षण महत्वाची वाटते. पालक मरण पावलेल्या अनाथ मुलींचे विवाह सहसा चुलत भावांशी लावले जायचे. या जोडप्यांच्या विवाह समारंभात बुरखा काढण्यासारख्या विधींचा समावेश असे. एका पुरुषास सामान्यत: एक पत्नीपुरतीच विवाह मर्यादा होती, मात्र त्याला परवडेल तितक्या उपपत्नी (रखेली नव्हे, वारसा हक्क असलेले उपवस्त्र म्हणता येईल) करण्याची अनुमती होती.

एके काळी चीनमध्ये सुनियोजित विवाह परंपरा होती (बाओबान हुन्यिन प्रचलित रिवाज) ज्यात वर वधूने एकमेकास न पाहताही संमती दिलेली असे. आपल्याकडे एकोणिसाव्या शतकात हीच पद्धत कॉमन होती. वरवधूच्या परस्पर त्यांचे लग्न पक्के केलेले असे. विसाव्या शतकाच्या मध्यापुर्वी याचे प्रमाण जास्त होते. विवाह हा दोन कुटुंबातले पालक आणि इतर वृद्ध सदस्यांमधील वाटाघाटीचा विषय होता आणि हेच लोक कुणाचा विवाह कुणासोबत करायचा याचा निर्णय घेत. वरवधू लग्नाच्या दिवसापर्यंत एकमेकांना कधीही भेटले नसले तरीही, त्यांना नकार देण्याची अनुमती नसे. बऱ्याचदा हौसेखातर वा व्यवहार म्हणून हे विवाह ठरवले जात असत. अशा वेळी नवदाम्पत्यास जबरदस्तीचा सामना करावा लागे. हे चित्र चीनमध्ये पाच दशकापूर्वी होते.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापूर्वी रशियामध्ये व्यवस्था केलेले विवाह रूढींना अनुसरून होते. विवाहित पुरुषांचे एकाहून अधिक विवाह होणं सामान्य बाब होती. स्त्रीला ही परवानगी नव्हती. पुरुषास म्हणजे वरास त्याची मर्जी विचारली जाई मात्र वधूला हे सौख्य नव्हते. दावणीला जनावर बांधावे तसे तिला कुटुंबातले लोक ठरवतील त्या पुरुषासोबत लग्न करावे लागे. बाल्टिक राष्ट्रे एकत्र होती त्या रशियातली सहा दशकापूर्वीची रूढी होय. आता तिथेही चित्र बदलले आहे. तर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत, युनायटेड स्टेट्समधील स्थलांतरित कुटुंबांमध्ये अरेंज्ड व्यवस्थित विवाह सामान्य गोष्ट होती. 

जपानी-अमेरिकन स्थलांतरितांमध्ये 'चित्र-वधू विवाह' नावाने ओळखली जाणारी विवाह पद्धती होती. वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या काही दिवस अगोदरच्या काळात छायाचित्रांच्या देवाणघेवाणीद्वारेच एकमेकांना ओळखत असत. म्हणून हा चित्र वधू विवाह! 

स्थलांतरितांमधील हे विवाह विशेषत: नवदांपत्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या मूळ देशातल्या जवळच्या नातेवाईकांनी आयोजित केलेले असत. काही दशकांनी हे स्थलांतरित तिथेच स्थायिक झाले आणि नव्या संस्कृतीत मिसळले म्हणून, नेटक्या नियोजित अरेंज्ड विवाह पद्धतीत रुळले. याचे नियोजन रेखीव असे. यात नियोजित वधू वरांचे पालक आधी भेटत असत, एकमेकाविषयी माहिती करून घेत असत. दोहोंनाही जर आपण नव्या नात्यात गुंतू शकतो असे वाटले तर पुढचा टप्पा जोडप्याच्या भेटीचा असे. ही भेट दोन्हीकडील मित्रांनी आयोजित केलेली असे. कधी कधी या भेटींची संख्या अधिक असे. त्यांची पसंती मिळताच विवाह संपन्न होई.

फिजी बेटवासीयांनी त्यांच्या मुलांची लग्ने तीन किंवा चार वर्षांची असताना त्यांची व्यवस्था केली. त्या वेळी मुलांसाठी एक समारंभ करावा लागे जो वधू आणि वर प्रौढ झाल्यावर दांपत्य म्हणून जगण्यास बंधनकारक करे. अशा प्रकारचे बालविवाह भारतात आणि न्यू गिनी , न्यूझीलंड आणि ताहिती या जमातींमध्येही कॉमन होते. 

काही एस्किमो जमातींच्या जुन्या परंपरेनुसार, मुलगी जन्माला येताच, ज्याला ती मुलगी पत्नी म्हणून हवी असे तो तिच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची ऑफर देई. जर ऑफर स्वीकारली गेली तर, विवाहसोहळा म्हणून बंधनकारक मानले जाणारे वैवाहिक वचन दिले जायचे आणि मुलगी योग्य वयात आल्यावर तिच्या पतीकडे दिली जाई.

प्राचीन ग्रीसमध्ये, विवाहसोहळा जाहीर झाल्यानंतर, वधूच्या हुंड्याची रक्कम निश्चित केली जायची आणि विवाहित स्त्रीची सामाजिक स्थिती मुख्यत्वे तिच्या हुंड्याच्या मूल्यावर अवलंबून असायची. काही प्रसंगी, अथेन्समधील गरीब पालकांच्या मुलींना शहर-राज्य किंवा श्रीमंत खाजगी व्यक्तींकडून हुंडा दिला जाई!

बर्‍याच अफगाण जमातींमध्ये, कोणीही पुरुष आपल्या वचन दिलेल्या पत्नीला लग्नापर्यंत पाहू किंवा बोलू शकत नाही. ग्रीसमध्ये, पुजार्‍याच्या उपस्थितीत विवाहासाठी रिंग्जची देवाणघेवाण केली जाते आणि त्यानंतर पुजाऱ्याच्या संमतीशिवाय लग्न मोडले जाऊ शकत नाही. लग्न ठरल्यानंतर, विवाहित जोडपे लग्नाच्या दिवसापर्यंत एकमेकांना पाहू शकत नाहीत किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही. जुन्या रशियामध्ये , एखाद्या वर वधूने एकमेकास थेट प्रपोज करणे हा एक मोठा अपमान मानला जात असे.

नंतरच्या काळात आपल्या वा अन्य वंशजांमधील विवाहात लग्न करताना वैयक्तिक पसंती, डेटिंग आणि विवाहसोहळा असा क्रम तयार झाला. बदलत्या प्राधान्यक्रमानुसार बरेचसे लोक स्वायत्त विवाहांकडे वळले आणि त्यांच्या स्वत:च्या वांशिक गटाबाहेर विवाह करण्याचे प्रमाण वाढले. हा बदल जगाच्या इतर भागांमध्ये तत्सम ऐतिहासिक गतिशीलतेने घडला नाही. 

अमेरिकेत हे सहज शक्य झाले याचे कारण तेथील लोकजीवनातील विविध जातीय, धर्मीय, पंथीय संमिश्र लोकांचा एकजिनसीपणा असावा. हा बदल इतक्या वेगाने युरोप वगळता अन्यत्र घडला नाही. अन्य देशात बराच काळ गेल्यानंतर हे परिवर्तन घडले. अलीकडील काळाचे बोलायचे झाल्यास सामाजिक गतिशीलता आणि वाढता व्यक्तिवाद यामुळे समृद्ध देशांमध्ये अरेंज्ड विवाह अत्यंत कमी झालेत;

असे असले तरी, युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही देशांमध्ये, तेथील राजघराण्यांमध्ये, अभिजात अस्मितेच्या भावना असणाऱ्या लोकांमध्ये आणि अल्पसंख्याक धार्मिक गटांमध्ये, जसे की युनायटेड स्टेट्समधील कट्टरतावादी मॉर्मन गटांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच विवाहसोहळा आयोजित केला जातो.

काही समुदायांमध्ये विशेषत: मध्य पूर्व आखाती देश, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या ग्रामीण भागांमध्ये, एखाद्या स्त्रीने पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होण्यास नकार दिला तर तिला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. घटस्फोटाद्वारे विवाहातून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तिला 'अनैतिक' वर्तनाची बाई ठरवली जाते. तिच्या आततायी स्वातंत्र्यवादी वर्तनामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान झाला असे मानले जात असे. हे इथेच थांबत नसे, तिच्या नात्यातील पुरुष नातेवाईकांची थट्टा किंवा छळ केला जायचा.

तिच्या वैवाहिक निर्णयांचा परिणाम तिच्या भावंडांवर व्हायचा. त्यांना विवाह करण्यास अनुमती नाकारली जाई. अशा वेळी मग त्या स्त्रीची हत्या करणे हा एकच पर्याय त्या कुटुंबातील पुरुषांपाशी असे नि ते बिनदिक्कत त्याचा अवलंब करत! याचा एकत्रित परिणाम असा होई की क्वचित एखादीच स्त्री आपल्या विवाहास वरास विरोध करे, जरी तिने विरोध केला वा पुढे जाऊन काडीमोड घेतला तरी स्वतः होऊन जीव देण्याकडे तिचा कल असे. हे एक प्रकारचे ऑनर किलिंगच होते ज्यात अख्ख्या कुटुंबाचा हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असे! कौटुंबिक हिंसाचाराचा हा अत्यंत क्रूर चेहरा होता!

जबरदस्तीने केलेले विवाह, परस्पर संमतीने आयोजित केलेले विवाह कमी होत असताना नव्या विवाह पद्धती रूढ होण्यास वेळ लागला. परस्पर संमती घेताना कुटुंबातल्या सर्वच व्यक्तींचा होकार अनिवार्य असे, घरातील प्रत्येक व्यक्तीला नकार देण्याचा अधिकार असे;

मग कधीकधी हतबल झालेल्या व्यक्ती कौटुंबिक सेटिंग लावतात किंवा ऑर्थोडॉक्स ज्यूंमध्ये शिद्दूच प्रथेप्रमाणे लग्नापूर्वी सारे नातलग परस्परांना जाणून घेतात त्याप्रमाणेच सारेच भेट घेत असत! या विवाह पद्धतीशिवाय नवदाम्पत्याने स्वतः निवडलेली जोडीदाराशी सरळ विवाह सोहळाही चालत असे, इथे वर वधू आधी एकेमकांस पसंत करत, नव्या नात्यास संमती देत. त्यानंतर त्यांचे पालक संमती देत असत, गरज पडल्यास कधीकधी पालक नकारदेखील देत असत!

याही व्यतिरिक्त स्वायत्त वा स्वावलंबित विवाह हाही पर्याय नंतर ठामपणे समोर आला. इथे वरवधू शिवाय कुणाचीही मर्जी ध्यानात घेतली जात नाही! इव्हन पालकांशी सल्लामसलत देखील केली जात नाही अथवा लग्नाविषयी त्यांना विश्वासात घेतले जात नाही. अलीकडील आधुनिक इतिहासातील बहुतेक विवाह हे प्रौढत्व आल्यानंतरच्या परस्पर सहमतीने केले जाणारे विवाह आणि स्वायत्त विवाह यांच्या दरम्यानच कुठेतरी रेंगाळत आहेत. संस्कृती अभ्यासकांनी 142 संस्कृतींचा अभ्यास केल्यानंतर, 130 संस्कृतींच्या केंद्रस्थानी विवाह हा घटक असल्याचे मत नोंदवले आहे. यावरून सांस्कृतिक जडणघडणीतले विवाहाचे महत्व लक्षात यावे.

एकीकडे असे बदल होत असताना काही समाजांमध्ये, विशेषतः बारा वर्षांखालील मुलींच्या बालविवाहांमध्ये सक्तीच्या विवाहाची अत्यंत उदाहरणे आढळून आली आहेत. पाकिस्तानच्या काही आदिवासी/ग्रामीण भागात आणि 1970 च्या दशकापूर्वी तैवानमध्ये ही पद्धत अगदी जोमात होती!

याखेरीज आणखीही काही विवाह पद्धती अस्तित्वात होत्या. अ‍ॅरेंज्ड एक्सोगॅमस मॅरेज हा एक असा विवाह होता जिथे तृतीय पक्ष त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गटाचा विचार न करता वधू आणि वर शोधत असे आणि निवड करून शिक्कामोर्तब करे. 

तर अ‍ॅरेंज्ड एंडोगॅमस मॅरेज या विवाहपद्धतीत तृतीय पक्ष एका विशिष्ट सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गटातून वधू आणि वर शोधतो आणि निवडतो.

नॉन-कॉन्ग्युनियस अरेंज्ड मॅरेज म्हणजे वधू वर हे पालकांखेरीज, आजी-आजोबा किंवा हयात असलेल्या त्यांच्या पूर्वजांशिवाय इतरांना सामील करत नाहीत. हिंदू आणि बौद्ध दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ख्रिश्चन लॅटिन अमेरिका आणि उप-सहारा आफ्रिकेत या प्रकारचे विवाह कॉमन आहेत.

एकसंध वा कुटुंबाअंतर्गत केले जाणारे विवाह युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील अनेक देश एकसंध कुटुंब विवाह कायद्याच्या विरोधात आहेत. युनायटेड किंग्डम मध्ये काका-भाचीचे विवाह अनाचार मानले जातात आणि बेकायदेशीर आहेत, परंतु चुलत भाऊ अथवा बहीण विवाह निषिद्ध नाहीत, जरी आरोग्याच्या चिंतेमुळे प्रथम-चुलत भावाच्या विवाहांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही इस्लामिक देशांमध्ये आणि मुस्लीम देशांतून जगाच्या इतर भागांत स्थलांतरित झालेल्यांमध्ये एकसंध (कुटुंबाअंतर्गत) विवाह सामान्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्राधान्य दिलेले असले तरी, बहुतेक ख्रिश्चन, हिंदू आणि बौद्ध समाजांमध्ये ते सांस्कृतिकदृष्ट्या निषिद्ध मानले जातात. 

विसाव्या शतकापूर्वी ज्यू समुदायांमध्ये असे विवाह कॉमन होते, परंतु आधुनिक काळात ते दहा टक्केही उरले नाहीत. चुलतभावाचे विवाह , काका-भाचीचे विवाह, दुस-या चुलतभावाचे विवाह इत्यादीत आपसात जुळवले जाणारे हे विवाह हे प्रथम जन्मलेल्या चुलत भाऊ अथवा बहीण यांचे विवाह असत, त्यानंतर दुसरे जन्मलेले चुलत भाऊ आणि काका-भाचीचे विवाह असत.

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील सर्व विवाहांपैकी 25 ते 40% विवाह हे थोरले चुलत भाऊ अथवा बहीण यांचे विवाह आहेत; उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील विविध क्षेत्रांमध्ये अशा विवाहाचे प्रमाण 65 ते 80% पेक्षा जास्त आहे. वरील सर्व प्रकारच्या विवाहांमध्ये वधू आणि वरांना सहसा संमती देण्याचा अधिकार असतो; जर वधू किंवा वर किंवा दोघांना संमतीचा अधिकार नसेल तर त्याला सक्तीचा विवाह म्हणतात. बळजबरीने केलेले विवाह हे अरेंज्ड मॅरेजसारखे नसतात; या सक्तीच्या व्यवस्थेला दोन्ही पक्षांची पूर्ण आणि मुक्त संमती नाही आणि कोणताही मोठा जागतिक धर्म सक्तीच्या विवाहाचे समर्थन करत नाही. असे विवाह सामान्यतः धर्माच्या भ्रष्ट लघुरूपाशी संबंधित असतात;

इथियोपियामधील मुर्सी ट्राईबमधल्या महिला लग्नाळू मुलांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळीच परंपरा पाळतात. इथिओपियामधील मुर्सी ट्राइब शहरांपासून दूर राहणारी जमात आहे. मुलींचे लटकलेले ओठ त्यांना अधिक सुंदर बनवतात आणि जितके ओठ अधिक लांब तितका मुलगा अशा मुलींकडे अधिक आकर्षित होतो असे यांच्यात मानले जाते. परिणामी मुली आपल्या ओठांना अधिक मोठे कसे करता येईल याकडे लक्ष देतात. इतकंच नाही तर या ठिकाणी मुलंही ओठ लटकविण्यासाठी खास प्रयत्न करताना दिसतात. ओठांना लटकविण्याची ही प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असून मुलगा असो वा मुलगी दोघेही ओठांमध्ये एक मोठी डिस्क लावतात आणि त्यानंतर ओठ मोठे होण्यासाठी अनेकदा ही प्रक्रिया करतात. यामध्ये त्यांना कितीही त्रास झाला तरीही ते सहन करतात. याशिवाय लग्न करण्यापूर्वी त्या मुलीसाठी इच्छूक मुलांमध्ये लढाई लावण्यात येते. या भांडणामध्ये जो मुलगा जिंकतो त्याच्याशी मुलीचे लग्न लावण्यात येते.

अशीच एक वेगळी सभ्य परंपरा मेनॉमिनी लोकांत आढळते. द मेनोमिनी हे संघराज्य सध्याच्या विस्कॉन्सिन आणि मिशिगनच्या वरच्या द्वीपकल्पातील भूभागात विस्तारले आहे. यामध्ये मेनोमिनी जमातीचे मिलियन लोक आहेत. पारंपारिक मेनॉमिनी अध्यात्मिक संस्कृतीत यौवनावस्थेतील तरुणांसाठी सामाजिक कसोटी उत्तीर्ण होण्याचे संस्कार महत्वाचे मानले गेलेत.

समारंभांमध्ये अनेक दिवस उपवास करणे आणि एका लहान विग्वाममध्ये राहणे या गोष्टी त्यात समाविष्ट आहेत. यौवन संक्रमणाचा एक भाग म्हणून, तरुण त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी आणि विवाह विधींचे पालन करताना ते कोणत्या परिपक्व जबाबदाऱ्या स्वीकारू शकतील याची माहिती मिळवण्यासाठी वडिलांना वैयक्तिकरित्या भेटतात. मगच त्यांना विवाहयोग्य मानले जाते! ही परंपरा खूप बोलकी नि वेगळी आहे!

समकालीन सभ्यतेमध्ये जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाह निषिद्ध असताना, पूर्वीच्या समाजात ते सहज होत असत. इजिप्तचे प्राचीन देव इसिस आणि ओसिरिस हे भाऊ आणि बहीण होते, या शाही जोडप्याचे उदाहरण महत्वाचे आहे. फारोने त्यांच्या बहिणींशी लग्न केले. हिब्रू कुलपिता अब्राहमने आपल्या सावत्र बहिणीला पत्नी म्हणून घेतले आणि अब्राहमचा पुतण्या लॉट याने त्याच्या स्वतःच्या मुलींसोबत संबंध ठेवले.

बहुपत्नीत्व दोन प्रकरचे असे - एक पुरुष आणि अनेक स्त्रिया किंवा एक स्त्री आणि अनेक पुरुष यांचा विवाह, आधुनिक सभ्यतेमध्ये निषिद्ध आहे, परंतु तरीही जवळजवळ प्रत्येक राष्ट्रात असे धार्मिक गट आहेत जे अशा देवतेची पूजा करतात जी बहुविवाहांना मान्यता देते असे मानले जाते.

प्रत्येक आधुनिक संस्कृतीच्या इतिहासात राजे, खलीफा, सम्राट आणि कुलपिता यांच्या अनेक बायका होत्या असे आढळते. ज्ञानी राजा मानला जाणारा आणि जगातील काही महान प्रेम कविता लिहिण्याचे श्रेय दिले जाणारा किंग सॉलोमन याला तर चक्क 700 बायका आणि 300 उपपत्नी होत्या!

वेल्समधील प्रथेनुसार वधूच्या नातेवाईकांनी ती चर्चच्या दारात पोहोचल्यावर तिला पकडून तिच्यासोबत पळून जावे लागते, वधू आणि त्याच्या पक्षाला त्याचा पाठलाग करण्यास भाग पाडले जाते. चोरीला गेलेली वधू पुन्हा ताब्यात घेतल्यावर तिला लगेच वराच्या स्वाधीन केले जाते. या परंपरेतून निर्माण झालेली एक लोकप्रिय अंधश्रद्धा अशी आहे की वराच्या मित्रांपैकी जो कोणी तिला पकडेल त्याचे वर्षभरात लग्न होईल.

खरेदीद्वारे विवाह हा विवाहसंस्थेच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा होता. पूर्वीच्या काळी जेव्हा एखाद्या गावातून दुस-या टोळीतील पुरुषांकडून वधू चोरली जात असे, तेव्हा पकडलेल्या स्त्रीच्या कुळातील सदस्य त्यांच्या नुकसानाचा बदला घेण्यासाठी बाहेर पडत.

कदाचित शतकानुशतके अशा हिंसक प्रतिशोधानंतर, काही अज्ञात ज्ञानी पुरुष किंवा स्त्रीने असे सुचवले असावे की, लढाई आणि लोकांना ठार मारण्याऐवजी, वराकडून चोरलेल्या मुलीच्या पालकांना भरपाई का देऊ नये? कदाचित आणखी काही शतके उलटून गेल्यानंतर, दुसर्‍या एका सुज्ञ पुरुषाने किंवा स्त्रीने सुचवले असावे की संभाव्य वराने वधूचे अपहरण करण्याच्या सर्व प्रयत्नांना भीक न घालता वधूची खरेदी करावी.

परिणामी ज्यू आणि अरब मूळ अमेरिकन जमातींमध्ये एक सुंदर मुलगी ही मौल्यवान मालमत्ता बनली. नंतरच्या वर्षांत वधू खरेदीच्या विवाह पद्धतीतील मतभेदाने युरोपमधील सरंजामशाही राज्ये एकत्र केली. कदाचित वधू विकत घेण्यापेक्षाही अधिक प्रचलित प्रथा अशी होती की वराने तिच्या वडिलांसाठी विशिष्ट कालावधीसाठी काम करून पत्नी मिळवावी! आपल्याकडे काही सिनेमात अशी कथा असते, नाही का!

अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील अनेक आरंभीच्या समाजांमध्ये आणि जमातींमध्ये कामगारांच्या मदतीसाठी बहुमोल मुलीची अशी देवाणघेवाण प्रचलित होती. सुरुवातीच्या लोकांमध्ये, वराकडून आईवडिलांना मौल्यवान भेटवस्तू आर्थिक मोबदल्याऐवजी दिल्या जात होत्या. जपानमध्ये, ज्या तरुणीशी तो लग्न करू इच्छितो त्या तरुणीच्या पालकांना आधी ठरवून दिलेल्या काही भेटवस्तू पाठवण्याची प्रथा होती. भेटवस्तू स्वीकारल्या गेल्यास, लग्नाच्या करारावर चर्चा करण्यासाठी वाटाघाटीस हिरवा कंदील मानला जाई! अनेक नेटिव्ह अमेरिकन जमातींमधील संभाव्य वराने आपल्या वधूसाठी घोड्यांची देवाणघेवाण केली. आफ्रिकन जमातींमधील वडिलांनी आपल्या मुलींसाठी गुरेढोरे बदलणे योग्य मानले.

खरे तर लग्न हा शब्द त्या काळातील आहे जेव्हा पुरुषांनी त्यांच्या बायका विकत घेतल्या. लग्न म्हणजे पैसे, घोडे किंवा गुरेढोरे जे वराने आपल्या तिला स्वीकारण्याच्या बदल्यात वचन म्हणून वधूला तिच्या वडिलांना दिले होते . लग्नापासूनच वधूला तिच्या भावी आयुष्यात सुरक्षा प्रदान करण्याचे वचन देणार्‍या पुरुषाकडे तिला गहाण ठेवण्याची कल्पना यातून समोर येते. .

व्यभिचार, विवाहित व्यक्तीकडून विश्वासघाताची कृती अजूनही सार्वत्रिक निषिद्ध मानली जाते. जगभरात यासाठी विविध सजा फर्मावल्या जात असत. मोशेच्या संहितेने या कृत्यात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना दगडाने ठेचून ठार मारण्याचा निषेध केला. हिंदू धार्मिक पुराणांत पुरुष आणि स्त्री दोघांनाही त्यांच्या जातीनुसार अपमानित, विकृत किंवा मारण्याचा आदेश दिलेत.

प्राचीन इजिप्तमध्ये, पुरुष गुन्हेगाराला कास्ट्रेट केले जात असे आणि स्त्रीचे नाक कापले जात असे. प्राचीन ग्रीसमध्ये , दोषी जोडीला घोड्यांमागे ओढून किंवा उपाशी ठेवून मारले जाऊ शकते. ग्रीक संस्कृती जसजशी परिपक्व होत गेली तसतसे व्यभिचाऱ्याना क्वचितच मारले जात असे, परंतु त्यांना सर्व सार्वजनिक विशेषाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते आणि काहीवेळा त्यांचा अपराध इतरांद्वारे सहज दिसून येण्यासाठी ते लोकरीने डोके ते पायापर्यंत झाकले जात होते.

जुन्या स्कॅन्डिनेव्हियामधील कायद्याने नाराज झालेल्या पतीला आपल्या पत्नीच्या प्रियकराचा वध करण्याची आणि त्याच्या जोडीदाराची हत्या करण्याची परवानगी दिली. हे भयंकरच होते! 

जरी जगभरातील अनेक समाजांमध्ये व्यभिचारकर्त्यांशी अजूनही कठोरपणे वागले जात असले तरी, बहुतेक पाश्चात्य राष्ट्रांमध्ये या कृतीला बऱ्यापैकी सहिष्णुतेने पाहिले जाते. जे पुरुष आणि स्त्रिया आपल्या जोडीदाराशी विश्वासघात करतात त्यांना लोकांकडून क्वचितच बहिष्कृत केले जाते आणि जोडीदारांपैकी एकाने व्यभिचार करणे हे तिथे घटस्फोटाचे महत्वाचे कारण मानले जात नाही.

हे झाले विवाह रिवाजांचे! विवाह सोहळ्यांच्याही भिन्न परंपरा आहेत. बहुतेक ख्रिश्चन विवाह समारंभांमध्ये, वधू आणि वर एकमेकांच्या डाव्या हाताच्या अंगठीवर लग्नाचा बँड ठेवतात आणि फादर परस्परअनुमती वाचून दाखवतात. लग्नाच्या प्रतिज्ञा सांगतात. देवाला त्यांना आशीर्वाद देण्याची विनंती करतात आणि मृत्यूने त्यांचे विभाजन होईपर्यंत त्यांना एकमेकांसोबत राहण्यास मदत करण्याची विनवणी करतात, नंतर त्यांना पती आणि पत्नी म्हणून संबोधतात. काही संप्रदायांमध्ये, नवविवाहित जोडप्याने त्यांचे प्रण सांगितल्यानंतर, ते दोघे उभयता आणि जमलेले पाहुणे एकत्रितपणे सामूहिक किंवा पवित्र सहभागिता साजरा करतात.लग्न समारंभानंतर, नवविवाहित जोडपे चर्चमधून बाहेर पडते, पाहुणे त्यांच्यावर तांदूळ किंवा कॉन्फेटीचे तुकडे टाकतात. चर्चच्या बेसमेंटमध्ये किंवा हॉलमध्ये जिथे रिसेप्शनच्या ठिकाणी आमंत्रित अतिथींना रात्रीचे जेवण दिले जाते आणि नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू दिल्या जातात.

यहुदी विवाह नेहमीच मोठ्या उत्सवाचे कार्यक्रम असतात आणि सहसा रविवारी केले जातात. लग्नाच्या आधी शब्बाथ दिवशी , वराने सभास्थानात जाऊन तोराह वाचन करावे लागते. इतर परंपरेप्रमाणे, वधू पांढर्‍या गाउनमध्ये असते आणि वर तिच्या बाजूला गडद सूट घालून उभा राहतो. जोडप्याचे पालक जवळच उभे असतात आणि वरातीप्रमाणे एक वराचा गट रब्बी(मौलवी)समोर उभा असतो ज्याला चुप्पा म्हणून ओळखले जाते, वधूच्या भावी घराचे ते प्रतिनिधित्व करतात.

रब्बी जोडप्याला आशीर्वाद मिळालेला वाइनचा ग्लास देतो. वधू आणि वर वाइन शेअर केल्यानंतर, रब्बी आणि वर लग्नाचा करार वाचतात. वाचन पूर्ण झाल्यावर, वर आपल्या वधूच्या डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर एक साधी सोन्याची अंगठी ठेवतो आणि सभास्थानात जमलेल्या सर्वांना ती त्याची पत्नी असल्याचे घोषित करतो. अशी घोषणा केल्यानंतर, तो लग्नाची अंगठी तिसऱ्या बोटात सरकावतो.

या जोडप्याला वाइनचा दुसरा ग्लास दिला जातो. रब्बी सात आशीर्वाद म्हणतो आणि विवाहासाठी देवाची स्तुती करतो आणि नवविवाहित जोडप्याला आनंदी राहण्याची विनंती करतो. दोघांनी ते प्यायल्यानंतर, वराच्या टाचेखाली ग्लास फोडला जातो. काच फोडणे हे जेरुसलेममधील मंदिराच्या नाशाची आठवण करून देते. वधू आणि वर आनंदात आणि प्रेमात सामील होतील याचे प्रतीक म्हणून काच फोडली जाते!

बौद्ध विवाह होण्यापूर्वी, बौद्ध भिक्खूने संभाव्य वधू-वरांची जोडी सुसंगत असल्याची खात्री करतात. नवदांपत्य आयुष्यभर एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांशी जुळवून घेण्यास सक्षम असेल तर परिणय समारंभासाठीचा सर्वोत्तम दिवस भिख्खू ठरवतात.

हिंदू विवाह पद्धतीमध्ये अग्नीस साक्षी मानून सात फेरे घेतले जातात, यावेळी जोडप्याच्या कल्याणासाठी वैदिक मंत्रोच्चारण केले जाते. परस्परांना पुष्पमाला घालून विवाह सोहळा संपन्न होतो. हुंडा पद्धत कायद्याने अवैध ठरवली असली तरीही अजूनही छुप्या पद्धतीने हुंडा देवाणघेवाण सुरु असल्याचे आढळते. हिंदू विवाह मंदिरात वा मंगल कार्यालयात अथवा हॉलमध्ये प्रामुख्याने केले जातात. वर वधू पारंपरिक हिंदू वेशभूषेत असतात.

बहुतेक पारंपारिक मुस्लिम विवाह पालकांद्वारे आयोजित केले जातात, अलीकडील काळात मुलांना त्यांच्या जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार दिला जातोय. तरीही बरेच मुस्लिम अजूनही खुले प्रेमसंबंध अवांछनीय मानतात आणि अरेंज्ड निकाहच नैतिकदृष्ट्या स्वीकारार्ध मानतात. मुलांनी इस्लामच्या श्रद्धेनुसार लग्न करावे असा आग्रह असतो. वधूस मेहरची (दहेज) देवाणघेवाण, वधू-मूल्याची प्राचीन प्रथा, बहुतेक मुस्लिम कुटुंबांमध्ये पाळली जाते. मेहरची (वधूस द्यावयाच्या हुंड्याची) रक्कम पक्की झाली कि ती रक्कम वधूची मालमत्ता बनते. निकाह सहसा खाजगी घरांमध्ये किंवा मशिदीच्या इबादतखान्यात केला जातो. काजी दांपत्याची रजामंदी विचारतात.

विवाहाच्या कितीही प्रथा परंपरा असोत वा विवाह करण्याच्याही भिन्न प्रथा असोत, वर आणि वधू यांच्यामध्ये प्रेम असले पाहिजे, आपसी सामंजस्य असले पाहिजे याकडे लक्ष देणे अनेकार्थाने गरजेचे आहे कारण अलीकडील काळात मोठ्या संख्येने लग्ने मोडताना दिसत आहेत. लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यात घटस्फोटाची भाषा सुरु होऊ लागलीय. लग्न टिकली नाहीत तर कुटुंबव्यवस्था टिकणार नाही, मग सामाजिक मूल्ये ढासळतील आणि कथित दृष्ट्या अनैतिकतेला पुढावा मिळेल. नाती संपुष्टात येतील आणि केवळ लैंगिक जीवन उरेल. वर वधू यांच्यात मानसिक वैचारिक सामंजस्य असणे, स्नेह आदर भावना असणे आणि दोहोंच्या कुटुंबाबद्दल परस्परांना आस्था असणे या मुद्द्यांना महत्व दिलं पाहिजे. 

केवळ कुटुंबाच्या गरजा म्हणून वा आर्थिक सामाजिक तडजोड म्हणून विवाह लावणे त्या दोन्ही जिवांची फसवणूक केल्यासारखे आहे. लग्न हे दोन दोन जिवांचे आत्मीय मिलन ठरले पाहिजे ही अपेक्षा अतिशयोक्तीची ठरत असली तरी निदान त्याच्या आसपास पोहोचू शकेल अशी जोडीदार निवड केली जावी याला प्राधान्य असले पाहिजे. विवाह हा मानवी नात्यांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे, त्याला व्यवहार वा तडजोड वा निव्वळ गरजपूर्ती या दृष्टिकोनाने पाहणे चुकीचे आहे याचे समाजभान सर्वांनां आलं पाहिजे तरच या विवाह सोहळ्यांना आणि रिवाजांना अर्थ राहील! त्यासाठी अंतःकरणापासूनचे विवाह झाले पाहिजेत!! तशा विवाह प्रथांची प्रतीक्षा राहील..

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा