मंगळवार, २९ मार्च, २०२२

हाँगकाँगला काय झालेय ?


'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. ‘नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन’, ‘क्वार्ट्झ’ आणि ‘गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह’ ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकतंच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना विकलीय. तेंव्हापासून तर यातील निर्भीड आणि लोककल्याणकारक भूमिकेस धार आलीय. यातील हाँगकाँगविषयीच्या आर्टिकलने चीनमध्ये मोठी खळबळ माजवून दिली. याद्वारे तिथे सर्व काही आलबेल असल्याच्या चिन्यांच्या दाव्याच्या पार ठिकऱ्या उडाल्या. टिमोथी मॅक्लॉफ्लिन हे ऍटलांटिकसाठी लेखन संशोधन करतात त्यांनी हे आर्टिकल लिहिले आहे. मागील तीन आठवड्यात हाँगकाँगमध्ये काय घडलंय याचं हृदयद्रावक चित्र त्यांनी जगापुढे आणलं.

फेब्रुवारी संपला आणि हाँगकाँगचे दिवस फिरले. कोरोना व्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हाँगकाँगमधली खेळाची मैदाने दक्षतेचा इशारा करणाऱ्या लाल-पांढऱ्या टेपमध्ये गुंडाळली गेली, मुलांना इथे येण्यास मज्जाव करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंपणाने बॅरिकेड उभारण्यात आले. कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने मनोरंजनाचे कसलेही कार्यक्रम होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी स्विंग क्रॉसबार वापरण्यात आले. संभाव्य लॉकडाऊनबद्दल सरकारच्या विनाशकारी सार्वजनिक संदेशामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट उडून प्रचंड खरेदी केली गेली. सर्व रेस्टॉरंट्स संध्याकाळी 6 वाजता बंद होत होती. बार अजिबात उघडले जात नव्हते. काही रेस्टॉरंट्स हॅप्पी-अवर डील ऑफर करत होती. जिम, चित्रपटगृहे, कॅम्पसाइट्स आणि समुद्रकिनारे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. देशातील एखाद्या दुर्गम उद्यानात फिरायला जायचे असल्यास सर्व नियमांचे कठोर पालन अनिवार्य होते. 2020 च्या सुरुवातीला हाँगकाँग कोविड लाटेत संक्रमण दरात मागे होते मात्र चौथ्या लाटेतील रहस्यमय विषाणूची बातमी येताच मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन सुरु झाले तरीदेखील अघटीत घडलेच !

या काळात इस्पितळे आजारी रूग्णांनी भरून वाहत होती. मृतांच्या क्रियाकर्माची गती न राखल्यामुळे शवागरांत जागा मिळेपर्यंत रूग्णालयांमध्ये उपचाराधीन असलेल्या रूग्णांसह शरीराच्या पिशव्यांचा ढीग वाढताच राहिला. मागणी पूर्ण करण्यासाठी मृत्यूआधीच शवपेट्या पाठवल्या जात होत्या. इथल्या मुख्य भूभागाच्या सीमेवर युद्धकाळातील फील्ड हॉस्पिटलसारखे दिसणारे जंबो युनिट उभारण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले गेले. मार्चच्या मध्यास 300,000 लोक एकल वा होम क्वारंटाईनमध्ये होते. विशेष बाब म्हणजे जानेवारी 2020 ते 2022 च्या सुरुवातीपर्यंत केवळ 213 मृत्यू आणि कोविड-19 ची फक्त 13,000 प्रकरणे नोंदवल्यानंतर, सध्याच्या कोविडलाटेने हॉंगकॉंगला चक्रावून टाकले. जानेवारीच्या अखेर पासून मिडमार्चपर्यंत 960,000 हून अधिक प्रकरणे आणि 4,600 हून अधिक मृत्यू झाले.

प्रारंभकाळात शून्य-COVID धोरणान्वये कोरोनासाथीचा प्रसार नियंत्रित केल्याबद्दल हाँगकाँगचे कौतुक केले गेले. त्यात लसीकरणाचा फारसा वाटा नव्हता. आजघडीला सर्वात गरीब लोकांना लसीचा आधार देण्यासाठी पुरेशी गंगाजळी देशापाशी आहे. हाताबाहेर जाणाऱ्या विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील सर्वात मुलभूत नि फायदेशीर अशा पर्यटन क्षेत्रासह त्याच्याशी निगडीत अर्थव्यवस्थेचा काही भाग प्रभावीपणे बंद केला गेलाय. तरीही या महिन्यात जगातील सर्वाधिक कोविड मृत्यू दर इथे नोंदवला गेला असे नेमके काय घडले ? हा काही गहन प्रश्न नाहीये. हाँगकाँगने महामारी सुरू झाल्यापासून शून्य-कोविड रणनीती वापरली होती ती मागील त्रैमासिकात ढिली पडली होती. मुख्य भूप्रदेश चीनमध्ये कोविडनीती म्हणून संपूर्ण महानगरे बंद करण्याची आणि केवळ मूठभर कोविड प्रकरणांपायी तिथली अख्खी लोकसंख्या तपासली जात होती. इथे तितकी कठोर प्रतिबंधात्मकता उरली नव्हती. संक्रमण रोखण्यासाठी व ट्रान्समिशन लाइन ब्रेकअप करण्यासाठी आक्रमक चाचणी आणि ट्रेस प्रोग्राम केवळ कागदावरच उरले होते, तसेच कठोर सीमा नियंत्रणेही नव्हती. याच उपायांची आणि फिजिकल डिस्टन्सिंगची टोकदार अंमलबजावणी केल्याने हाँगकाँगला साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लस उपलब्ध नसतानाही मृत्यूदर कमीत कमी ठेवण्यास मदत झाली होती.

मात्र अलिकडील कोविड काळात हाँगकाँगच्या असंख्य धोरणात्मक चुका आहेत, त्यातल्या सर्वात वाईट गोष्टी इथल्या लोकसंख्येला लसीकरण करण्याच्या एकल अक्षमतेशी संबंधित आहेत. इथल्या सरकारचे प्रयत्न सुरुवातीपासूनच राजकारणाने बरबटलेले होते आणि चुकीच्या माहितीमुळे ते घटत गेले होते. इथे सुरुवातीस चीननिर्मित सिनोव्हॅक लसीला मंजुरी मिळाली होती. त्यास नाकारत हाँगकाँगमधल्या नेत्यांनी एक चांगला पर्याय म्हणून बायोटेकचे mRNA जॅब उपलब्ध असल्याचे दाखवले. खेरीज त्याचा वापर करून लसीकरण केल्याचे दाखवले. सद्यकाळात हाँगकाँगमधले बहुसंख्य मृत्यू हे लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये झाले आहेत, परंतु लसीकरणानंतरही मरण पावलेल्यांना कोणती लस दिली गेली याचा डेटा उघड करण्यास अधिकारी नकार देताहेत. शिवाय अगदी त्रोटक संदर्भासह लसीचे प्रतिकूल परिणाम प्रसारमाध्यमांद्वारे दाखवले ​​गेले. 2019 मधील लोकशाही निषेधाच्या हाताळणीपासून इथल्या लोकांच्या मनात सरकारवरील अविश्वास कोविड लसीबाबतीत प्रखर संशयाकडे नेणारा ठरला. सर्वात त्रासदायक म्हणजे हाँगकाँगच्या वृद्ध लोकांमधला लसीकरणाचा अत्यल्प दर ! मार्चच्या मध्यावधीपर्यंत 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या फक्त 55 टक्के लोकांना लशीची एक मात्रा मिळालीय आणि केवळ 36 टक्के वृद्धांना दोन लसमात्रा मिळाल्यात. लसीकरणासाठी रुग्णांना सल्ला देण्यासाठी फॅमिली डॉक्टरांवर सरकारचा लवकर अवलंबून राहण्याची चूक सरकारने केली. अनेकांनी वृद्धांना लस घेण्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला असूनही त्याकडे कानाडोळा केला गेला. एका अंदाजानुसार कोविड संक्रमण केअर होम्समध्ये मोठ्या प्रमाणात फैलावले आहे, चौथ्या लाटेत 29,000 हून अधिक केअर-होममधील वृद्ध रहिवाशांना संसर्ग झाला आहे. आता सरकारने जागं होऊन गतिशीलतेच्या समस्या असलेल्या वृद्ध रहिवाशांसाठी घरी लसीकरणाची ऑफर दिली आहे. याची अंमलबजावणी आता सुरू झालीय. मात्र वृद्धांची अफाट संख्या पाहू जाता त्याला दोन महिन्यांहून अधिक काळ लागू शकतो, सुरुवातीला लस रोलआउट सुरू झाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेलेल्या वृद्धांना दोन मात्रेचे लसीकरण कसं करायचं याविषयी हाँगकाँगमध्ये संभ्रम आहे.

आता हाँगकाँगमध्ये येणाऱ्या सर्वांसाठी 21-दिवसीय हॉटेल क्वारंटाईन आवश्यक आहे, अगदी कोविड नसलेल्यांसाठीही हे एकत्रित रित्या अनिवार्य केल्याने तिथे क्रॉस इन्फेक्शन आणि प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या सरकारी अनुदानित अभ्यासात लस संकोचत्वा विषयी चेतावणी दिली होती, परंतु आरोग्य अधिका-यांनी घोषणाबाजी आणि पोस्टर ड्राइव्ह यापलीकडे काही केले नाही. त्यातच भरीस भर म्हणजे चाचणी आणि अलग ठेवण्याच्या सुविधा आधीच ओव्हरलोड असतानाही सरकारने सरसकट सर्वच रहिवाशांना अनिवार्य चाचणी नोटीस जारी करण्याचा चंग बांधला. ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अधिक ताण पडत गेला. एप्रिल महिन्यापर्यंत युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटनसह देशांवरील उड्डाण बंदी लागू असणार आहे, तरीही सरकारचे स्वतःचे सल्लागार म्हणतात की ही बंदी जारी ठेवण्याचे कोणतेही कारण नाही ! हा सर्व राजकीय आर्थिक सामाजिक गोंधळाचा परिपाक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सत्तेच्या ठेकेदारांनी कठोर आणि उचित निर्णय घेणाऱ्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, त्याऐवजी राजकारण आणि बीजिंगप्रतीची निष्ठा दाखवण्यासाठी अतिउत्साही भोंगळ प्रयत्न केले. याचा परिणाम म्हणजे हाँगकाँगची आताची लाजिरवाणी अवस्था होय. सुरुवातीला सहजी टाळता येण्याजोगी असलेली मात्र आता व्यापक खोलवर पसरलेली सार्वजनिक आरोग्य आपत्ती इथे निर्माण झाली आहे. इथल्या प्रशासनाचे आणखी एक स्पष्ट अपयश म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील आपत्तीजनक अयोग्यता होय.

बहुतेक जगाने साथीच्या रोगाच्या विविध टप्प्यांशी झुंज दिली आहे. चौथ्या लाटेच्या बाबतीत हाँगकाँगच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत कारण सार्वजनिक-आरोग्यविषयक निर्णयांचे पुनरावलोकन करण्यासाठी व सरकारवर त्याचे खापर फोडण्यासाठी इथली पूर्वीची मर्यादित लोकशाही जबाबदारीही आता अस्तित्वात नाही. बीजिंग द्वारे क्रॅकडाउन आणि कठोर राष्ट्रीय-सुरक्षा कायदा लादले जात असल्याने त्याचे दडपण इथे सातत्याने अनुभवास येते. कोविडच्या चुकीच्या हाताळणीने हाँगकाँगच्या आरोग्य व्यवस्थेची पुनर्निर्मिती करताना जीवनाच्या सर्व पैलूंना कसा स्पर्श केला जाईल हे पाहणे रंजक ठरेल. हाँगकाँगला एकाच वेळीस दोन पातळयांवर लढायचे आहे एक कोविड आणि दुसरं चीनी दांडगाई ! देशांतर्गत घरभेदी आणि टोकाला गेलेला राष्ट्रवाद, विरोधाचे खुंटत चाललेले मार्ग आणि लोकांमधला विविध स्तरांवरला वाढता संभ्रम, जोडीला वाढते कोविड संक्रमण दर या सर्व घटकांमुळे इथे कमालीची अस्वस्थता आहे आणि कदाचित यातूनच हाँगकाँगच्या ताटात नवे संकट येण्याची चिन्हे आहेत. ज्या ज्या प्रांतांनी देशांनी कोविड संपुष्टात आला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली वा जिथे जिथे वयस्कर लोकांच्या लसीकरणाची सक्ती राबवली गेली नाही त्यांच्यासाठी हाँगकाँग हा आदर्श पाठ ठरावा. आताच याकडे अभ्यासपूर्वक दृष्टीकोनाने पाहिले नाही तर बत्तीस वर्षानंतर व्हॉटसएपवर ही माहिती आल्यानंतर काहीज्न म्हणतील की हे सत्य आमच्यापासून लपवून ठेवले होते !

 - समीर गायकवाड 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा