बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...




देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक करुण कथा.
आपल्या वासना आपल्या इच्छापूर्ती करताना कोण, किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा अंदाज लावता येत नाही. ही बाब सर्वत्र लागू पडते, रेड लाईट एरियात जास्ती लागू होते. देशभरातील मेट्रो सिटीजमध्ये रेड लाईट एरिया पूर्वी एकाच जागी सेन्ट्रलाईज्ड होता हळूहळू शहरे मोठी होत गेली आणि या बायका डिस्पर्स होत गेल्या. त्यानंतर मोठी शहरे आणि मध्यम शहरे या बायकाची शोषणकेंद्रे बनली. आता तालुक्याची ठिकाणे आणि छोट्या छोट्या खेड्यात देखील अशा बायकांची एखादी गल्ली वा एकदोन घरे दिसू लागलीत. रहदारीचे हायवेज आणि रेल्वे जंक्शननजीकची ठिकाणे, आडमार्गावरचे ढाबे देखील या बायकांना 'पाळून' असतात. आपल्या तमाम भारतीय स्त्रीपुरुषांच्या मेंदूच्या गटारात गोऱ्या कातडीचे किडे वळवळत असतात त्याचे कराल प्रतिबिंब सर्व रेड लाईट एरियात दिसून येते. कोणत्याही वयोगटातील डांबरासारख्या काळ्याकुट्ट रंगाचे, विद्रूप, बेडौल, वाणमारे आणि दर्पयुक्त देहाचे पुरुष गोरी लुसलुशीत बाई हुडकत फिरत असतात.

८० च्या दशकापासून या वर्णाधाशी मनोवृत्तीचा फायदा घेत नेपाळ आणि पूर्वोत्तर भारतातील बायकापोरी वॅगनभरून देशभरात आणल्या जाऊ लागल्या. यांच्या रंगाला आणि मांसल देहाला बाजारात फुल्ल दाम मिळू लागले. हपापलेल्या रंगवेड्या लिंगपिसाटांची आत्मशांतीही होऊ लागली. काही लोक तर लूत लागलेल्या कुत्र्यासारखे रोज त्या त्या बाईकडे वरवा लावू लागले. या बायकांना पैसे मुबलक मिळत पण यांची निम्मी कमाई यांचे दल्ले आणि अड्डेवाली आंटी खाऊन टाकी. त्यामुळे या बायका अधिक पैशाच्या गरजेपायी कस्टमरची 'सर्वतोपरी' सर्व्हिस करत. (जी अजूनही केली जाते) यातून एखाद्या स्त्रीची जवळीक वाढली की तिला सावध केलं जाई. पण एखादी बाई जणू भोळी हरिणीच असते ती अशा कोल्हयाकुत्र्यांच्या जाळ्यात अलगद सापडते. सपना ही अशा बायकापैकी एक होती. घरच्या तंगीला कंटाळून तिच्या नवऱ्यानेच तिला इथं बाजारात उभं केलेलं. दिसायला आकर्षक, थोडीफार सुबक ठेंगणी अन गोरीपान. तिच्या देहाची लोकांना भुरळ न पडली तर नवलच. त्यातून तिच्या दारी अनेकांची येजा सुरु झाली. तिचा साधाभोळा स्वभाव तिला नडला आणि तिच्या एका गिऱ्हाईकाचा तिला इतका लळा लागला की ती आपल्या गावाकडचा नाव पत्ता सगळं काही ती देऊन बसली. काही काळाने तिच्या नवऱ्याने उचललेले पैसे फिटले, आणखी काही पैसे तिने पदरास गाठ मारून ठेवले. आणि ती गावी निघून गेली. काठमांडूजवळील नार्झामंडप या गावानजीक एका वाडीवस्तीत तिचं घर होतं. ती मुंबईतून गेल्यानंतर तिच्या देहभोगापायी कासावीस झालेलं तिचं ते गिऱ्हाईक हेलपाटे मारू लागलं. त्याने तिला इथं आणणाऱ्या दलालाच्या, आंटीच्या हातावर रोकडा टेकवला. त्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच त्याने दलालालाच सोबत घेऊन नेपाळ गाठले. सपनाचे घर गाठले. तिथं तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पैशाचे आमिष दाखवून झाले पण ती बधली नाही. तिने शरीर संबंधास नकार देताच तो तिच्यावर गुरगुरला पण काही उपयोग झाला नाही. तिच्या परतण्यामुळे तंगीत आलेल्या दलालाने आणि लैंगिक उपासमारीने कातावून गेलेल्या तिच्या गिऱ्हाईकाने तिला धडा शिकवायचे ठरवले. दोन दिवस ते तिच्या मागावर राहिले. तिसरया दिवशी त्यांनी स्थानिक नेपाळी सुपारी एक्सटोर्शनवाल्यांना सोबत घेऊन तिची आठ वर्षाची मुलगी पळवून नेली. तिला थेट काठमांडूच्या थमेलच्या रेड लाईट एरियात नेलं गेलं. तिच्यावर सर्वांनी मिळून गॅंगरेप केला. इतकं करून ते थांबले नाहीत. एव्हढा अत्याचार अन्याय करूनही ती मुलगी प्रखर विरोध करत होती म्हणून तिच्या कंबरेखालील भागात रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तिने कोलाहल करताच ते पळून गेले. भाजलेल्या अवस्थेतील त्या चिमूरडीला अनुराधा कोईराला यांच्या मैती नेपाल (माहेर नेपाळचं) या एनजीओने ताब्यात घेऊन तिच्यावर उपचार केले. बलात्काराला तोंड देणारी ती मुलगी जखमांना घाबरली. तिला त्या वेदना, ते दुःख सहन झाले नाही. तीनेक आठवड्याच्या अथक संघर्षानंतर ती मृत्यूमुखी पडली. पोलिसांनी पकडलेले आरोपी चुकीचे निघाले, त्यांच्यावर गुन्हा शाबित होऊ शकला नाही पण त्याच दलालाने त्यावेळी तिकडून येताना मधूर नावाची कोवळी मुलगी आणली जी त्याच गिऱ्हाईकाची आवड बनून राहिली. हा किस्सा कित्येक दिवस चर्चेत राहिला अन बदनाम गल्ल्यातील धुरळा खाली बसताच तिथल्या लोकांच्या विस्मरणात गेला.

आजही आपल्या देशातील सर्व रेड लाईट एरियात आढळणाऱ्या नेपाळी वेश्यांचे कुत्रा हाल होत असतात. विदेशी नागरिकत्वापासून ते चलनातील तफावतीपर्यंत आणि असाक्षरतेपासून ते असुरक्षिततेच्या भीतीतून त्यांची प्रचंड पिळवणूक होते. एक भारतीय भडवा आणि एक नेपाळी दलाल त्या अड्डेवालीला ठेवावा लागतो. शिवाय दोन तीन बायकात एक टेकू (बायकांवर विशेष नजर ठेवून त्यांना मदत करणारा नेपाळी माणूस) असतो, तोही त्यांचे लैंगिक –आर्थिक शोषण करतो. पोलिसापासून ते चिरीमिरी वाल्या बाबू लोकांपर्यंत अनेकांचे कंडशमन यांच्याकडून फुकटात करून घेतले जाते. या स्त्रियांना कोणीच वाली नसतो. त्यांना होणारी अपत्ये हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा इतकं क्लिष्ट आयुष्य ती जगतात. एक हवीहवीशी भोगवस्तू हा आपल्या लोकांचा या बायकांकडे बघण्याचा नजरिया असतो तर एक उत्पन्नाचे हक्काचे साधन हा तिच्या लोकांचा ‘नजिर’ असतो. बहुतांश नेपाळी स्त्रियांना त्यांचे आप्तेष्टच या दलदलीत ढकलून देतात हे विशेष होय. अल्पवयीन मुलींच्या या व्यवसायातील मुक्त व्यापारास नेपाळी स्त्रियांची गरिबी आणि हतबलता मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. बाईपणाची अतुलनीय किंमत देऊन त्या जेंव्हा वापरण्यायोग्य राहत नाहीत तेंव्हा त्यांचे हाल काय होतात हे लिहिण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतील... जावे त्याच्या वंशा कळे...

सोबतचा फोटो थॉमस एल. केली यांनी काढला आहे. तो कॉपीराईटने प्रोटेक्टेड आहे. ज्या क्षणात जीवनातले रंग हरवले ते त्यांनी ब्लॅक ऍण्ड व्हाईटच ठेवले. कारण जीवनाचा बेरंग झालेल्या त्या जीवनात निसर्गाने दिलेले रंग व त्यांच्या छटा त्यांना भराव्याशा वाटल्या नाहीत. थॉमस केलींनी काढलेल्या फोटोंकडे पाहून त्यांचे म्हणणे पटते. अमेरिकन फोटो ऍक्टिविस्ट म्हणून विख्यात होण्याआधी ते अमेरिकन शांतता प्रसारक स्वयंसेवक होते. याच कामादरम्यान ते नेपाळ भेटीवर आले आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले. या देशात सूर्य मावळल्यावर जे काही घडते ते पाहून केली चक्रावून गेले. त्यांनी आपलं कार्यक्षेत्रच बदललं. त्यांनी कॅमेऱ्याला आपलं शस्त्र बनवलं. शोषित महिला, ह्युमनट्रॅफिकिंग, अनवॉंटेड प्रेगनन्सी, ड्रग ऍब्युज, सेक्स ऍब्युज - हरासमेंट, चाईल्ड ऍब्युज यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांनी नेपाळ आणि दक्षिण आशियावर विशेष लक्ष केंद्रित केलं. ‘मैती नेपाल’साठी प्रोजेक्ट करताना ही दुर्दैवी मुलगी त्यांच्या नजरेस पडली आणि त्यांच्या काळजाचे पाणी झाले. काही क्षण त्यांना काही सुचेनासे झाले कारण त्या मुलीचा आक्रोश काळजाला पीळ पाडणारा होता, तिच्या खोल जखमा तिला असह्य झाल्या होत्या, ती मानसिक दृष्ट्या खचून गेली होती. केलींनी कसाबसा फोटो काढला आणि ते काही दिवस अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले. ती मुलगी काही केल्या त्यांच्या डोळ्यापुढून हटायला तयार नव्हती. त्यांनी काही दिवसांनी मनाचा हिय्या करून त्या मुलीची चौकशी केली अन त्यांना कळले की फोटो काढल्याच्या चौदाव्या दिवशी ती देवाघरी गेली, आपल्या स्त्रीत्वाचा विटाळ त्या निर्मिकाच्या अंगावर ओतायला आणि अत्याचाराचा जाब विचारायला ती इथली लढाई सोडून गेली.

आपल्या देशभरातील अनेक शहरात, खेड्यात असे अनेक किस्से घडत असतात त्यांना वेगवेगळे वर्ख लावून, त्यांचे अस्सल रूप लपवून त्यांना नव्या रंगाने पेश केलं जातं आणि त्यामुळे नरपशु मोकाट होऊन बिनघोर फिरत राहतात ; नवे डंख मारायला इंद्रियांना परजत राहतात. सेक्सवर्कर्सच्या समस्यांवर खरा उपाय काढण्यासाठी त्यांना कायद्याने परवानगी देऊन त्यांचा व्यवसाय अधिकृत करणे हाच सगळ्यात चांगला मार्ग सध्याच्या घडीस दृष्टीपथात आहे. सध्या त्या त्यांच्याच देहाच्या विजनवासात आहेत त्यांना नियमाने मान्यता दिली तर निदान त्या मुक्त श्वास घेऊन मर्जीने व्यवसाय करू शकतील, त्यांचे शोषण कमी होईल, त्यांचे उत्पन्न वरच्यावर खाणारी तोंडे खूप कमी होतील. भले त्यांच्या देहावरच्या स्त्रीशोषणाच्या शृंखला तशाच राहतील पण किमान त्यांना आत्मनिर्भर स्वातंत्र्याचा आनंद तरी घेता येईल. हे ज्या दिवशी घडेल तेंव्हा या स्त्रियांच्या जगण्याच्या लढाईचा तो मोठा विजय असेल, स्वातंत्र्याचा तो सूर्य त्यांच्या जीवनात आशेचे नवे किरण घेऊन येईल.

- समीर गायकवाड.

याच पोस्टची 'एबीपी माझा'वरील ब्लॉगलिंक -  

http://abpmajha.abplive.in/blog/sameer-gaikwad-blog-on-prostitute-life

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा