‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणारी एक कवयित्री माय मराठीत होऊन गेली जिचे ऋण व्यक्त करण्यास शब्द कमी पडतात. त्या महान कवयित्री म्हणजे बहिणाई चौधरी. छोट्याशा शब्दात आभाळभर उंची गाठणारी त्यांची शब्दरचना अद्भुत आणि अद्वितीय अशी होती, मराठी साहित्यात तिची सर कधी कुणाला भरून काढता आली नाही.
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’या पंक्तीचा विस्तार एका कथेत आहे. एका खेडेगावात एक साधू भिक्षा मागत फिरत होता. काही घरी त्याला भिक्षा मिळत होती तर काही घरी त्याला भिक्षा द्यायला कुणी नव्हतं. जी ती माणसं शेतशिवारात कामाला गेलेली होती. भटकंती करत ते साधू शेतांमधून फिरू लागले. एका वस्तीवरील घरातल्या तरुण स्त्रीने त्यांची विचारपूस केली. गूळाचा खडा, पाणी दिलं. इकडची तिकडची माहिती विचारत त्यांना भिक्षा दिली, जेवण दिलं.
साधू वेगवेगळ्या गावात वस्त्यात फिरून आले होते, तिची जिज्ञासा होती की हे साधूबुवा आपल्या माहेरीही जाऊन आले आहेत की नाहीत ! त्यामुळे दर मिनिटागणिक तिच्या डोळ्यात पाणी साठू लागले. अखेर तिने मन मोकळे केलेच. आपल्या सासरचं कामाचं रहाटगाडगं तिने त्याच्यापुढे अश्रूतून व्यक्त केलं. आणि माहेरची थोरवीही वर्णिली. आपल्या माहेरची गोडी सांगतानाही तिच्या डोळ्यात आनंदाश्रूच होते. न राहवून साधूंनी तिला प्रश्न केला की, "तुझ्या सासरी इतका त्रास आहे आणि माहेरी इतके सुख आहे तर तू माहेरी का जात नाहीस ?"
हुंदका देत ती उत्तरली साधू बाबा काय सांगू ? माझे माहेरपण नीट व्हावे म्हणून माझी आई सासरी नांदते आहे. तिथे परत जाऊन मी तिला अजून त्रास का देऊ ? आपल्या लेकीचा संसार नीटनेटका व्हावा ही हरेक आईची धडपड असते. कारण ती ही एक मुलगी असते आणि सून असते ! मुलीचं सुख तिचा आराम याची हक्काची जागा तिचे माहेर असते तिथे तिला नीट वागणूक मिळावी. तिची ख्यालीखुशाली जपली जावी म्हणून तिची आई तिच्या माहेरी नांदते जे की तिच्या आईचे सासर आहे. स्त्रीची ही व्यथा हरेक विवाहित स्त्रीस लागू पडते आणि ही आर्त गाथा प्रत्येकीची होते...
या अर्थाने बहिणाई लिहितात की
'ऐक ऐक साधूबोवा, काय मी सांगते - लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते...'
सासुरवाशिणीच्या वेदना अशा हळव्या शब्दात मांडण्यासाठी अद्वितीय प्रतिभेचे देणगी लागते.
पण माहेराचे कौतुक म्हणजे सासरचा दुस्वास नव्हे. त्यांच्या कवितांतून माहेरचे वर्णन जितके आणि जसे येते तितक्याच वेळा आणि त्याच सहजतेने त्या सासरचे, सासरच्या माणसांचे वर्णन करतात.
"खटल्याची घरामधी, देखा माझी सग्गी सासू,
सदा पोटामधी माया तसे डोयामधी आंसू "
सासर-माहेर ह्या दोन विषयांपुरतेच त्यांनी आपल्याला बांधून घेतलेले नाही. तर त्यापेक्षा कितीतरी अधिक विषय आपल्याला बहिणाबाईच्या कवितांतून जाणवतात.
'असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी)
देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.'
शेतकऱ्याचे इतके सार्थ आणि सहजसोपे वर्णन कुठेच आढळत नाही.
"लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल ;
माझ्या माहेराची वाट, माले वाटे मखमल"
माहेराच्या ओढीने केलेले हे स्वर्गीय शब्दांकन आहे.ज्यात कृत्रिमतेचा लवलेशही नाही.
'आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर,
अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’
जन्ममरणाचे इतके यथार्थ वर्णन कोणी करू शकेल काय?
‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’
किंवा
‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’.
एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.
बहिणाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित बऱ्याच घटनांचे चित्रण जाणवते.
पेरणीच्यावेळी पाऊस यावा ही शेतकऱ्याची इच्छा असते. पाऊस येण्याचीही वेळ झालेली असते. अशावेळी बहिणाई सहज म्हणून जातात.
" पेरनी पेरनी भीज भीज धर्ती माते ;
बिय बियान्याचे भरून ठेवले पोते "
पेरणी चांगली झाली. भरभरून शेती झाली. चांगली पिकं आली. ते बघून बहिणाईना काव्य स्फुरले -
'बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले व-हे,
गह्यरलं शेत जसं, अंगावरती शहारे "
शेतकऱ्याच्या जीवनाचं यथार्थ चित्रण आपल्याला बहिणाईच्या कवितांतून पाहायला मिळते. त्यांच्या दुःखाचे, सुखाचे, कष्टाचे चित्र आपल्या डोळयांसमोर बहिणाईचे काव्य वाचताना जिवंत होते.
अगदी तरुणपणी वैधव्य आल्यावरही खचून न जाता धीराने ह्या परिस्थितीला बहिणाई सामोऱ्या गेल्या. माझी कीव करू नका असं त्या आजूबाजूच्या बायकांना सांगतात.
"नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा माले जीव "
घरोटयाला' म्हणजे 'जात्याला' बहिणाई भरल्या आभाळाची उपमा देतात. त्यातून माणसाला जगवणारं पीठ येतं. म्हणून त्या म्हणतात - "ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही "
स्वार्थ सोडून माणसाने कधीतरी त्यागाचा मार्गही अवलंबला पाहिजे, असा उपदेशही बहिणाई जाता जाता करतात.
"नको लागू जीवा, सदा मतलबासाठी
ही रिताचे देनं घेनं नही पोटासाठी "
'नाही वाऱ्यानं हाललं,
त्याला पान म्हनू नही’
यासारख्या काही सुभाषितवजा रचनेमधून त्यांची कविता तत्त्वज्ञाहून अधिक परिणामकारकरित्या प्रकट होते, तर कधी
‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस,
लोभासाठी झाला, मानसाचा रे कानूस’
यासारखे फटकारणारे खडे बोलही सुनावते.
'मन' या कवितेत माणसाचं मन कसं आहे हे शब्दांत पकडण्याचा प्रयत्न त्या करतात.
"मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोरं
किती हाकला हाकला फिरी येते पिकांवर "
मन किती चपळ आणि ओढाळ असतं याचं यापेक्षा अचूक वर्णन अजूनतरी कोणाला जमलेले नाही. याच मनाचं वर्णन त्या 'कधी खसखशीएवढं बारीक तर कधी आभाळाएवढं विशाल' असंही करून जातात.
सुगरणीच्या खोप्याचं उदाहरण देऊन बहिणाई माणसांना सुंदर संदेश देऊन जातात -
" अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला
पिलं निजले खोप्यात, जसा झुलता बंगला
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी, जरा देख मानसा
तिची उलूशीच चोचं, तेच दात तेच ओठ
तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोटं "
सुगरणीचा जीव एवढासा असूनही ती आपल्या पिलांसाठी किती सुंदर घरटं बनवते. माणूस हा सुगरणीपेक्षा कितीतरी शक्तिशाली मग माणसा तू तर अधिक काही करून दाखवू शकतोस असा सवाल त्या माणसाला विचारतात. अगदी साध्या शब्दांतूनही फार मोठा अर्थ त्या समजावून देतात.
बहिणाईनी आपल्या काव्यातून काही सामाजिक समस्याही मांडल्या आहेत. जसे,
"देख महारवाडयांत, कशी माणसाची दैना ;
पोटामधी उठे आग, चुल्हा पेटता पेटेना "
किंवा
" ऐका संसार, संसार ,दोन्ही जीवाचा इचार ;
देतो दुःखाला होकार अन् सुखाले नकार "
ह्या चार ओळींत त्या संसाराचे सारे गुपित सांगून जातात. त्यांची 'कशाले काय म्हनू नही' ही रचना मराठी माणसाच्या मनाला भुरळ पाडणारी आहे.
शेतकरी जीवनातल्या अनुभूतींचा ह्यातून प्रत्यय येतो. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा ह्यातून प्रत्यय येतो.
"बिया कपाशीन उले त्याला बोंड म्हनू नहीं
हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हनू नाही
नाही वाऱ्यानं हाललं त्याले पान म्हनू नाही... "
बहिणाईच्या या उस्फुर्त ओव्यांतून विवेकाने समृद्ध असलेल्या जीवनाचे दर्शन घडते.
एक दिवस शेतात काम करणाऱ्या शेतकरी बायकांनी बहिणाईना विचारलं की, " तुम्ही तर आमच्या सारखंच शेतात काम करता ? मग तुम्हाला एवढं कसं सुचतं ? "
यावर बहिणाबाई उत्तरतात,
" माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिणाईच्या मनी किती गुपितं पेरली,
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत
पावसांत समावत माटी मधी उगवतं "
बहिणाईच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव - धुळे जिल्ह्यातील अहिराणी बोली प्रकाशात येते. अहिराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते.
बहिणाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी बहिणाईची कविता त्यांच्या हरेक शब्दकळांतून रसरशीतपणे जाणवते.
आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाई चौधरी ह्या त्यांच्या तुलनेत कथित शैक्षणिक दृष्टीकोनातून अल्पअशिक्षित (?) असल्या तरी त्यांची प्रतिभाशक्ती उत्तुंग अलौकिक होती. जिला कधी कुठल्या शैक्षणिक प्रमाणपत्राचे वा इयत्तेचे बेगड लागले नाहीत. त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणत्या, शिकलेल्या आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेल्या साहित्यिकाच्या या रचना असाव्यात असे वाटते. अतिशय सामान्य परिस्थितीतल्या एका अशिक्षित, शेतकरी कुटुंबातल्या स्त्रीच्या अंगभूत प्रतिभेचा सत्याने भारलेला अविष्कार म्हणजे त्यांची कविता. त्या काळच्या साहित्यिक घडामोडींचा किंवा आधुनिक जाणिवांचा कुठलाही प्रभाव त्यांच्या कवितेवर पडलेला दिसून येत नाही. कुठल्याही साहित्यिक संस्कारांपासून दूर, स्वतःच्या आणि स्वतःभोवतीच्या माणसांच्या जगण्यात जन्मलेली, वऱ्हाडी खानदेशी बोलीतली बहिणाबाईंची कविता आहे. म्हणूनच या कवितेचं एक वेगळं असं स्वतंत्र विश्व आहे. तिला मौखिक परंपरेतल्या ओवी या प्रकाराचा बाज आहे. ग्रामीण भागातल्या दैनंदिन जीवनक्रमाशी बांधलेल्या साध्यासुध्या, कष्ट करणाऱ्या कुटुंबात रमलेल्या पण स्वतःच्या नि इतरांच्या जीवनाकडे डोळसपणे पाहणाऱ्या स्त्रीचं भावविश्व त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे.
बहिणाईचा जन्म जळगावपासून दोन किमी अंतरावरील असोदे गावचा. असोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात त्या जन्माला आल्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाईना सर्वांचा स्नेह लाभला. पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले.
घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले. हेच काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा केवळ जुनीच नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत.
वयाच्या बहात्तराव्या वर्षी बहिणाईना देवाज्ञा झाली. त्यानंतर सोपानदेव यांनी आपल्या आईच्या टिपून ठेवलेल्या या कविता, ओव्या आचार्य अत्रे यांना दाखवल्या, तेव्हा अत्र्यांनी ‘हे तर बावनकशी सोनं आहे’ अशी उत्स्फूर्त दाद देत या कविता प्रकाशात आणण्यात पुढाकार घेतला. स्वतः कवी असलेले सोपानदेव यांनी आचार्य अत्रे यांच्या मदतीने १९५२ मध्ये ‘बहिणाईची गाणी’ या संग्रहरूपात बहिणाबाईंची कविता प्रकाशित केली. या संग्रहाला आचार्य अत्रे यांनी एक नेटकी प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे, आणि मौज ही आहे, की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे.’
मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणा-या बहिणाई चौधरी. कथित दृष्ट्या अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे जाणून घेण्याकरता तरी एकदा का होईना बहिणाबाईच्या काव्याचा आस्वाद घेतला पाहिजे.
साभार लेखन संदर्भ - भूमिकन्या बहिणाबाई चौधरी- एक चिंतन : ले. स्नेहलता चौधरी.
बहिणाबाईंची गाणी (१९५२)
बहिणाईची गाणी - एक अभ्यास : ले. भिरूड प्रमिला.
कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झालेला बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ - अनुवादक माधुरी शानभाग.
- समीर गायकवाड
समीर भाऊ, नेहमीप्रमाणेच ब्लॉग अत्यंत उत्कृष्ट आहे.बहिणाबाईंच्या साहित्याचा समग्र आढावा घेतला आहे.☺️☺️
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख समीरदा!
उत्तर द्याहटवाअभिप्रायासाठी धन्यवाद...
हटवा