गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ....अत्रेंच्या कविता


सिनेमागृहातल्या पडद्यावर दृश्य दिसतेय - 'देव्हारयासमोर बसलेली तिशीतली ती प्रसन्न मुद्रेतली तेजस्वी स्त्री निरंजनासाठी, समईसाठी कापूस वळून त्याच्या नाजूक वाती तयार करत्येय. कानातली कुंडले, गळ्यात काळ्या मण्यांची सर, सैल अंबाडयात खोवलेले फुल तिच्या सध्या सोज्वळ व्यक्तिमत्वास खुलून दिसते आहे. तिच्या समोरच्या लाकडी देव्हारयातील देवांच्या मूर्तींवर पिवळसर आभा पसरलेली आहे. समईची मंद ज्योत तेवते आहे, तिचा उजेड सारया खोलीत पसरलेला आहे. तिच्या मागे असणारया भिंतीवर देखील देवांच्या तसबिरी डकवलेल्या आहेत. तिच्या शेजारी एक विधवा वृद्धा एका मुलाचे डोके मांडीवर घेऊन बसलेली आहे. काही वेळापूर्वीच तिथे भावंडांत पाय दाबण्यावरून भांडण झालेलं आहे, 'घरातली सगळी लहान सहान कामे एकानेच का करायची ? एकानेच का ऐकायचे ?" असा सवाल एका गोजिरवाण्या मुलाने केला आहे. इतक्यात आपला अभ्यास संपवलेला दुसरा एक साजिरा मुलगा त्या वृद्धेस लाडाने म्हणतो की, "ए आजी एखादं गाणं म्हण की गं !". त्यावर ती वृद्धा हसून म्हणते की, 'मी जर गाणं गायलं तर सगळी आळी गोळा होईल हो ! मग त्या सुहास्यवदनेकडे बघत ती म्हणते, "यशोदे तूच म्हण की गं गाणं !" आणि ती विचारते, "ते चिंधीचं गाणं म्हणू का ?"तो गोजिरवाणा सोडून सारे जण तिला होकार देतात आणि ती गाऊ लागते- 'द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी गं पितांबर दिला फाडून..." आता खोलीत बसलेले सगळेच जण एका तालात हळुवार टाळी वाजवून तिला साथ देतायत...' सिनेमागृहात हे दृश्य पाहणारया सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. साल होते १९५३. चित्रपट होता 'शामची आई'. हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

मैत्र जीवांचे .....



शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.

सोमवार, १० एप्रिल, २०१७

गोडी होळी-धुळवडीची !


नागरी भागातील बेचव होळी आणि धुळवडीच्या तुलनेत हे सण गावाकडं अधिक उजवे वाटतात. उपदेशाचे डोस पाजणाऱ्या लोकांचे या दोन दिवसात तिकडं काहीच खरं नसतं. त्यातही प्रत्येक गावात या सणांची रंगत न्यारीच असते. माझ्या गावाशेजारी लमाण तांडा आहे. तिथल्या होळीची लज्जत जगात सर्वात न्यारी असावी. आजच्या दिवशी विवाहित लमाण स्त्रिया आपल्या नवऱ्यांना वेताच्या फोकाने किंवा पोकळ बांबूने फटके देतात. नवरोबाने उत्तरादखल हात उचलायचा नसतो. त्याला फार तर एखादा वार चुकवता येतो. खास वेशभूषा केलेल्या देखण्या केशभूषेतल्या बायका विशिष्ठ हेल काढत आगळ्या सुरात गाणं गात हा उद्योग पार पाडत असतात. नवरोबांना ठोकून झाल्यावर उन्हं काहीशी डोक्यावर आल्यानंतर आपआपल्या दारापुढं पाच गोवऱ्यांची होळी पेटवून झाली की मग जेवणाचे वेध लागतात. चुलीवर शिजवलेलं तिखटजाळ मटण आणि पुरणपोळी दोन्हीचा बेत असतो. नवसागरापासून बनवलेली गावठी दारू अफाट झिंगवते. दिवस नुस्ता झिंगाटून जातो. दुपार कलताना माणसं दमून जातात. बसल्या जागी लुडकतात. होळीच्या या आगळ्या वेगळ्या रिवाजात मनमोकळं जगताना सगळी दुःखे वेदना विसरून सहजीवनाचा खरा आनंद घेताना कुणीही जुनं चंदन उगाळत बसत नाही. की कुठला कृत्रिमतेचा लवलेश त्यांच्या वागण्यात राहत नाही. जुनी भांडणं मिटवून आपसातला सलोखा टिकवण्यावर भर राहतो.

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

एक उनाड दिवस .....


"उंडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय..... "
माझी आई, आजी तिच्या संभाषणात ही म्हण अधून मधून वापरायची. तेंव्हा तिचा अर्थ कळत नसे. आता तिचा अनुभव येतो. बेफिकीर उनाड माणसाला कशाचीही काळजी नसते, तो आपलं खुशाल फिरत राहतो. हे वेड त्याच्या डोक्यात इतकं भिनलेलं असतं की गोठ्यात गाय जर व्यालेली असली तर तो पठ्ठ्या तिचं तान्हं वासरू खांद्यावर टाकून जत्रेला जातो. मीही यातलाच एक...

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

चिंचपुराण....



प्रत्येकाच्या आठवणींना अनेक मुलामे असतात, अनेक कंगोरे असतात. नानाविध घटना आणि घटकांशी त्या निगडीत असतात. आठवणी जशा सुखाच्या दुःखाच्या असतात तशा विविध चवीच्याही असतात. म्हणूनच संभाषणात म्हटले जाते की. आठवणी या कधी कडूगोड असतात तर कधी आंबटगोड असतात. आंबट आठवणींचा विषय निघावा अन त्यात चिंचेचा उल्लेख होत नसावा असे कुठे घडत नाही. या आंबट आठवणी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते प्रेमाच्या आंबटगोड शेवटापर्यंत मनात झिलमिलत असतात. पूर्वी रेडीओवर ‘मधुचंद्र’ चित्रपटातील एक गाणं नेहमी लागायचे त्यात चिंचेच्या झाडाचा वेगळाच उल्लेख होता. “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी..” अशा काहीशा त्या पंक्ती होत्या. त्यातला नायक सांगतो की हे चिंचेचे झाड त्याला चक्क चिनार वृक्षासारखे दिसते आणि त्यामुळे त्या झाडाखाली उभी असलेली त्याची प्रियतमा ही एखाद्या काश्मिरी नवतरुणीसारखी दिसते आहे.. चिंचेच्या झाडाचे चिनार वृक्षाशी असणारे साधर्म्य याहून देखण्या शब्दात व्यक्त झालेले नाही. असो..

गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

नवविचारांची गुढी ...

चैत्र शुक्ल प्रतिपदेस 'सालाबादप्रमाणे यंदाही'च्या धर्तीवर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यभर विविध आक्षेप साक्षेपांच्या फैरी झडतात. त्यातील काही मुद्द्यांचा हा परामर्श..



गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.

गुरुवार, २३ मार्च, २०१७

घाल घाल पिंगा वाऱ्या - कवी निकुंब


एक काळ होता जेंव्हा दळणवळणाची साधने अत्यंत पुरी होती. विवाह हे बहुतांश करून पारंपारिक भारतीय पद्धतीने होत असत. विवाहेच्छुक मुलगा नवऱ्या मुलीला बघायला तिच्या घरी येई. यथासांग मुलीला पाहून झाल्यावर तो त्याची पसंती वा नापसंती कळवत असे. या प्रक्रियेत बऱ्याचदा मुलींचे मत विचारात घेतले जात नसे. पसंती कळवल्यानंतर लगीनघाई होई. पुढे जाऊन मुलाच्या वा मुलीच्या निवासी भागात किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री विवाह सोहळा संपन्न होई. पूर्वी ग्रामीण भागातले लग्नाचे वऱ्हाड बैलगाडयातून जाई, निमशहरी भागातले वऱ्हाड बंदिस्त ट्रकमधून तर शहरी भागातील वऱ्हाड एसटीबस मधून जाई.

एखादयाचा आर्थिक स्तर थोडा चांगला असला की याहून थोडीशी वरच्या स्तरावरची व्यवस्था याकामी ठरलेली असे. लग्न लागले की सासरला निघालेली नवरीमुलगी काहीशी धास्तावूनही जायची आणि तिला नवजीवनाचा आनंदही वाटायचा. मनाच्या द्विधा मनःस्थितीत अडकलेली ती नवविवाहिता तिच्या निरोपसमयी आईवडिलांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत असे. तिची भावंडे तिला मिठया मारून रडत. सारे वातावरण शोकाकुल होऊन जाई, मग जमलेल्या बायाबापड्यादेखील डोळ्याला पदर लावत. कुणाला नुकत्याच निवर्तलेल्या एखाद्या नातलगाची आठवण निघाली मग सारेचजण शोकसागरात बुडून जात.

बुधवार, १५ मार्च, २०१७

'व्हॅलेंटाईन डे' रेड लाईट एरियातला..



व्हॅलेंटाईन-डे रेड लाईट एरियातही साजरा होतो. 
तिला सोडवू न शकणारे, 
तिच्या सुटकेसाठी आवश्यक असणारे पैसे जवळ नसलेले, 
तितकी धमक मनगटात नसलेले, 
तिला कोठे न्यायचे आणि 
कसे सांभाळायचे याचे उत्तर माहित नसलेले, 
पण तिच्यावर मनापासून प्रेम करणारे 
आजच्या दिवशी भर दुपारी इथे येताना किंचित सुकून गेलेला, 
पाकळ्या झडायच्या बेतात असलेला, 
लाली फिकी झालेला थोडासा स्वस्तातला गुलाब 
शर्टमध्ये लपवून येतात. 
जोडीला पाच पन्नास रुपयांची कचकडयाची भेटवस्तूही आणतात.

आम्ही सोलापूरी ....



सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.